• Mon. Sep 25th, 2023

“स्त्रीमुक्तीच्या लढ्यात दखलपात्र ठरणारी कविता : मुक्त श्वासाच्या शोधात !”

    अमरावतीच्या रत्ना यशवंत मनवरे या नवोदित कवयित्रींचा पहिला वहिला कवितासंग्रह ‘मुक्त श्वासाच्या शोधात’ अलिकडेच प्राप्त झाला. याला डाँ. युवराज सोनटक्के, बेंगलुरु यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाविषयी आपले मत व्यक्त करतांना प्रस्तावनाकार म्हणतात …” रत्ना मनवरे यांच्या ‘मुक्त श्वासाच्या शोधात’ या संग्रहातील कवितेत सामाजिक संवेदनशीलतेच्या विभिन्न अंगाची अभिव्यक्ती आणि व्यक्तिच्या मनातील अंतर्द्वद्वांची ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. यात सहजता व साधेपणाच्या सोबतच जीवनाच्या व्यापक अर्थबोधाची उकल होते. ही कविता असंगती व अमानवतेच्या विरोधात असून अल्प शब्दात आपल्या हळू आवाजात ती सर्वसाधारण बोलचालीच्या भाषेत दैनंदिन घटनांना प्रसतुत करते. ती सरस जीवनाच्या विशिष्ट शक्यतांचा शोध घेते.” यावरून कवितासंग्रहाबाबतची सुस्पष्टता उजागर होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    रत्ना मनवरेची बहुअंशी कविता ही स्त्री मुक्तीची भूमीका मांडते, तीची वेदना, व्यथा,गुलामीविरुद्धचा आक्रोश मांडते . तिची संसारात होत असलेली होरपळ मांडते, ती संस्कृतीच्या व अनिष्ट रुढी परंपरांच्या कोंदनातून मुक्त श्वासाच्या शोधात धडपड मांडते . आजच्या स्त्रीला आपल्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा वाढवून गगनचुंबी उंच भरारी घ्यायची आहे, कवयित्रीला आपल्या लेखणीद्वारा राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई, फातिमा शेख, माता भिमाई, माता रमाई, कल्पना चावला, सुनीता विल्यम, अहिल्याबाई होळकर यांचं कार्य इतर महिलांसमोर मांडायचं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालण्यासाठी प्रेरीत करायचं आहे. त्यासाठी स्त्री रुढीवादाच्या जोखडातून मुक्त झाली पाहिजे, ही तळमळ रत्ना मनवरेची कविता मांडतांना दिसते.

    “फातिमामाई अंधारातली तू उजेडवाट
    क्रांतिज्योती तुला ज्ञानाची साथ
    शिक्षणाचा प्याला दिला काठोकाठ
    सन्मानाने प्रत्येक स्त्री चालते ताठ !”

    या आदर्शवादी प्रतिमांचा आदर्श घेऊन आम्हीही काहीतरी केलं पाहिजे, असं कवयित्रीला वाटतं. ज्यांच्यामुळे स्त्री शिक्षणाची दारं समस्त स्त्री वर्गासाठी उघडी झाली, त्यांचे विचार समाजमनात शब्दरुपाने पेरून त्यांच्या समाजकार्याची ज्योत आपण अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे, यासाठी कवयित्रीची धडपड आहे . मानवी जिवनात ती आईचं अनन्यसाधारण असलेलं महत्व ‘आईची माया’ या अभंग रचनेतून अधोरेखीत करते.

    “आईच्या मायेला । नाही कुठे मोल
    आहे अनमोल । सा-या जगी ।। (पृ.२७)

    आईची थोरवी अनेक साहित्तिकांनी वर्णन केली आहे. आई ही घराचा कणा असतो .तिच्याशिवाय घराला घरपण नसते. परंतु समाजाकडून ती शतकानुशतके उपेक्षीत राहिलेली आहे. चुल आणि मुल एवढंच तीचं कार्यक्षेत्र समजल्या जायचं. पण अलीकडे स्त्री शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचारामुळे स्त्री शिक्षीत होऊन अनेक क्षेत्रात तिने तिच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेला दिसतो. हे बळ तिच्यामध्ये कसं आलं ? कुठून आलं ? याची आठवण होणे क्रमप्राप्त आहे. हे बळ महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीमाई, फातिमाई आणि घटनाकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळे मिळालं. म.फुले यांनी १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि बाबासाहेबांनी या कार्याला संविधानात कायद्याद्वारे बळकटी दिली. हे त्यांचे कार्य विसरून चालणार नाही. म्हणून ‘मुक्त मी’ या कवितेतून कवयित्री त्यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त करतांना दिसते.

    “बाबासाहेब ज्योतिबाची ज्योत लावते
    प्रकाशित होऊन बंधनातून मुक्त मी !
    अन्यायाच्या विरुद्ध कायम बंड करते
    न्यायाने पंख लावून मुक्त भरारी घेते मी !” (पृ. ५०)

    स्त्री शिक्षणाची चळवळ अनेक विचारवंत, थोर महापुरुषांनी नेटाने चालविली. हे त्यांचे कार्य वाया जाऊ नये, याची दखल समस्त स्त्री वर्गाने घेऊन ती चळवळ पुढे नेण्यास अग्रेसर असलं पाहिजे, असे कवयित्रीला वाटते. परंतु बहुजन समाजातील बहुतांश स्त्रीया अजुनही जुन्या मानसीकतेतच अडकलेल्या दिसतात. त्यांनी हे महापुरुष वाचून डोक्यात घेण्याची गरज आहे. एके काळी अज्ञानातून स्त्री भ्रूणहत्या फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या.परंतु अलीकडच्या काळात कायद्यांमुळे या कृतीला आळा बसलाय खरा पण अजुनही फारसी मानसीकता बदलेली दिसत नाही. त्यासाठी स्त्रीनेच खंबीर होऊन मुलीचे रक्षण करने गरजेचे आहे, असे कवयित्रीला वाटते.

    “गर्भातल्या आईला जन्माला घालू
    चल आपण माणुसकीचा धर्म पाळू ! “(पृ५२)

    स्त्री संरक्षणाचा आशावाद प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होण्याची गरज आहे. स्त्रीयांमध्ये माया, ममता, प्रेम, करुणा, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, सहनशीलता, संवेदनशील, परोपकार, त्याग हे गुण असतात. त्यामुळेच कदाचित तिचे थोरपण वाखाणण्याजोगे आहे . पण तिने तिची स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याकरीता सिद्ध झालं पाहिजे .पुरुषांनी, कुटुंबाने, समाजाने तिला अपेक्षीत सहकार्य केलं तर कौटुंबीक जबाबदा-या पेलून ,घराबाहेर पडून ती आपली नवी ओळख निर्माण करू शकेल, असं कवयित्रीला वाटल्यास नवल नाही.
    ‘नवी ओळख ‘ या कवितेतील काही ओळी महत्वपूर्ण वाटतात.

      “ऊठ तू
      कलागुणांना दे आकार
      तुझ्या स्वप्नांना कर साकार
      परिवर्तन मशालीने मिटव काळोख
      तुझ्यातल्या तू ला दे नवी ओळख !”

      आज या क्रांतिकारी निर्धाराची खरी गरज आहे. स्त्रीला सजगतेचा इशारा देण्याची गरज आहे, तिचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. स्त्रीया शिकल्या ,नोकरीत लागल्या, चार पैसे कमावत्या झाल्या, स्वावलंबी झाल्यात. पण समाजकार्यात त्यांची संख्या नगन्य दिसते. ज्या स्वावलंबी आहेत त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे . कविता,लेख, पुस्तके लिहून, सभा, संमेलने ,चर्चासत्राचे आयोजन करून तिचे प्रबोधन करता येईलच पण एका स्त्रीचा दुस-या स्त्रीशी प्रत्यक्ष संवाद व्हायला पाहिजे. एका स्त्रीने दुस-या स्त्रीची व्यथा, वेदना, अडचण समजून घेऊन, त्यातून तिला मुक्त करण्याकरीता सज्ज झालं पाहिजे. तेव्हाच ही चळवळ अधीक पुढे जाऊ शकेल. याच मार्गाने एक पाऊल पुढे टाकीत कवयित्री ‘भारतीय स्त्री शक्ती’ या रचनेतून महिलांना सशक्त होण्यासाठी आवाहन करताना म्हणते….

      “होऊ नको हतबल हो सर्व शक्तीशाली
      सावित्री, रमाईसारखी हो बलशाली तू !”

      महिलांना जागविण्याचं काम, बळ देण्याचं काम हे विविध मार्गाने निरंतर चाललं पाहिजे. आता स्त्रीने काही काल्पनीक कथांमध्ये, कर्मकांडात न अडकता सज्ञानपणाची चुनूक दाखविणे गरजेचे आहे.त्यासाठी परिवर्तनवादी विचाराची लस देण्याची गरज कवयित्रीला वाटल्याशिवाय राहत नाही.

      “ती बोलते
      सावित्री, जिजाऊ, रमाई वर
      जगण्यात असतो
      रुढी परंपरा जपण्यावर भर !
      तीला शिक्षीत म्हणू
      की म्हणू अडाणी
      कोणती लस देऊन तिला
      बनवावे संपूर्ण ज्ञानी !”

      विचाराने अर्धवट परिवर्तीत होऊन समाजात परिवर्तन होणार नाही . केवळ लाभ घेऊन बाकी जसं होतो तसंच राहिल्याने हा लढा पुढे जाणार नाही . त्यासाठी जगाकडे उघड्या डोळ्याने, डोळसपणे बघावं लागेल . ही धारणा कवितेतून व्यक्त होते . कवयित्री आई, वडील, शेतकरी, कष्टकरी, संविधान, पळस, पाऊस, प्रेम, निसर्ग, समता, महाराष्ट्र राज्य, यासोबतच बुद्ध, फुले, बाबासाहेब, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, शिक्षक, कोरोणा, यांच्याविषयी वर्णनात्मक रचनाही लिहीतात . ज्या कर्मयोगी संत गाडगेबाबांनी आपल्या साध्यासोप्या व-हाडी बोलीतून परिवर्तनाचा मंत्र लोकांना दिला, तो खरोखरच परिणामकारक होता.

      “हातात काठी डोक्यावर गाडगे,
      पेहराव तुझा ठिगळाचा
      स्वच्छ केला गाव,देश
      आदर्श घ्यावा गाडगेबाबांचा !”

      कर्मयोगी संत गाडगेबाबा अशिक्षीत होते परंतु आज त्यांचं कार्य अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांनी त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाऊन समाजाला तुकोबारायांच्या अभंगातून आणि इतर समाजसुधारकांच्या कार्याचे दाखले देत समाजप्रबोधन केले .शिक्षणाचं ,स्वच्छतेचं, महत्व विषद करून देव वगैरे या संकल्पना मिथ्या आहेत,अंधश्रद्धा बाळगू नये, हे उदाहरणे देऊन पटवून दिले. त्यांनी दहा सुत्री कार्यक्रम राबविला यासाठी त्यांनी समाजाकडून दान गोळा करून वसतीगृह, शाळा, गोरक्षण, अनाथालये, सदावर्ते बांधून खरी समाजसेवा केली . पण स्वतः एकाही पैशाला हात लावला नाही की कुणाला लाऊ दिला नाही. आज त्यांच्या नावाने विद्यापीठं चालतात . बाबांचं हे कर्तृत्व समाजासाठी अविरत प्रेरणादायी ठरते. शेवटी थोर महापुरुषाच्या कार्याचा वसा हाती घेत ते कार्य पुढे नेण्याचा मनोदय व्यक्त करीत कवयित्रीची कविताही स्त्री मुक्तीच्या मार्गावरून , मुक्त श्वासाच्या शोधात प्रवासाला निघालेली आहे. स्त्रीयांना मुक्त श्वासाचे जगणे मिळवून देण्यासाठी तिची धडपड सुरू असल्याचे जाणवते.

      “सावित्रीचा वारसा वसा
      लेखणी आहे हातात
      तोडून श्रृंखला गुलामीच्या
      मुक्त श्वासाच्या शोधात !” (पृ.११२)

      कवयित्रीची कविता समस्त स्त्री वर्गाला आपल्या लेखणीच्या बळावर अंधारातून उजेडाच्या दिशेने घेऊन जाऊ इच्छिते, ही भूमीका जगणा-यांनाच ख-या अर्थाने ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’, असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होईल. स्त्रीमुक्तीच्या या लढ्यात रत्ना मनवरेंची कविता निश्चितच दखलपात्र ठरेल असा आशावाद व्यक्त करीत स्त्री या जोखडातून पूर्णतः मुक्त होऊन तिचा मुक्त श्वासाचा शोध कधितरी थांबावा,अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कवयित्रीचा हा पहिला प्रयत्न निश्चितच वाचकांच्या पसंतीस उतरेल, असे वाटते. मनवरे यांनी आपल्या रचना अनेक काव्य प्रकारात शब्दबद्ध केलेल्या आहेत. कवितेतील साध्या सोप्या शब्दयोजन शैलीचे तंत्र सामान्य वाचकांपर्यंत तिची कैफियत निश्चितच पोहचवेल. एकूण ८० रचनांचा समावेश या कवितासंग्रहात आहेत. तसेच डाँ.हबीब भंडारे यांचा अभिप्राय अतिशय बोलका आहे. मुखपृष्ठ अरविंद शेलार यांचे तर रेखाटने संजय ओरके यांचे आहेत. परिस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेल्या कवितासंग्रहाला मंगलकामना देऊन अधिक वाचन, अवलोकन, चिंतन, मनन करून नव्या दमाने व्यापक संदर्भासह साहित्यकृती निर्माण करण्यासाठी शुभेच्छा देतो.

      अरुण ह. विघ्ने
      रोहणा, आर्वी, वर्धा
      मो.९८५०३२०३१६
      ———————————
      ◾️कवितासंग्रह : मुक्त श्वासाच्या शोधात
      ◾️कवयित्री : रत्ना यशवंत मनवरे
      ◾️प्रकाशन : परिस पब्लिकेशन, पुणे
      ◾️पृष्ठसंख्या : ११२
      ◾️मूल्य : १५०/-₹

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,