• Fri. Jun 9th, 2023

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी संयम, शांतता राखावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    * पुतळा वादप्रकरणी पालकमंत्र्यांचे आवाहन

    अमरावती : अमरावती जिल्हा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची भूमी आहे. या भूमीचा लौकिक मोठा आहे. त्यामुळे पुतळ्याच्या विषयावरून वाद निर्माण होऊ नये. सर्व प्रक्रिया संवैधानिक मार्गाने होणे आवश्यक असते. नागरिकांनीही संयम व शांतता ठेवावी व जिल्ह्याची कायदे व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

    सामाजिक, शैक्षणिक समृद्ध परंपरा असलेल्या अमरावती जिल्ह्याचा लौकिक मोठा आहे. पुतळ्याच्या विषयी वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्याचा व सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होता कामा नये. नागरिकांनीही संयम व शांतता राखावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

    घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या पवित्र संविधानाचा सन्मान बाळगूनच प्रत्येक कृती केली पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी कुठलीही असंवैधानिक कृती घडता कामा नये. गत दोन वर्षांत कोरोना संकटाने अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर मात करण्यासाठी अनेकविध प्रयत्न सातत्याने करण्यात आले व आताही अनेक योजना- उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. या महामारीत अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीही निघून गेल्या. अनेक बालके अनाथ झाली. अशा काळात महाविकास आघाडी शासनाने अनाथांचे अश्रू पुसून त्यांना मदतीचा हात दिला आहे. संकटात असलेले उद्योग- व्यवसाय सुरळीत व्हावेत यासाठीही प्रयत्न करण्यात आले. अशा स्थितीत शहरातील कायदे व सुव्यवस्था भंग झाल्यास औद्योगिक विकासाला खीळ बसू शकते. त्यामुळे संयम व शांतता कायम राखण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

    कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न

    कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी शासन- प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत. टास्क फोर्सच्या निर्देशानुसार कार्यवाही होत आहे. रूग्णालये व इतर यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. या काळात नागरिकांनीही मास्कचा वापर, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, लक्षणे दिसताच तपासणी व उपचार आणि लसीकरण आदींचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *