Header Ads Widget

छोट्या माणसांची मोठी सावली

  सत्यवादी माणसाजवळ नैतिक शुचिता असते.त्याचे विचार सामर्थ्य विशेष प्रभावी आणि शक्तीशाली असून तो क्रोधावर मोठ्या तपस्येने विजय मिळवल्यामुळे त्याचे विचार सामर्थ्य प्रचंडच असते. हे सामर्थ्य इतके विलक्षण असते की ,जेथे इतर जनांच्या शेकडो शब्दांनी काम होणार नाही तेथे प्रचंड विचारसामर्थ्य असलेल्या योगीजनांचा एकच शब्द पुरा पडतो.श्रेष्ठ योगी मितभाषीपणे एकच शब्द बोलतो आणि ऐकणारांच्या मनावर त्याचा विलक्षण मोठा प्रभाव निश्चित पडतो. सत्यवचनी, उद्योगशीलता,दृढनिश्चय, चिकाटी हे सद्गुणांची गंगोत्रीच असते.

  माणसाला ज्ञान, शहाणपणा आणि अमरत्वाकडे जाताना दोन चैतन्यमय वाटा असतात एक आत्मिक तर दुसरी देहनिष्ठ.आत्मिकता प्रसन्नता,चित्ताची एकाग्रता इंद्रियमनाने आत्मज्ञानी झाला तर त्यासाठी कृती करण्यास शारीरिक बळ असावेच लागते तरच मन तेजस्वी तारा होऊन मनाच्या किरणशलाका अस्ताव्यस्त, इतस्ततः न भटकताना तेजस्वी कार्य सिध्द करण्यास मदत करते हेच खरे,हा इच्छाशक्तीचा बालेकिल्ला अभेद किल्ला मी सांगलीत पाहिला तो ही मुस्तफा इलाई मुजावरच्या रुपाने.मनाची स्थिरता ,समतोल,प्रसन्नता, आंतरिक सामर्थ्य ,अडचणीवर मात करुन कार्य शेवटास नेण्याची शक्ती,हाती घेतलेले कार्य यशस्वी करण्याचे सामर्थ्य, माणसावर प्रभाव पाडण्याची क्षमता, आकर्षून घेणारे व्यक्तीमत्व ,मुखाभोवती मंत्रमुग्ध करणारे तेजोवलय, तेजस्वी व पाणीदार डोळे, स्थिर, भेदकदृष्टी,भरदार प्रभावी आवाज ,भारदस्त राजेशाही चालण्याची ढब,परिस्थितीपुढे मान न झुकवता ताठरपणा बेडर धैर्यशालीपणा याचा जाज्वल्य मूर्तीमंत माणूसकीचा खळखळणारा झरा मुस्तफा मुजावर याच्या रुपाने प्रत्यक्ष पाहिला व त्याचे कार्य जाणून घेऊन त्याच्यातील देवत्वाचा जो साक्षात्कार मला झाला तो आपणापुढे मांडतांना मनात असंख्य घटनांचे मोहळ शिगोसिग भरलेले अमृत पोहळेतला मध चाखण्याचा मी प्रयत्न करतोय.दु:खीतांच्या वेदनासाठी चंदनाचा लेप होणारा मुस्तफा मुजावर साठी प्रा.सदानंद देशमुख याच्या खालील ओळी पुरेशा आहेत.

  "धाटं खुडता खुडता उडे अंगावर भुशी
  भुशितल्या खाजीतून दाटे मनभर खुशी
  माझ्या घामाच्या थेंबानं मातीतून उगवलो
  वाटे मीच धाड्यातून कणसात पोसवलो
  गच्च सुगीच्या दिसांत मीच माझ्या पोटी आलो"

  दुस-याची संकटे, दुःखे सोसतांनाच माणसाचा पुनर्जन्म होतो,त्याला पूर्णत्व लाभते हीच आदर्श जीवनधारणेचे बाळकडू मुस्तफाच्या आईने लहानपणापासून पाजले.म्हणूनच माणसांच्या कल्याणासाठी जगणारा अवलिया आपणास पाहावयास मिळाला हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. मुस्तफा इलाई मुजावर आईचे नाव चाॅदबी .मुस्तफाच्या वडिलांचे मुळ गाव नांद्रे ता.मिरज जि.सांगली. घरची परिस्थिती खूपच हलाक्याची होती.गावी व्यवस्थित बस्तान बसेना म्हणून त्यांचे वडिल सांगली येथे आले .शिक्षण कमी असल्याने मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत अत्यंत हालाकिचे जीवन जगत होते पंचशीलनगर येथे झोपडपट्टीत नाल्यालगत यांची झोपडी होती गटार भरली की, झोपडीत पाणी शिरायचे, सगळीकडे दुर्गंधी पसरायची अशा अवस्थेत अाईला घरी सयंपाक उंब-यावर बसून करावे लागे.प्रचंड हिम्मतीने याही स्थितीत दिवस काढले.मुलांने शिकावे यासाठी मुस्तफाला शाळेत दाखल केले पण अवतीभोवतीची परिस्थिती तशी नसल्यामुळे मुस्तफा कसाबसा दहावी पर्यंत शाळेच्या पाय-या चढला पण तेथेही दहावीची मजल त्याला पार करता आली नाही. शेवटी नापास झाला आणि शिक्षणाच्या उम्मीदीवर पाणी पडले.मग पोटासाठी तोही वडिलांच्या सोबत मोलमजुरी करु लागला पडेल ते काम करावे लागले त्यात कुरिअर टाकणे,पेपर टाकणे,छोट्या रिक्षातून पानपट्टीचा व्यवसाय करु लागला. कामाला जाताना आई शिदोरीत दोन भाक-या द्यायची त्यातील एक भाकर रस्त्यावरील उपाशी फिरणा-या भिका-यास द्यायचा तिचा अट्टाहास असायाचा ती म्हणायची, एक रोटी किसी गरिब को देकर आणा ".या एका भाकरच्या शिदोरीने माझ्या मुलात चांगल्या संस्काराची भिजे रुजवणारी आई परिस्थितीच्या ,हलाकिच्या विद्यापीठात शिकली होती. हीच शिदोरी कळत न कळत मुस्ताफाच्या अंतर ह्दयात माणुसकीची रूजवण करीत होती.आईचे वात्सल्य, प्रेम,निरागस तळमळ, कष्ट वाया जाणार नाही याची जाणीव निश्चित आईला असणारचं.विधाताच हे करवून घेत असेल. म्हणूनच मुस्तफा पानपट्टीच्या व्यवसायात त्याला जे भेटले ते गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसेच होती. त्याच्या संगतीने तो हळूहळू गुन्हेगारीत अडकला गेला.गुंडगिरीच्या पूर्ण अधीन होता होता अनेक केसेसमध्ये अडकत गेला.सारे हतबल झाले.जीवाची पर्वा न करता तो त्याच्या मनाला जे येईल ते करु लागला.

  पण यातूनही जखमी प्राणी,पक्षी यांची सुश्रुषा करण्याचा छंद त्याला जडला. अनेक प्राणी, पक्षी,सर्प यांना मुस्तफामुळे जीवदान मिळू लागले, मनामध्ये हळूहळू ह्दयात पक्षी प्रेमाला पाझर फुटू लागली याच अोलाव्यातून २००८ ला "इन्साफ फाउंडेशनची स्थापना झाली .पक्षी,पशु,सर्प जखमी असले बाबतचे फोन खणखणू लागले.यातूनच रस्त्यावर दिसणारे मनोरूग्ण, निराधार यांच्यासाठी एक वेळेचे जेवण द्यायची संकल्पना जन्मास अाली. मुस्तफाचे आयुष्य बदलू लागले.अाईच्या मायेची एक भाकर मुस्तफाच्या ह्दयात प्रेमाचा,मांगल्याचा, माणुसकीचा गहिवर निर्माण करु लागली.हाॅटेलातील, घरातील शिल्लक राहिलेले अन्न ,अशा उपक्रमाने निराधार,बेघरांच्या मुखात पडू लागले.यासाठी भाड्याने घेतलेल्या रिक्षातूनच सेवा सुरु झाली.अनेकांचे मदतीसाठी हात पुढे आले.स्वतःची मिळकत याच कामी खर्ची पडू लागली.

  २०११ साली सांगली अर्बन बँकेजवळ मानसिक संतुलन बिघडलेली आजी जिच्या मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंत हातात आळ्या पडल्या होत्या.अौषधोपचार करायला कोणी तयार नव्हते. मुस्तफाने हे पाहिले .त्याचे मन कळवळले त्याने डाँक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार करतांना आजीच्या जखमी हातातून मँगीसारख्या आळ्या बाहेर पडल्या.नंतर सिव्हिलला अँडमिट केले.महिनादिड महिन्याच्या अथक सेवेनंतर आजी बरी झाली.मुस्तफाची सेवा पाहून डोळ्यांतून आसू निघत असतांना ती म्हणाली,"माझा मुलगा आज मला मिळाला ".हीच "इन्साफ फाऊंडेशनच्या भळभळणा-या रक्ताला "इन्साफ" देणारी घटना.तत्कालीन म.न.पा.आयुक्त रवींद्र खेबुडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.अन् आजीच्या त्या आनंदी चेह-याने मुस्तफाला मार्ग गवसला.तिथून त्याने आजवर मागे वळून पाहिले नाहीच. कचराकुंडीत कोणी पडलेले असो घाणीत वास सुटलेला रुग्ण असो मुस्तफा हात लावायला आता कचरत नाही.

  बेघरांचा प्रश्न आला हाती आर्थिक तजवीज नाही.पत्नीचे दागिने गहाण ठेवून प्रसंगी मोडून फाऊंडेशनचे कार्य सुरु केले. पण मुस्ताफाची पत्नी ज्योतीच्या सावित्री सारखी,कर्मवीरांच्या लक्ष्मी सारखी सदैव पाठीशी उभी राहिली.धन्य धन्य ती माऊली. २०१८ पं.दीनदयाळ अंत्योदय योजने अंर्तगत बेघरांना रात्र निवारा केंद्राची स्थापना झाली त्यासाठी मुस्तफाची निवड झाली. यानिमित्ताने हे केंद्र बेघरांना मायेची उब देणारे केंद्र ठरले.पाच बेघरापासून सुरु झालेला हा प्रवास आज शंभरच्या घरात बेघरांना आधार देत आहे. हे सर्व करतांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले.सध्याचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील,राहुल रोकडे यानी प्रोत्साहन दिले. त्यामुळे दोनशे जनांना आपल्या घरी पोहचवले.मग ते कर्नाटकचे असो वा गुजराथचे असोत इतर राज्यातील लोकांना सन्मानाने घरी पोहचवले.अशा लोकांना बेघर कोणी म्हणू नये त्यांना आधार मिळावा यासाठी आत्मनिर्भर आणि स्वयंरोजगार दिला.दिवाळीत पणत्या बनवणे,रांगोळी विकणे,गणेश उत्सवात पर्यावरणपुरक मूर्त्या बनवून रिकाम्या हाताला काम दिले.त्यातून मिळणारी मिळकत सबंधीतांना दिल्याने त्यांना स्वकमाईचा आनंद मिळाला. आता हे काम फक्त सांगली पुर्ते मर्यादित न राहता देशभरात पोहचले.प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे यांनी सदिच्छा भेट देवून कौतुक केले .त्यांचा मुस्तफाशी आजही संपर्क आहे.

   मुस्तफा पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत आग्रही आहे .हे सर्व काम करतांना प्रामाणिकपणा तसूभरही ढळू दिला नाही हे विशेष. निराधार मुलांच्या शिक्षणासाठी मुस्तफाने दोनशे त्रेपन्न मुलांना दतक घेऊन त्याच्या शिक्षणाचा खर्च करतोय.सुमारे नव्वद कुटुंबाना महिन्याचे धान्य दिले जाते.गरजूना आर्थिक मदत,आर्थिक व्यवहार स्वतःच्या हातात न घेता थेट लाभार्थ्याला अशा अनेक कामामुळे जनमाणसात त्याचा लौकिक वाढत गेला.एक प्रसंग या निमित्ताने सांगावे वाटते.श्रीमंत कुटुंबातील वृद्धेला घरातून बाहेर काढले होते. अंगावर सोने होते त्या कच-याच्या ढिगात पडल्या होत्या. मुस्तफाने त्यांना आधार दिला.त्यात नातेवाईकांकडून इस्टेटवर तिची सही मिळवून देण्यासाठी धमक्या व दडपणशाहिला समोरसमोर जावे लागले. शेवटी मुस्तफाने सर्व इस्टेट सरकार जमा करुन टाकली कोरोना काळात लाखो लोकांना आँक्सिजनच्या प्रतिक्षेत लाखो रुपये घेऊन होते. काही तडफडून मरत होते. अशाच बिकट परिस्थितीत सावली केंद्रात मुस्तफासह त्रेसष्ट जण कोरोना बाधित झाले कोणत्याही अौषधाशिवाय फक्त आत्मिकबळावर सर्वांनी यावर मात केले सर्व बरे झाले हा धक्का मुस्तफाने आपल्या कृतीद्वारे दिला.येथील बेघरानां आधारकार्ड नसलेने लसीकरण होऊ शकत नव्हते. म्हणून मुस्तफाने स्वतः लस घेतली नाही. तसे आयुक्तांना स्पस्ट सांगितले. स्वतः आयुक्तांनी त्या ठिकाणी लसीकरण कँम्प लावावा लागला.

   आता मुस्तफाचे स्वप्न सावली केंद्रासारखे स्वबळावर बेघरांना हक्काचा निवारा देण्याचे केंद्र बनविणे याच बरोबर शाळा काढण्याचा त्याचा मनोदय आहे या शाळेभोवती, बेघर,निराधार, यांची वस्ती असेल दुस-या बाजूला पशु पक्षी असतील येथील मुलांना सगळ्याचं शिक्षण मिळेल ही शाळा नाविण्यपुर्ण असेल. सध्या मुस्तफा जिल्हा क्लेश समितीत सदस्य म्हणून कार्यरत आहे .श्वानपथक सदस्य यातही सहभाग आहे. आता पर्यंत एकशे एकोणसत्तर पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी सात राष्ट्रीय पुरस्कार आहेत.इतके असूनही मुस्तफाला एकाही पुरस्काराचे नाव सांगता येत नाही. शिवाय अनेक पुरस्कार त्याने स्वीकारले नाहीत.

   अशा अनेकविध लोंकाच्या सहवासात राहून अनेक भाषा तो सफाईने अवगत करुन अशा लोकाशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची त्याची कला कौतुकास्पद अशीच आहे .मनात ध्येय असेल तर काय करु शकतो हे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुस्तफा.शिवाय मी म्हणेन ही सारी मुस्तफाच्या आईच्या एका भाकरीची शिकवण आणि पुण्याईचे म्हणावे लागेल.जखमी जनावर,पक्षी पाहिले की,मुस्तफा बेचैन होतो. अशा जखमी झालेल्या पक्षी,जनावर,बेवारशी रोगी,मनोरूग्ण, यांना घरी आणून त्याच्यावर उपचार करुन त्यास खाऊपिऊ घालून बरे झाले की,पक्षी,साप,जनावरे यांना सुरक्षित जागी सोडतो.तसेच मनोरुग्ण यांना पूर्णतः बरे झाले की, त्यांच्या मुळ गावी पाठवतो. बकरी ईदला कुर्बानी साठी आणलेले बकरे, तो खूप प्रेमळपणाने सांभाळायचा ईद दिवशी त्याच्यावर सुरी फिरणार हे त्याला सहन व्हायचे नाही मग तो रात्री सर्व झोपल्यावर त्यास जखमी करायचा कारण मुस्लिम धर्मात केला कुर्बानी देणारे बकरे जखमी,आजारी असेल तर,ते कुर्बानीसाठी घेत नसत याचा परिणाम असा व्हायचा की,त्या बक-याला जीवदान मिळायचे. याचे फळ म्हणून मुस्तफाला वडिलांचा मार खावा लागे.

   लहानपणापासून त्यास सर्प पकडायचा छंद लागला होता या छंदामुळे तो "सर्पमित्र " झाला.सर्प तो खूपच चपळाईने पकडतो त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडतो. मनोरूग्ण शोधणे,त्यांना अंघोळ घालून स्वच्छ करणे,बोलते करुन त्याचे नातेवाईक शोधणे त्यांना त्यांच्या हवाली करणे,बेवारस असल्यास अौषधोपचार करून खाऊपिऊ घालून त्याच्या निवा-याची सोय करणे ही सारी कामे त्याची आता नित्याचीच झाली अाहेत.असा हा मुस्तफा .सर्प पकडतो तेंव्हा सर्पमित्र असतो .जखमी पक्ष्यांना पाणी पाजतो तेंव्हा पक्षीमित्र असतो. प्राण्यांना चारा भरवतो तेंव्हा प्राणीमित्र असतो .मनोरुग्णांना अंघोळ घालतो, स्वच्छ करतो. तो मनोयात्री ( मुस्तफा मनोरूग्णांना मनोयात्री म्हणतो.)बंधू असतो आणि निराधाराचा आधार असतो मुस्तफा. ही सर्व कामे तो तळमळीने करतो.मुस्तफा अनेक देवळांना,दर्ग्याना प्रसंगी भेट देतो.अनेक देवस्थानाला चालत प्रवास करुन दर्शनासाठी जातो.पण पण खरे पावित्र्य, खरा देव त्याच्या "सावली निवारा " केंद्रातच भेटतो

   मनोरूग्णांना तो "मनोयात्री " म्हणतो. मानसिक आजाराने पछाडलेले, हरवलेल्यांना शोधून त्याच्याशी सवांद साधतो त्याची कोणतीच तक्रार असत नाही. ते मुस्तफाला मनोयात्रीच वाटतात. तो त्याच्याच संगतीत राहतो ,वृद्ध,अपंग,मनोरूग्ण, कुत्री, ,मांजरे,बदके,पक्षी हेच त्याचे कुटुंबाचे सदस्य आहेत .त्यांच्या हरवलेल्या नजरा, विचित्र हावभाव,बोलणे,जगाचे असूनही नसल्यासारखे, कोणी कुटुंबातील सदस्य जगाचा निरोप घेतला तर कायदेशीर तजवीज करुन अंत्यविधी करुन तो धर्मपुत्राची भूमिका पार पाडतो सावलीच्या लोकाबद्दल तो भरभरून बोलतो.अशा लोकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवे असे त्यास वाटते.शरीर नाशवंत आहे,जीव गेला तरी सारे बदलते. माणसाने जगतांना अशा गरजूसाठी वेळ,श्रम,पैसा दान द्यायला हवे. मंदिर, मश्जिद,दर्गा येथे दान देण्याऐवजी माणसातल्या देवाला दान द्यावे त्याचे पुण्य निश्चित मिळेल अशा विचाराचा मुस्तफा बोलायला लागला की,त्याचे जीवनाचे तत्वज्ञान ऐकत राहावे असेच वाटते.अनेक अनुभवाच्या मुशीतून तो चांगला शेकून निघालाय.पुस्तकाच्या पलिकडचे त्याचे अनुभव आहेत .नविन काही पाहिले की,तो ते लगेच शिकतो.मनातील जिज्ञासापोठी तो कराटे शिकला ब्लॅकबेल्ट मिळवला, अनेक स्पर्धा गाजवल्या मात्र तो कोणत्याच व्यसनात अडकला नाही. बेघर सावली निवारा केंद्रातील एक एक व्यक्ती म्हणजे एक एक पुस्तकच आहे.

   आता अलिकडे सावली निवारा केंद्र हे मांगल्याचे तीर्थस्थान झाले अाहे. अनेक समारंभ, कार्यक्रम आता येथे लोक हौसेने करु लागले आहेत ,पोवाडा,पुस्तक प्रकाशन,साहित्य संमेलने येथे होत आहेत. कवी अरुण कांबळे, बनपूरीकर,याचे "काळजातला बाप " या काव्य संग्राहाचे प्रकाशन येथेच झाले.तसेच कवी रमजान मुल्ला यांच्या "अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टान्त " याही काव्य संग्रहाचे प्रकाशन येथेच झाले. या प्रकाशन सोहळ्या दिवशी आकाशात ढग गडगडत होते. आभाळ गच्च भरून आले होते. पाऊसामुळे कार्यक्रमात व्यत्यय होतो असे सर्वांना वाटत होते. पाऊस आला तर प्रकाशन एखाद्या खोलीत घ्यायचा विचार चालू होता. त्याच क्षणी मुस्तफा सर्वापुढे अाला व आयोजकांना म्हणाला,"तुमचा कार्यक्रम होईपर्यंत पाऊस येणार नाही, बिनधास्त कार्यक्रम करा"आणि खरोखरच पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत पाऊस आला नाही. कार्यक्रमाची सांगता झाली, आभार प्रदर्शन झाले अन् मुसळधार पाऊस कोसळू लागला. सारे आश्चर्यचकित झाले.सगळीकडे पाणीच पाणी झाले. किती ताकद शब्दात एखाद्या तपस्वीला पण लाजवेल असे कृत्य .हे सर्व आम्ही सर्वच याच डोळा याच देही अनुभवला.

   परवा कोजागिरीच्या निमित्ताने "आभाळमाया "तर्फे काव्य संमेलन झाले त्यावेळी प्रमोद चौगुले ,रमजान मुल्ला,अभिजीत पाटील,इंद्रजीत घुले ,आबासाहेब पाटील,लता ऐवळे यांनी बहारदार काव्य वाचून करुन सावली निवारा केद्रातील सर्वांना कोजागिरीचा काव्यप्रसाद वाटून त्यांच्या मनात आनंद द्विगुणीत केला. असे अनेक कार्यक्रम येथे होत आहेत हे सर्व मुस्तफा आणि त्याच्या कार्यकर्त्याचे कामाचे कौतुक व पोच पावतीच्या आहे.समाजातील मानसिकता बदलाचे हे चित्र आहे हेच खरे.मनातील साधना,तळमळ,कळकळ,वात्सल्य, प्रेम ,मांगल्य,चांगुलपणा किती उपमा द्याव्यात तेवढे थोडेच अाहे. समाजसेवा करतांना अनेकांचे हात मदत करीत असतात. ते हात दिसत नाहीत.असे अदृश्य हातच प्रेरणा स्त्रोत्र असतात. जीवनात "अकेला चलो रे " असे असले तरी एखादे काम झोकून करतांना हे सूत्र चालत नाही.त्यासाठी सहकार्यानेच काम तडीस जाते हे सहकारी झ-यासारखे अविरत कार्य करीत असतात पण जेव्हा झ-याच्या मदतीने ओहळ,वगळ,नाला,ओढा,नदी ,महानदी,शेवटी समुद्र असे रुप बदलतांना झरे आपल्या लक्षात राहत नाही लक्षात राहते त्यांची विविध रुपे. पण झरा कधीच कोठे तक्रार करत नाही तो अविरत पाझरत राहतो. असेच मुस्तफाच्या कामास शाब्बासकी,मदत,सहकार्य, हातभार,जबाबदारी, करण्याचे काम त्याचे भाऊ बहिण आई,वडिल,पत्नी आणि छोटीशी रिजा नावाची परी,यांना विसरता अथवा बाजूला काढता येत नाही. म्हणूनच त्यांचे नावे घेणे आवश्यक आहेच हसन,रफिक,इम्तियाज,नजीर,शाबेरा, यास्मिन,सलमा,आयशा,पत्नी समीना आणि छोटीशी मुस्तफाची मुलगी " रिजा "यांचे सहकार्य अमोल आहे .याच्यामुळेच घरची मदार चालते. यांच्याच भरवश्यावर मुस्तफा सामाजिक कार्य करण्यास मोकळा होतो.

   मुस्तफा अनेकांची दुःखे कवठाळत त्यांच्या मनात, ह्दयात,जगण्यासाठी चेतना निर्माम करतो, "जगी ज्याचे कोणी नाही त्यास देव आहे " असं म्हटलं तरी हे देवत्व मुस्तफाच्या रुपाने आज कार्य करीत आहे .सामाजातील कितीतरी निराधाराचे,अपंगाचे,बेघराचे,बेवारसाचे, मनोरुग्णाचे आसू पुसून त्याच्या चेह-यावर हासू आणण्याचे तो महान कार्य करतोय.उपाशी असणाऱ्याच्या मुखात सुखाचे घास घालतोय. हे करतांना मुस्तफा थकत नाही,कुरकुर करीत नाही . प्रकाश आमटे ,मंदाकिनी आपटे यांचा वारसा चालतोय.या कार्यामुळे सांगलीकरांच्या गळ्यातला तो "ताईत "झाला आहे हे खरे आहे.त्याच्या मनात अनेक योजना आहेत त्या काळापरत्वे सत्यात निश्चित उतरतीलच.आपल्या घरासाठी मुस्तफा रोज सकाळी सात ते अकरा पर्यंत गाड्या धुण्याचे काम करतोय त्या येणा-या मजुरीनेच घराचा भार सांभाळतोय.हे विशेष आहे त्याचे निरपेक्ष काम अविरत चालूच अाहे.मुस्तफा म्हणतो,माझी पत्नी समीना व मुलगी रोझा मला फार मदत करतात.अडचणीत असतांना मला मदती बरोबर पत्नीने अापल्या दागिण्याची पर्वा केली नाही. तिचे आभार मानण्यास माझेकडे शब्द नाहीत.

   "घरा विषयी सांगतांना त्याचे डोळे ओले होतात, अश्रू मोती होऊन गालावरून तरळतांना त्याची चमक सूर्यासारखी तेजस्वी दिसते.किती दानत्वाची मूर्तीमंत उदाहरण.साध्या माणसातील या परोपकाराची किमयाच जगाचे दुःख उरात साठवण्याचे सामर्थ्य देते .याच सामर्थ्याच्या जोरावर मुस्तफा आपल्यालील चांगुलपणा वाटत फिरतोय त्या बदल्यात अनेकांची दु:खे फुलासारखी ह्दयात घेऊन मिरवतोय. हे मिरवतांना कोठेच अंहपणा, मी पणाची भावना दिसत नाही ते एखाद्या निर्मळ झ-यासारखीच सुखस्वप्ने अनेकांच्यात पेरत फिरतोय .त्याचे कार्य शब्दांत मांडता येत नाही.शब्दापलिकडचे त्याचे कार्य आहे.बेघर,अनाथ,मनोरूग्ण अशा माणसापर्यंत सोप्या पद्धतीने पोहचवण्याचे शास्त्र मुस्तफा जवळ अजब अाहे. त्याच्या या कामात अनेकजण मदत करीत आहेत .त्याच्यावर कौतुकाची थाप पडते अाहे पण त्याला भाळून न जाता पुन्हा जोमाने तो कार्य करतो अाहे, सांगलीतील साहित्यिकांची पुस्तके या लोकातर्फे गावोगाव विकण्याची त्याची योजना अाहे त्यातून बेघरांना कामा बरोबर सामाजिक सन्मान मिळेलच शिवाय सांगली जिह्यातील साहित्यिक गावोगाव व घराघरात पोहचतील.

   स्वतःला,समाजाला, वस्तुस्थितीला आणि भोवतालच्या सामाजिक जीवनात मुस्तफा आता पूर्णतःमिसळून गेला आहे .व्यक्ती, शौर्य, शील,सौंदर्य, श्रम,संघर्ष, स्वाभिमान, भूक,दैन्य हे अवघे मुस्तफाच्या ह्दयी सामावलेले आहे हेच खरे.तरुण मुस्तफाच्या पाठीवर शाब्बासकीचे हात ठेवणारे त्याच्या हितकारक कामास सहकार्य करणारे अनेक त्याच्या कार्याच्या प्रवाहात येत आहेत हेच त्याच्या कामाची पावती अाहे. शेवटी .फ.मु .शिंदे यांच्या कवितेत म्हणतात., "ढग असो ढग नसो, मुरायचे ते मुरते,पाणी अखेर पाणीच,तहाने भोवती फरते " मुस्तफाविषयी कितीही लिहिले तरी शब्दांच्या साच्यात त्याचे कार्य बंदिस्त करता येत नाही.अशा अवलियाच्या कार्याला लाख लाख सलाम आणि त्याच्या या कार्यामुळेच अनेक अपंग, बेघर, मनोरूग्ण "सावली निवारा केंद्रात विश्वासाने सुखाच्या खांद्यावर बसून हे आभासी जग अनुभवत अाहेत, अन् मिस्किलपणाने हसत अाहेत. "अशा हस-या चेह-यास शुभेच्छा देतो.या अवलियाचा पत्ता :सावली निवारा केंद्र ,आपटा पोलीस चौकीजवळ, सांगली. अशा हरहुन्नरी अवलिया बद्दल लिहिण्याची संधी मला अनिलकुमार पाटील जेष्ट कवी, हिंगणगाव ता.कवठेमहांकाळ यांनी देवून मला ऋणको करुन सोडले हे ऋण कधीही फेडता येण्यासारखे नाही . मुस्तफास त्याच्या कार्यास या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा..!

   लेखन
   -मुबारक उमराणी,
   शामरावनगर, सांगली
   मो.९७६६०८१०९७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या