Header Ads Widget

राजकारणातील चाणक्य: मा. शरद पवार

  आले किती गेले किती
  संपले नि परतले भरारा
  तुमच्या नामाचा शरदराव
  राजकारणात भारी दरारा

  राजकारणातील धोरणी आणि चाणक्य मानले गेलेल्या मा. शरद पवार साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४० सालचा. पुर्ण नसानसांत राजकारण ठासून भरलेला असा हा नेता आजही नेटाने राजकारणात पाय रोवून उभा आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सुरुवातीला ते नीरा कॅनाल सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी होते. नंतर बँकेचे व्यवस्थापक झाले .सुशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले शरदराव पवार १९५६ साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांच्या राजकीय जीवनाला इथूनच सुरुवात झाली. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले गेले. चव्हाण यांच्या भाषणामुळे ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यशवंतराव चव्हाणांनी पवार यांच्यातील एक सुप्त नेता हेरला आणि पवार त्यांचे शिष्यच बनले. वयाच्या चोविसाव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांना भेट देता आली. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी पक्षबांधणी करण्याच्या पद्धतीचा जवळून अभ्यास केला. १९६७ साली राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी झाला.

  यशवंतराव चव्हाण बरोबरच वसंतदादा पाटील हे सुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते इ.स.१९७८ सालच्या निवडणुकीत वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.पण काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर "पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला" अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली.

  शरद पवार या व्यक्तिमत्त्वाबद्दल राज्यातील प्रत्येकाच्या मनात कुतूहल आहे. राजकारण, समाजकारण अर्थकारण सर्वच बाबतीत तज्ञ असणारा हा अवलिया राजकारणात आपले पाय घट्ट रोवून आजही सर्वसमावेशक राजा म्हणून उभा आहे. १२ डिसेंबर रोजी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणारे शरद पवार येती काही वर्षे राजकारणात सक्रिय राहू शकतील. समाजकारणात त्यांना रस कायमच असतो हे त्यांनी आजपर्यंतच्या आयुष्यात दाखवून दिले आहे. त्यांनी त्यादृष्टीने पुरोगामी पावले उचलली आहेत. मग ते महाराष्ट्राच्या प्रमुखपदी असोत किंवा राज्याच्या राजकारणात पदाधिकारी असोत.

  शरद पवारांच्या बंडाचा अर्थ लावायचा झाला तर तो दिल्लीची हाईकमांड खिळखिळी झाली असताना त्याचा फायदा घेण्याचा मराठ्यांनी केलेला प्रयत्न होता. मोगल राजवट असतानाही मराठ्यांनी अशी मोहीम चालवली होती. पवारांच्या या सरकार मध्ये काँग्रेसवादी सुशीलकुमार शिंदे आणि प्रशासनाचा अजिबात अनुभव नसलेले सदानंद वर्दे यांच्यासारखे जनता पक्षाचे नेतेही होते. ही कसरत सांभाळताना पवार यांची प्रशासक अशी ख्याती झाली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकरणात संधीसाधू म्हणणारे बुद्धिवादी मंडळी पवारांना आशीर्वाद देण्यात आघाडीवर होते. त्यांना गुंडाळायचे पवारांचे कौशल्य तेव्हापासून डोळ्यात भरले होते.दिल्ली विरुद्ध पुकारलेले पवारांचे बंडे अयशस्वी झाले कारण १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड मताने सत्तेत आल्या आणि पवारांचे सरकार त्यांनी बरखास्त केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष विरोधी पक्षात गेला. विरोधी पक्षात राहुन राजकारणाचे काम करणे कठीण असते याची कल्पना आलेल्या पवारांनी राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षात निमूटपणे येण्याचा मार्ग पत्करला. यालाच स्वगृही परतणे असे म्हटले जाते.

  शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पुरोगामी पावले टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. सहकार क्षेत्रात महिला मागासवर्गीयांना स्थान मिळवण्यासाठी कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नव्या औद्योगिक धोरणात मुंबईत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना स्थान नाही ही भूमिका मांडली. मुंबईतील कापड गिरण्या बंद होणे, रासायनिक कारखाने मुंबईबाहेर जाणे ही प्रक्रिया तेव्हाच सुरू झाली. म्हणजेच आजची मुंबई तेव्हाच बांधणे सुरू झाले होते. मुंबईत सेवा उद्योगांची वाढ होणे,उंचच उंच टॉवर्स उभे राहणे त्याचीही हीच सुरुवात होती. पुढे रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची केलेली हातमिळवणी फायद्याची ठरली आणि पवारांशिवाय महाराष्ट्रात काही चालत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

  शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याची ठिणगी वादग्रस्त एन्रॉन प्रकल्पामुळे पडली. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज लागणार हे त्यांचे गणित होते. परंतु ती कंपनी संशयास्पद ठरली. कंपनीने घातलेल्या अटी महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या खड्ड्यात घालणाऱ्या आहेत असे जाणवू लागले. त्यामुळे पवारांना अडचणीत आणणारा हा प्रकल्प ठरला. त्यांनी महाराष्ट्रात फलोत्पादनाला चालना देणारे धोरण जाहीर केले. त्यामुळे द्राक्षे, बोरे, डाळिंबे या फळांचे उत्पादन वाढले. द्राक्षांपासून वाईन बनवून शेतकरी अधिक पैसे मिळवू शकतो हे त्यांनी सांगितले आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना पैसाही मिळाला पवार हे शेती उद्योगात रमतात.तो त्यांचा पिंड आहे. राजकारणातील कारकीर्दीत त्यांच्यावर कितीतरी आरोप केले गेले.त्यांच्याहून वरचढ नेते आले आणि गेले. परंतु पवारांनी या सर्व संकटावर अतिशय हुशारीने मात केलेली दिसून येते.जयंत नारळीकरांचे 'आकाशाशी जडले नाते' या खगोलशास्त्र विषयक अप्रतिम पुस्तकाच्या पाचशे प्रती मुंबई-पुणे शहराबाहेरील गरीब शाळांतून वाटल्या त्याही निनावी पद्धतीने. ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, संस्थांना त्यांचा नेहमीच आधार वाटतो. साहित्य, कलाकार यांनाही त्यांनी अशीच मदत केली. पवार यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रातील खूप माणसे जोडली. वैद्यकशास्त्र, लेखन, अभिनय, चित्रनाट्य, समाजकारण, उद्योग अशा क्षेत्रातील अनेक जण पवारांचे स्नेही आहेत.

  राजकारणात कार्यरत असलो तरी मित्र सर्व क्षेत्रातील असावेत हा धडा बहुदा ते आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकले असावेत. निसर्ग कवी ना. धो. महानोर यांनी त्यांना जाणता राजा म्हणून फार अडचणीत आणले. महाराष्ट्रात कोणालाही आपली तुलना थेट शिवाजी महाराजांशी व्हावी हे आवडणारे नाही. कोणत्याही वादग्रस्त भूमिकेत सोयीस्कररीत्या मौन पाळणे ही पवारांची खासियत आहे. असा हा चाणक्यरुपी अवलिया महाराष्ट्राला लाभल्यामुळे आज बऱ्याच क्षेत्रांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे.

  सौ भारती सावंत
  मुंबई
  9653445835

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या