परिस्थिती बदलू शकते. आधी आपल्याला स्वतःला बदलवता आलं पाहिजे. संपत चाटे यांचा जीवन प्रवास त्याचेच निदर्शक आहे. कुठलाही शैक्षणिक वारसा आणि कुटूंबात सक्षम आर्थिक आधार नसताना त्यांनी परिस्थितीचा सामना करीत कष्ट करीत शिक्षण घेतले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्वतःला सिद्ध केले. आता ते सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोगार) या पदावर कार्यरत आहेत. जाणून घेऊ या त्यांच्या याच संघर्षपूर्ण प्रवासाविषयी..
संपत चाटे यांचा जन्म रुम्हना ता. सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. आई – वडील अशिक्षित. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. इयत्ता आठवी ते दहावीचे शिक्षण त्यांनी गावाशेजारील श्री शिवाजी हायस्कूल जांभोरा येथे दररोज पायपीट करीत पूर्ण केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण मेहकरच्या एम. ई. एस. कॉलेजमधून पूर्ण केले.बालपणापासूनच ते शिक्षणात हुशार होते. चौथीत असताना त्यांचे शिक्षक यु. के. खरात गुरुजींनी त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले. त्यात ते पास झाले. चौथी ते सातवी पर्यंत शिष्यवृत्ती मिळत गेली आणि शिक्षणाचा त्यांचा हुरूप वाढला. ते सांगतात की, प्राथमिक शाळेत शिकत असताना गावाशेजारील देवखेडचे शिक्षक जनगणना करण्यासाठी आले असता त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत फिरून उत्साहाने त्यांना गावाची खडानखडा माहिती सांगितली होती. घरे दाखवली होती. त्यांच्या या हुशारीचे त्यावेळी शिक्षकांना फार कौतुक वाटले होते. दुसऱ्या दिवशी शिक्षक राहिलेली जनगणना पूर्ण करण्यासाठी गावात आले असता त्यांनी संपतचा शोध घेतला तर त्यांच्या लक्षात आले की, घरच्यांनी त्यास शेतात पिटाळले आहे तेव्हा शिक्षकांनी थेट शेतात जाऊन घरच्यांना विनंती करुन त्यास सोबत घेतले होते.
चाटे परिवाराकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. त्यातून परिवाराचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. अशा परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी गावात सालदाराचे काम केले. आई बाबांच्या खडतर संघर्षाची बालपणात संपत चाटे यांना जाणीव झाली. गावात कुड- मेडकीचे घर होते. पावसाळ्यात छप्पर गळायचे. अशा भयंकर प्रतिकूल वातावरण संपत चाटे यांचे बालपण गेले. बारावी नंतर त्यांनी औरंगाबादला सरस्वती भुवन कॉलेजला बीएससी साठी प्रवेश घेतला. अंतिम वर्षाची परीक्षा देऊन ते घरी आले आणि याच दरम्यान त्यांची आई आजारी पडली. आपण जगणार नाही असे समजून तिने हाय खाल्ली. माझ्यासमोर माझ्या एकुलत्या एका लेकाचे लग्न झाले पाहिजे, त्याचे हात पिवळे झाले पाहिजे म्हणून तिने हट्ट धरला… आणि नाइलाजाने शिक्षण पूर्ण होण्याच्या आतच संपत यांना आईच्या आग्रहाखातर लग्नाच्या बेडीत अडकावे लागले. बीएससी व्हायच्या आतच घरच्यांनी लग्न लावून दिले. पुढे शिकावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला. बिएससीला असतांना कोरान्ने सर यांनी संपत चाटे यांना खूप मदत केली. एस. बी. कॉलेजला शिक्षण घेतांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात त्यांची जडणघडण झाली. त्यावेळी संस्थाअध्यक्ष गोविंदभाई श्रॉफ या शिबिराच्या समारोपाला येत. ते विद्यार्थी वर्गाला छान मार्गदर्शन करीत.
लग्न झाले तरी संपत चाटे यांनी एम. एस्सी. करण्यासाठी औरंगाबाद गाठले. तिथल्या एका कारखान्यात अर्धवेळ नोकरी केली. सकाळी सात ते अकरा विद्यापीठात शिक्षण आणि दुपारी फॅक्टरीत अर्धवेळ नोकरी. पगार फक्त दिडशे रुपये. त्यात स्वतःचे भागवणे मुश्किल. बायको घरी आणि स्वत: औरंगाबादला. ना तिला औरंगाबादला आणू शकत ना स्वतः गावी राहू शकत. आयुष्याची कोणतीही शाश्वती नव्हती जणू अज्ञातांकडून अज्ञाताकडे प्रवास सुरू होता. कारखान्याचे मालक मात्र खूप प्रेमळ होते. अरुण ठकार हे त्यांचं नाव. त्यांनी संपत चाटे यांना यशस्वी जीवनाचे अनौपचारिक धडे दिले. पुढे पगारही वाढविला. कारखान्याच्या नोकरी संपत चाटे बऱ्यापैकी रुळले असतानाच नेमके त्याकाळी बजाज कंपनीला टाळे लागले. सुस्थितीत जीवन जगणाऱ्या कामगारांचे जीवन धोक्यात आले. बजाज सारख्या सुरक्षित ठिकाणच्या कामगारांच्या आयुष्यात अशी अस्थिरता येऊ शकते तिथे आपली काय बिशाद? याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली. त्यामुळेच त्यांनी बी. एड. करण्याचा निर्णय घेतला. गंगाखेडला बीएड केले. नेमक्या याच काळात त्यांच्या रूम्हना गावचे भूमिपुत्र तोताराम कायदे हे आमदार होते. त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांना चाटे परिवाराच्या संघर्षपूर्ण परिस्थितीची आणि संपत चाटे यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती होती. त्यांनी चाटे यांना त्यांच्या संस्थेत शिक्षकाची नोकरी दिली.
शिक्षक झाल्याचा एकीकडे आनंद असला तरी पगाराची मात्र काही वर्षे प्रतीक्षा करावी लागली. कारण शाळेला अनुदान मिळालेले नव्हते. पुढे १९९६ साली अनुदान मिळाले आणि थोडी आर्थिक स्थिरता आली. याचदरम्यान संपत चाटे यांनी एम एस डब्ल्यू शिक्षणक्रम पूर्ण केला. पुढे राज्य शासनाच्या लोकसेवा आयोगाकडून वर्षे १९९८ मध्ये थेट भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार त्यांनी फॉर्म भरला. मुंबई येथे मुलाखत झाली. मुलाखतीत त्यांनी बिनधास्त आणि नि:संकोच उत्तरे दिली. त्यामुळे त्यांची जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारीपदी निवड झाली. प्रशिक्षणानंतर त्यांना पहिलीच नेमणूक लातूरला मिळाली. विलासराव देशमुख तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. संपत चाटे यांना सचोटीने काम करण्याची पहिल्यापासून सवय होती. त्याची चुणूक त्यांनी खात्यात दाखवून दिली. तो काळ म्हणजे संगणक युगाचा आरंभ काळ होता. सरकारी कार्यालयांचे संगणकीकरण सुरू होते. कर्मचारी प्रशिक्षणास सुरुवात झाली होती. संपत चाटेसर यांनी लातूरमधील त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विक्रमी वेळेत संगणक प्रशिक्षण पूर्ण केले. स्वतःही संगणकाचे शिक्षण घेतले. दरम्यान पुणे येथे खात्यांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात राज्याच्या सनदी अधिकारी तथा तत्कालीन सेवा योजन विभागाच्या संचालक वंदना कृष्णा यांनी त्यांची खात्यातील कामाचे संगणकीकरण करण्याची जबाबदारी सोपवली. त्यात त्यांनी जीव ओतून काम केले. त्यामुळेच राज्यातील सेवायोजन नोंदणी कार्यालयापुढील तरुणांच्या रांगा बंद झाल्या.
संपत चाटेसर यांचा प्रवास अतिशय हलाखीच्या स्थितीतून झाला. आपल्या शिक्षण काळात मदतीला आलेल्या यु. के. खरातसर, एस. एन. खरात सर, किसन सरकटे सर आणि कोरान्ने सर यांच्याबद्दल त्याला अतीव आदर आहे. शिक्षणानेच यावर त्यांनी मात केली. पुढे संधी मिळताच ते राज्य शासनाच्या सेवेत दाखल झाले. शासन सेवेत त्यांनी वरिष्ठांचा विश्वास प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांनी खात्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नवी मुंबई, नाशिक ला दीर्घ सेवेनंतर सध्या ते जालना येथे सेवारत आहेत. मध्यंतरी खात्याअंतर्गत त्यांना केरळ आणि बंगलोर या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक माहिती जाणून घेतली. आपल्या जीवन विषय प्रवासाबद्दल ते समाधानी आहेत. ते म्हणतात, ‘इमानदारी व प्रामाणिकपणे काम केल्याने मला संधी मिळाली. कोणतेही काम कठीण नाही आणि जीवनात अशक्य असे काहीच नाही. गरज आहे फक्त स्वतःला सिद्ध करण्याची’
सरांच्या गावातील कुडा- मेडकीच्या घराच्या जागी त्यांनी आता सुंदर घर बांधले आहे. त्यांच्या मुलांनीही उच्च शिक्षण घेतले आहे. अधिकारी पदाचा कोणताही गर्व त्यांच्याकडे नाही. समोरच्या व्यक्तीचे काम करण्यासाठी शासनाने आपल्याला नेमले आहे त्याचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे, असे ते मानतात. गरिबी हेच आपले बलस्थान असल्याचे ते म्हणतात. कदाचित परतीचे दोर कापले असल्याने व स्वतःला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नसल्याने संपत चाटेसर यांनी परिस्थितीवर मात केली. अडचणी सर्वांनाच असतात; गरज आहे त्यातून बाहेर पडण्याची.
संपत चाटे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. परिस्थितीवर मात करून उभे राहता येते हे सांगणारा आहे म्हणूनच मला तो आजच्या काळात तरुणाईसाठी अधिक महत्त्वाचा तद्वतच ‘आश्वासक’ वाटतो. त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…
- (जिज्ञासूंसाठी संपत चाटे यांचा मो. क्र.9821823556)
- – रविंद्र साळवे
- बुलडाणा
- मो. 9822262003