आता औरंगाबाद जिल्हय़ात धावणार इलेक्ट्रिक डबलडेकर बस

    सूचना पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

    औरंगाबाद : नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याची सूचना पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला दिल्या आहेत. आदित्य ठाकरे हे दोन दिवसीय औरंगाबाद दौर्‍यावर असून, बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना ते म्हणाले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    औरंगाबाद दौर्‍यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी बुधवारी शहरातील विविध विकासकामांचे उद््घाटन केले. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत महानगर पालिकेच्या विकास कामांच्या आढावा घेतला. यावेळी बोलताना सूचना देतांना ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या धर्तीवर शहरात पर्यावरणपुरक अशा डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. याकरिता महानगर पालिकेने पर्यावरणपुरक अशा या बस करीता लागणार्‍या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भर द्यावा. जेणेकरुन विकासाच्या दृष्टीने शहराच्या चिरंतन वाढीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयोगी ठरेल. तर याचवेळी आदित्य ठाकरे यांनी शहरातील वातावरणीय बदल या संदर्भातील डब्लुआरआयचे कार्यक्रम अधिकारी आशा ढवल यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद शहरात होत असलेले वातावरणातील बदल यासंदर्भात सविस्तर चर्चा करत काही सूचना सुद्धा दिल्या.

    मंगळवारी औरंगाबाद दौर्‍यावर असलेल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्हय़ाचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. देशमुख काय म्हणाले हे मी पाहिले नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच काम चांगले सुरू असल्याचे म्हणत, एका ओळीत अमित देशमुखांच्या आरोपाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.