Recent in Technology

Advertisement

Breaking News

सिंधूताई सपकाळ;एक चिरंतन व्यक्तीमत्व

  सिंधूताई सपकाळ. एक गणमान्य नाव. अनाथांची आई नावानं ओळख असलेली एक सर्वसाधारण महिला. तिला पदमश्रीही प्राप्त झाली. कारण तिनं त्या लेकरांना दत्तक घेतलं. ज्या लेकरांना मायबाप नव्हते. ज्यांचे मायबाप मरण पावले होते. अंदाजे तीनचार वर्षापुर्वीची गोष्ट. सिंधूताई नागपूरला आल्या होत्या एका कार्यक्रमाबद्दल. त्यापुर्वीही त्या नागपूरात येवून गेल्या. माझी मुलाखतही झाली. परंतू मी काही तेवढा सिंधूताईला ओळखत नव्हतो. परंतू ज्यावेळी रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात आल्या. तेव्हापासून चांगला ओळखायला लागलो.

  कार्यक्रम होता पुरस्कार वितरण सोहळ्याचा. कोणत्यातरी सीमा राऊत नावाच्या तिच्या लेकीनं सिंधूताईच्या संस्थेला मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजीत केला होता आणि त्या कार्यक्रमात माझे नगरचे मित्र रज्जाक शेख उपस्थीत राहिल्यानं त्यांना भेटण्यासाठी मी गेलो आणि तिथे मी सिंधूताईला पाहिले.मी कार्यक्रमात गेलो तेव्हा सभागृह अगदी गच्च भरलेला होता. त्यातच काही वेळानं सिंधूताई आल्या. अगदी साध्या अवतारात. त्यांनी लुगडं परीधान केलं होतं. त्यातच त्यांच्या डोक्यावर अजूनही लुगड्याचा पदर त्याला आपण गावराणी भाषेत सेव म्हणतो. सिंधूताईला वयानुसार उभं राहता येत नव्हतं. म्हणून की काय त्या बोलतांना खाली बसूनच बोलायला लागल्या.सिंधूताई म्हणाल्या,

  "आपण स्री आहोत. स्रियांनी चांगलं वागलं पाहिजे. चांगले वस्र परीधान केले पाहिजे. डोक्याला कुंकू लावलाच पाहिजे. भांगात कुंकू भरलाच पाहिजे. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. कारण ती आपली संस्कृती आहे. माझ्याकडे बघा. मी विदेश फिरले. तेथील ब-याच महिलांना पाहिलं. त्यात डोक्यावरचा पदर तर सोडाच, त्यांच्या गळ्यात साधं मंगळसुत्र नसतं. डोक्यावरचा कुंकू सोडा, साधी टिकलीही नसते. मी नेहमी मार्गदर्शन करतांना हेच सांगते. ह्या मी सांगीतलेल्या सर्व गोष्टी ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती महान आहे. जर आपली संस्कृती टिकवायची असेल तर महिलांनी या गोष्टी पाळायलाच हव्या." पतीबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या, "पती....... माझा पती...... त्यानं मला भर जवानीत सोडलं. माझा त्याग केला त्यानं. मला चीडही आली त्याची. भयंकर राग होता त्याचा आजपर्यंत मनात. पण कालांतरानं तो निवळला. महिलांनी कधीच राग करु नये. राग मनात धरु नये. संयमी राहावे. मी म्हणत नाही की पतीला परमेश्वर मानावे."असे म्हणतांना सभागृहात भयंकर हशा पिकला. तशा त्या परत म्हणाल्या,

  "मी माझ्या पतीलाही माफ केलं. काही दिवसापुर्वी तो आला माझ्याकडे. म्हणाला, 'मला कोणी पोसायला नाही. मला माफ कर. मी बरंच सतावलं तुला. मी माफी मागण्याच्या लायकीचा नाही. पण आता मी इथे राहायला आलो आहे. माझ्या चुका ओंजळीत घे. त्यावर मी म्हटलं की मी तुला तेव्हाच माफ केलं, जेव्हा तू मला सोडलं. अरे तू जर मला सोडलं नसतं तर आज मी अनाथांची माय झाली नसती. मी आज या लेकरांमुळे सुखी आहे. हं एक सांगतो की तुला जर राहायचं असेल जर माझ्याकडे तर अवश्य राहा. पण इथे राहतांना माझा पती म्हणून राहू नकोस तर एक मुलगा म्हणून राहा. ही अट जर तुला मंजूर असेल तरच तू इथे राहू शकतोस. नाही तर नाही. अन् काय सांगू तुम्हास हे म्हटल्यावर तो माझ्या खांद्यावर ढसाढसा रडला." त्या असं बोलल्यावर थोड्या थांबल्या. समोरील थोडं पाणी प्राशन केलं. तशा त्या पुन्हा बोलक्या झाल्या."गत दोन तीन वर्षापुर्वी तो मरण पावला. त्यातच त्याला अग्नीसंस्कारही मी माझा पती म्हणून नाही तर माझा मुलगा मानूनच केले.लेकरांनो लक्षात ठेवा. सर्वांना माफ करायला शिका. मग ते पती का असेना. कुटूंबात राहतांना भांडणं नित्याचीच असतात. पण त्या भांडणावर नेहमी फूंकर टाकूनच संसाराचा गाडा पुढे हाकावा लागतो. तेव्हाच संसार टिकतो आणि तुम्हीही पोरहो, आपल्या पत्नीला पत्नी म्हणून समजा. तिला संसारात मदत करा. उगाचच भांडणं करु नका. कारण संसार हा केवळ एकट्या स्रीवर टिकत नाही. तो दोघांच्याही मतावर व सहकार्यावर टिकतो.

  तुम्हाला माहित नसेल कदाचित. मी स्मशानात राहिले. तेथील तप्त निखा-यावर पोळ्या शेकल्या. त्या माझ्या लेकरांना चारल्या. पण हिंमत सोडली नाही. मी मुडद्यांना घाबरलो नाही. कुणी म्हणायचे, स्मशानात भुतं नाचतात. ते छळतात आपल्याला. पण मला त्यांनी छळलं नाही. कारण त्यांना वाटत असेल की आमच्यापेक्षा वरचं भुत आज स्मशानात आहे. त्याला कसं छळायचं. मला काही कोणत्या भुतानं त्रास दिला नाही. अन् एक सांगू का? भुतं नसतातच हो. स्मशानात तर नसतातच. भुतं आपल्यातच असतात. तुम्ही आम्ही भुतंच आहो इथले. हो. भुतच बरं का? त्यांच्या या बोलण्यावर सगळे पुन्हा हसले. तशा त्या परत म्हणाल्या,

  "मी काय सांगू तुम्हाला. मी अनपढ बाई. अनुभवातून शिकले. पण बरंच शिकले. एकदा बसमध्ये बसली असतांना मला एका माणसानं म्हटलं.' बाई, तुमचं गाव आलं. मी उतरले तेव्हा त्या रस्त्यावर कोणी नव्हतं. तो माणूसही माझ्यासोबत उतरला. भयाण रस्ता भयाण वाट. मला त्या माणसाचा राग आला. परंतू त्यानं का उतरवलं ते नंतर कळलं. जेव्हा ती बस पुढे गेली व त्या बसवर चक्क वीज कोसळली. त्या बसमधील सर्व मंडळी मरण पावली व मी वाचले. मी हे प्रत्यक्ष पाहिलं. त्यानंतर आजुबाजूलाही पाहिलं. कोणीच नव्हतं. मला त्यानंतर वाटलं की आपल्याला देवानंच उतरवलं. माझं मरण नव्हतं तिथे. म्हणून मी वाचले. मला तर वाटते की कदाचित देवानंच मला पुढील कामं करण्यासाठी जगवलं. मी त्यानंतर उभी झाले. चालायला लागले आणि त्यानंतर सा-याच गोष्टी केल्या. मी गाईला मानते. कारण त्या गाईनं माझ्या पोटावर पाय ठेवला व मी बाळंत झाले. मी गाईला मानते. मी तिच्या संरक्षणासाठी गोरक्षण बांधलं. अनाथासाठी अनाथालये. पण सासवासाठी काही बांधलं नाही.

  लेकींनो लक्षात ठेवा की जशी मी अनाथांसाठी झटते. तसे तुम्ही सासवांसाठी झटा. त्यांना अंतर देवू नका. वृद्धाश्रमात टाकू नका नव्हे तर त्यांची सेवा करा. जसे तुम्ही आईसाठी करता. तसे सासवांसाठीही करा. त्याही तुमच्या आईच आहेत. त्यांना दोन दिवस जगवा. तुम्हाला आशिर्वाद मिळेल."सिंधूताईचं बोलणं संपलं होतं. पण ते मनाला भावून गेलं. त्या चार तारखेला मरण पावल्या. काल त्यांचा अंत्यविधी. महानुभाव पद्धतीनं अंत्यविधी उरकला. त्यांच्या अंत्यविधीला बरेच लोक उपस्थीत होते. महाराष्ट्रीतील सर्व. जणू ती महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील सर्व अनाथ लेकरांची माय होती. त्या आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार आणि त्यांचे अनुभव आजही आपल्या पाठीशी आहेत. राष्ट्रसंतांचे भजनं त्यांना तोंडपाठ होते. आज त्या मरण पावल्या तरी असं वाटत नाही की त्या मरण पावल्या. आजही त्या आपल्यात आहेत असेच वाटते.

  अंकुश शिंगाडे
  नागपूर
  ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code