ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन

    पुणे : सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्र परिवार आहे. काही दिवसांपूर्वी आजारामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अनिल अवचट यांचा जन्म १९४४ मध्ये पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एमबीबीएसची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येते.

    अवचट यांनी केवळ साहित्य विश्‍वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचे योगदान दिले. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले होते, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. अवचट यांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार तसंच त्यांना महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (२0२१) मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.

    डॉ. अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी राहिले. अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकायार्ने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.

    डॉ. अवचट हे स्वत: पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.

    अवचट यांच्या कार्याचा वसा पुढेही चालू राहील – डॉ. आनंद नाडकर्णी

    डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कायार्चा वसा यापुढे सुद्धा असाच पुढे चालू राहील, असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दु:खद बातमी सांगताना दिला.

    एक चांगला माणूस हीच ओळख जपली :फडणवीस

    प्रख्यात लेखक- सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल अवचट यांच्या निधनावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला. ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रख्यात लेखक आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ अनिल अवचट यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. लेखक, सामाजिक कार्य म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून आपण येणार्‍या पिढ्यांना माहिती असावे, असे ते नेहमी बोलून दाखवीत. तीच ओळख जपण्याचे कार्य त्यांनी केले. मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला.त्यांनी पत्रकारिता सुद्धा केली. पण त्यातील व्यावसायिकतेला कायम विरोध केला. वंचितांचे प्रश्न सोडविणे याला ते कायम महत्त्व देत. त्यांना भावपूर्ण र्शद्धांजली.

    डॉ. भारती पवार यांना शोक

    डॉ अनिल अवचट यांच्या निधनावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शोक व्यक्त केला. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना डॉ भारती म्हणाल्या की, ह्ल ज्येष्ठ लेखक, समाजसेवक, पत्रकार डॉ.अनिल अवचट यांचे निधन झाल्याची वेदनादायी बातमी समजली. त्यांच्या निधनाने उत्तम वक्ता, व्यसनमुक्तीसाठी धडपड करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व हरपले.डॉ.अवचट यांना भावपूर्ण र्शद्धांजली, अशा शब्दात त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्यात.