मुंबई : पश्चिम हिमालय परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह काही ठिकाणी हिमवर्षाव होत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत याचा जोर आणखी वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून ४ ते ७ जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. याशिवाय येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ढगाळ स्थिती असून ३ आणि ४ जानेवारीदरम्यान ओडिशा राज्यात देखील थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात जोरदार पावसासह अनेक ठिकाणी हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातील हवामानात झपाट्याने बदल घडत आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीतचा शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. २८ आणि २९ डिसेंबर अशी दोन दिवस शेतकर्यांना वेठीस धरल्यानंतर, राज्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार, राज्यात काही ठिकाणी विरळ ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. राज्यात बर्याच ठिकाणी विरळ प्रमाणात ढग दाटले आहेत.
त्यामुळे आज सकाळपासून तापमानात किंचित घट झाली असून दिवसभर गारवा जाणवत आहे. राज्यात ढगाळ हवामान असले तरी, तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता राज्यात पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.याचबरोबर तामिळनाडू किनारपट्टी, पुडुचेरी, कराईकल याठिकाणी येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र पुढील पाच दिवस कोणताही इशारा देण्यात आला नाही. पण अनेक ठिकाणी राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या