मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची लाडकी कन्या आराध्या जसजशी मोठी होतेय तसतसे तिच्या अंगातील काही चांगले गुण आपल्या समोर येत आहेत. ती उत्तम स्टेज परफॉर्मर आहे याचे एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी तिच्या शाळेमध्ये तिने केलेला एक अँक्ट. नृत्यातून व्यक्त होणार्या आराध्याच्या परफॉर्मन्सने सर्वांनाच भारावून टाकले होते. तेव्हा पण तिने आपल्या अँक्टच्या माध्यमातून स्त्री दाक्षिण्य या विषयावर भाष्य केले होते. आताही आराध्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिने केवळ नृत्य नाही तर एक सामाजिक संदेश द्यायचाही प्रयत्न केला आहे.
आराध्याने हा डान्स ख्रिसमस सेलिब्रेशनच्या निमित्ताने केला आहे. रेड ड्रेस घालून डोक्यावर ख्रिसमस कॅप परिधान केलेली आराध्या खूपच सुंदर दिसत आहे. तिने ख्रिसमसच्या गाण्यावर डान्स करताना ख्रिसमस सेलिब्रेशनचे, सांताक्लॉजचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तिने सांगितले,आपण प्रत्येकाने कोणाचे ना कोणाचे सांताक्लॉज बनायला हवे. केवळ दुसरा देईल याची अपेक्षा न ठेवता आपण द्यायलाही शिकले पाहिजे. कोणाचे तरी सीक्रेट सांता बनायला केवळ ख्रिसमसची वाट का पाहायची ? ज्याला गरज असेल तेव्हा आपण त्याचे सीक्रेट सांता का नाही बनत? असा प्रश्नही तिने केला आहे. या गाण्यावर नृत्य करताना तिने हातात वाद्य घेऊन ते वाजवत नृत्याचा आनंद लुटलाय.
आराध्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मात्र तिचे भरभरून कौतूक केले आहे. कुणी म्हटले, खूप सुंदर दिसतेय. तर कुणी म्हटलेय, आईच्या पावलावर पाऊल ठेवलेय. आता ऐश्वर्या आराध्याच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आराध्याला ती कायम आपल्या सोबत ठेवते. तसेच तिच्या प्रत्येक गोष्टीत ती आवर्जुन लक्ष घालते. त्यामुळे आता आईच्या छायेखालीच वाढल्यावर लेक आईसारखी गुणवान होणारच नाही का.