मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील एसटी कर्मचार्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी शरद पवार आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सहय़ाद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली यावेळी अनिल परब यांनी आतापर्यंत कारवाई न झालेले कर्मचारी कामावर परतले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर दिली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचार्याच्या कृती समितीसोबत चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने पूर्वी दिलेल्या मागण्या मान्य झाल्या होत्या. मागण्या मान्य झाल्यानंतरही विलनीकरणाच्या मुद्दय़ावरुन हा संप सुरू आहे. विलनीकरणा संदर्भात तयार करण्यात आलेली समिती १२ आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाचे पालन कर्मचारी आणि राज्य शासनावर बंधन असणार आहे. कर्मचार्यांना मूळ वेतनात पगारवाढ देण्यात आली आहे. पगारवाढीमध्ये काही तफावत झाली आहे. त्याबाबत कृती समितीसोबत चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी करुन आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीचा अभ्यास करुन निर्णय एसटी सुरू झाल्यानंतर देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्यांना कारवाईबाबत आम्ही तीन वेळा मुदत दिली होती. दिलेल्या मुदतीमध्ये कामावर परतणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार नसल्याचे आम्ही सांगितले होते. आतापर्यंत ज्या कर्मचार्यांवर कारवाई झालेली नाही असे कर्मचारी कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अफवा पसरवून आणि भीती निर्माण करुन कर्मचार्यांना कामावर जाण्यापासून रोखले जात आहे. एसटी सुरू झाल्यांनतर कारवाई झालेल्या कर्मचार्यांबाबत काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात येणार आहे, असे अनिल परब म्हणाले.