• Tue. Jun 6th, 2023

भारत विद्वानांचा देश ; परंतू दखल शुन्य..!

  * डिसलेसारखे बरेच गुणवंत भारतात; मात्र कदर नाहीच

  सध्या जिल्हा परीषद शाळेत शिक्षक असलेले डिसले हे शिक्षणविभागात चर्चेचा विषय झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील संशोधन. त्यांना ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाला. त्यामुळं ते चर्चेत आले. त्याहूनही चर्चेत आले ते अमेरिकेतील मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळं. अमेरिकेने त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यामागे म्हणणं मांडलं की डिसलेंनी संशोधन करण्यासाठी अाणखी शिकावं. जेणेकरुन आणखी ब-याच मोठ्या प्रमाणात संशोधन करता येईल. परंतू या अमेरिकेत जाण्याला सोलापूर येथील शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांचा विरोध होता. तो सध्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे मावळला आहे.

  डिसले हे सोलापूरमध्ये जिल्हा परीषदेच्या शाळेत लागलेले जिल्हा परीषद शिक्षक आहेत. ते संशोधन करीत होते. त्यातच त्यांच्या संशोधनाची विदेशी लोकांनी दखल घेत त्यांना पुढील शिक्षणासाठी पर्याय उघडा करुन दिला. परंतू याच भारत देशातील काही मंडळींच्या कुरघोडी पणानं डिसलेवर ठपका ठेवून त्यांच्या प्रगतीला आड आणलेला आहे असे दिसून येत आहे.

  डिसले यांनी शिक्षणासाठी सहा महिण्याची सुटी मंजूर करावी अशी शिक्षणाधिकारी साहेबाला विनंती केली. परंतू त्यांनी २०१७ साली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रावर प्रतिनियुक्ती केली असतांना त्यामध्ये तीन वर्ष गैरहजर असल्याचा ठपका ठेवीत त्यांच्या सहा महिण्याच्या सुट्ट्या नाकारल्या व त्यांच्या प्रगतीला कुठेतरी झळ पोहोचली. यामध्ये समजा त्यांच्या या प्रगतीच्या टप्प्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड जर धावून आल्या नसत्या तर डिसले यांचा मार्ग मोकळा झाला नसता.

  डिसलेसारखी मंडळी ही केवळ सोलापूरातच नाही तर जगात आहेत. एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी आनंदवनाचे संस्थापक बाबा आमटेंना रमन मैगसेसे पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्या जिल्ह्यातील जिल्ह्याधिकारी साहेबांनाही प्रश्न पडला होता की हा बाबा आमटे नेमका कोण? त्या पुरस्कारापासूनच बाबा आमटेंची ओळख जगालाच नाही तर भारताला झाली. पुढे बाबा आमटेंना अनेक पुरस्कार मिळाले.

  या भारतात असाही एक व्यक्ती आहे की जो उजेडात आला नाही. त्यानं तर कोरोनाच्या काळात आपल्या कमाईतील दहा टक्के वेतन विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक आणि पुस्तकाच्या रुपानं दिले. त्याचं नाव आहे सत्येंद्र. हा व्यक्ती उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कोटतल्ला इथे राहतो. तो प्रत्येक महिण्यात शाळेसाठी वेतनातील दहा टक्के पैसा शाळेला लावतो. आता कोणी म्हणतील की आम्हीही आमच्या वेतनातील दहा टक्के रक्कम शाळेसाठीच तर संस्थाचालकांना देतो ना. बरोबर आहे. परंतू ही आपण दहा टक्के संस्थाचालकाला जी रक्कम देतो. त्यात संस्थाचालक आपलाच विकास करतो. शाळेचा विकास करीत नाही.

  दुसरं नाव ज्यांना आता २०२० चा पद्म पुरस्कार मिळाला आहे तो कर्नाटकातील व्यक्ती हरेका हजाब्बा. या व्यक्तीनं गावात शिक्षणाची सोय नाही म्हणून शाळा उघडली. स्वतः फळं विकली व आलेल्या पैशातून शिक्षकांचे वेतन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही नाव या यादीत आहे. त्याचं कारण त्यांनी सोडलेली नोकरी. डिसले सारखं लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतांना बाबासाहेबांनी तर नोकरीच सोडली होती.

  अजूनही अशा ब-याच व्यक्ती आहेत की ज्यांची देशात कदर होत नसल्यानं ते विदेशात जात आहेत. तिथे गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळवीत आहेत. डिसलेसारखे असे अनेक संशोधक आहेत की जे संशोधनानं विदेशात मोठे झाले. ज्यांचे जन्म आणि शिक्षणही भारतात झाले.शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचा विचार केल्यास आजही याच देशातील कितीतरी शिक्षणसंस्थात डिसलेसारखे प्राध्यापक आहेत. परंतू आजही या संस्थेच्या शाळेत त्यांना इज्जत नाही वा त्यांच्या गुणांची प्रशंसा केली जात नाही वा त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळत नाही. अशा विज्ञानाच्या कितीतरी स्पर्धा होतात. ज्यामधून विद्यार्थी उच्चदर्जाचं बक्षीस घेवून येतात. यात प्रेरणा कोणाची असते तर ती शिक्षकांचीच म्हणावी लागेल. आजही अशा संस्थेच्या शाळेत असे कितीतरी प्राध्यापक, शिक्षक आहेत की ज्यांचे रोजचे लेख वर्तमानपत्रात येतात. तसेच त्यांची कितीतरी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तिही संशोधनात्मक. तरीही त्यांची ना संस्थेत कदर आहे. ना शिक्षणाधिकारी दखल घेतो ना सरकार. डिसलेंची तरी दखल घेतली असती का? तर याचं उत्तर नाही असंच आहे.

  ज्यावेळी जनमत डिसलेंना न्याय मिळवून देण्यासाठी धावून आलं. तेव्हा डिसलेंना न्याय मिळाला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण डिसलेंवर अमेरिकेत जाण्यासाठी सुट्ट्या मंजूर करीत असतांना अन्यायच होत होता. यात सुट्ट्या मंजूर झाल्या नसत्या आणि डिसले जर अमेरिकेत शिकायला गेले नसते तर त्यांच्या हातून संशोधन झाले नसते काय? नक्कीच झाले असते. परंतू त्या संशोधनाला राजमान्यता मिळवितांना त्रास झाला असता.

  आज अशी कितीतरी मंडळी आहेत की जे लिहितात. परंतू त्यांच्याकडे पी एच डी सारखी पदवी नाही. त्यांचं लिहिणं हे पि एच डी धारकांना लाजवेल असं असतं. अगदी संशोधनात्मक लिहिणं. परंतू त्यांच्याकडे पी एच डीची पदवी नसल्यानं त्यांनी लिहिलेल्या कित्येक चांगल्या गोष्टी या लिहिण्याच्या बाजारात खपत नाही. कारण आज लिहिण्यासाठी पी एच डी पदवी म्हणजे एक लायसन झाल्यासारखी वाटते. तसंच असं पी एच डी धारकांना लाजवेल असे लिहिणारे शिक्षक हे संस्थेच्या शाळेत असल्यामुळं ते कितीही चांगलं लिहित असले तरी त्यांची संस्था दखल घेत नाही. मग इतर घटक का बरं दखल घेतील?

  आज देशातील स्थिती अशी आहे की घराच्या आजूबाजूलाच कोणी गुणसंपन्न व्यक्तीमत्व राहात असेल आणि ते व्यक्तीमत्व फुलत असेल तर त्याचे पाय ओढण्याचे काम आजुबाजूची मंडळी करीत असतात. आता डिसलेंचच उदाहरण घ्या.महत्वाची गोष्ट अशी की ते काय अमेरिका शिष्यवृत्ती देईल डिसलेंना. आपला देशच विद्वान तयार करणारी खाण आहे. इथे बरेच विद्वान घडले. येथील तक्षशिला व नालंदात कितीतरी तरुण शिकले व ते संशोधनात अजरामर झाले. इथेच संत ज्ञानेश्वर, कान्होपात्रा, संत एकनाथ, नामदेव तुकाराम घडले आणि इथेच शिवराय. इथेच संभाजी महाराज घडले आणि इथेच राजा दाहिर आणि महाराज पृथ्वीराज. अन् आपली अब्रू लुटली जावू नये यासाठी जोहार करणारी राणी पदमावती आणि संयोगीताही याच भुमीतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, वीर सावरकर, भगतसिंग, गोपाळ आगरकर, राजा राम मोहन राय, स्वामी विवेकानंद नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद अशी कितीतरी नावं घेता येतील की जी या देशात जन्मालाच आली नाही तर घडलीही. ती मंडळी इथेच लहानाची मोठी झाली. प्राथमिकच नाही तर महाविद्यालयीन शिक्षण ही ती मंडळी इथेच शिकली.

  महत्वाचं सांगायचं म्हणजे हा शूरवीरांचाच देश नाही तर रणरागीणींचाही देश आहे. या भुमीत सुजाता, आम्रपाली पासून तर राणी लक्ष्मीबाई, सावित्री, अहिल्याबाई, जीजाबाई, रमाबाई, सवितामाई अशा कितीतरी महिला झाल्या की ज्यांनी आपल्या देशाला समृद्ध ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं.

  खरं शिक्षण हे याच देशात आहे की ज्यातून असे बरेच वीर घडले. त्यात स्रीयाही अग्रक्रमानं पुढे असतांना आणि याच देशातील भुमीमध्ये विद्वानांची खाण जन्मास येत असतांना तसेच याच भुमीत गाजलेली तक्षशिला व नालंदा विद्यापीठं असतांना तसेच याच भारतात पुर्वी शिक्षणासाठी विदेशातून लोकं येत असतांना आज भारतावर अशी अवकळा यावी की आपल्याला विदेशात शिकायला जावं लागावं आणि तेथील शिष्यवृत्ती मिळवावी. ही भारतासाठी शोकांतिकाच आहे. खरं तर हे विद्वान शिकून निर्माण होत नाहीत. ते विद्वानांचे गुण जन्मतःच असतात. ती जन्मतःच विद्वान निर्माण करण्याची ताकद भारतीय भुमीत आहे.

  आजही भारतात विद्वान निर्माण होवू शकतात नव्हे तर होत आहेत. फरक एवढाच आहे की अशा विद्वांनाना आपण पाहिजे तसं वातावरण देत नाही. म्हणून की काय, त्यांना विदेशात जावं लागलं. निव्वळ शिकण्यासाठी नाही तर उदरनिर्वाह करण्यासाठीही.
  महत्वाचं म्हणजे भारत ही विद्वानांची खाण असतांना व येथील माती पवित्र असतांना या मातीशी बेईमानी करुन कोणाला वाटते विदेशात जावं. कोणालाच वाटत नाही. तरीही आमची भावी पिढी विदेशात जात आहे. ही शोकांतिकाच आहे. तेव्हा याचा सारासार विचार सरकारनं करावा व तसा विचार करुन पावले उचलावीत. तसं वातावरणही तयार करावं. जेणेकरुन भारतीय लोकं कदापिही विदेशात जाणार नाहीत. मग संशोधनात्मक कार्य असो वा शिक्षण असो. उदरनिर्वाहाचं कार्य असो की अजून कोणते? भारत हा एक असा देश आहे की जो विद्वान तयार करतो हे कालही जगाला माहित होते. आजही माहित आहे. उद्याही माहित असायलाच पाहिजे यासाठी आपणच स्वतः प्रयत्न कराला हवा व त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

  -अंकुश शिंगाडे
  नागपूर
  ९३७३३५९४५०
  (Images Credit : Essay ki Duniya)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *