Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती या यंदाची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीशचंद्र मिर्शा यांनी माध्यमांना दिली आहे. याचबरोबर त्यांनी बसपा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापणार असल्याचा दावा देखील केला आहे.

    माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे ४00 उमेदवार नसतील तर ते ४00 जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे, असे बसपा खासदार सतीश चंद्र मिर्शा यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४0३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १0, १४ , २0, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे.

    १0 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोरोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतीश चंद्र मिर्शा हे एकटेच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अवधपासून पूर्वांचल आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश त्यांनी पिंजून काढला आहे. ब्राह्मण वर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रोग्रॅम आयोजित केले. मात्र दुसर्‍या बाजुला मायावती मात्र ना रॅलीत दिसल्या ना रोड शोमध्ये. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात मायावतींनी निवडणूक न लढवणे हे कोणाच्या पथ्यावर पडणार हे पहावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या