राज्यात मास्क वापरणे बंधनकारकच

    अजित पवारांनी अफवांना दिला पूर्णविराम

    पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती देऊन याबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली होती. यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. मास्कबाबत चर्चा झाली नाही. काल काही चॅनेलवर बातम्या चाललेल्या. पण तसे काही नाही. मास्क वापरायलाच हवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    पुण्यातल्या शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. पुण्यात पहिली ते ८ वी पयर्ंत चार तासच शाळा भरवली जाईल. नववीच्या पुढे पूर्ण वेळ शाळा सुरु होईल. पण सर्व नियम पाळूनच शाळा सुरु होतील. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे. १0 व १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

    याबाबत शिक्षणमंत्री निर्णय घेतील. पुणे जिल्ह्यात लसीकरण १ कोटी ६१ लाख झाले आहे. शाळांत लसीकरण मोठ्या प्रमाणात करणार आहे. ५ मेट्रिक टन ऑक्सिजन फक्त आता लागत आहे. नियम पाळून पर्यटन ५0 टक्के सुरू राहील, असेही ते म्हणाले. एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. एसटी कर्मचार्‍यांना पगारवाढ दिली आहे. यामुळे एसटी आता पूर्वपदावर यायला पाहिजे. एसटी बाबत अनिल परब यांनी शेवटची संधी दिली. माझी कामगारांना विनंती आहे की सर्वसामान्यांसाठी सामंजस्यची भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मॉल, सुपर मार्केट आणि किराणा स्टोअर्समध्येही वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अर्थात, वाईन विक्रीसाठी किराणा स्टोअर किंवा सुपर मार्केटचा आकार एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असण्याची अट घालण्यात आली आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर भाजपने मात्र जोरदार टीकास्त्र सोडले होते. सरकार पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारूला सवलती देत असल्याचे भाजपने म्हटले होते. यावर अजित पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. वाईन आणि दारुमधला फरक ओळखला पाहिजे, असे भाष्य त्यांनी केले आहे. वाईन आणि दारू यात फरक आहे. उगाच गैरसमज केला जातोय. अनेक गोष्टीतून वाईन तयार केली जाते. वाईन पिण्याचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. काही लोक व्हिडिओ काढून सरकारविरोधी प्रचार करत आहेत. जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.