अमरावती : आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचे फार मोठे योगदान असून आजही इतर देशाच्या तुलनेत आपले शेतीचे उत्पादन जास्त आहे. या व्यवस्थेला योग्य रूप आणण्यासाठी योगदान देणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. देशातील शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता भाऊसाहेबांसारख्या व्यक्तिमत्त्वाची व त्याच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा १२३ वा जयंती उत्सव आणि दैनंदिनी व शिवसंस्था त्रैमासिकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष सर्वश्री. नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अॅड.गजाननराव पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री. हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य डॉ.महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ.पी.एस.वायाळ व डॉ.अमोल महल्ले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आभासी पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झालेले डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले की, आपल्या देशाला बारा हजार वर्षांपासून शेतीची परंपरा असून आपल्या देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्नात नेहमीच कृषीचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. जेव्हा १९४७ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न फारच कमी होते तेंव्हाही शेतीचे योगदान २५ ते ३० टक्के होते.१९६७ मध्ये तर शेतीचे योगदान ४२ टक्के इतके होते. शेती व मातीशी जुळलेल्या, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाऊसाहेबांनी शेती आणि शिक्षण या क्षेत्रात जे कार्य केले ते आजही समाजाला दिशा देणारे आहे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू. डॉ. व्ही.एम. भाले यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखा विकसित झाल्या असताना आजही त्यांच्यापासून शेती दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली. आजही आपण कापूस वेचण्याचे यंत्र निर्माण करू शकलो नाही. एखाद्या झाडाला नेमकी कशाची व किती गरज आहे हे शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित करू शकलो नाही असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.आपण शंभर रुपयाचे पेट्रोल भरतो पण वीस रुपयांची भाजी दहा रुपयाला मागतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव देण्यासाठी आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल. भाऊसाहेबांचा आदर्श ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे ,असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘विद्यादान ते जीवनदान’ या शब्दातून संस्थेचा विकास स्पष्ट केला. भाऊसाहेबांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाऊसाहेबांच्या शोधप्रबंधावर ४० विद्वानांचे विचार प्रकाशित करण्यात येत असून कवी, साहित्यिकांनी भाऊसाहेबांवर नवीन गौरवगीत रचावे, असे आवाहनही त्यांनी केले. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री.नरेशचंद्र ठाकरे, कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर यांचेही यावेळी भाषण झाले.
प्रारंभी मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमात संस्थेच्या दैनंदिनी २०२२ व ‘शिवसंस्था’ त्रैमासिकाच्या डॉ.पंजाबराव देशमुख जयंती विशेषांकाचे प्रकाशन तसेच डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच राजेंद्र गायगोले लिखित ‘पापळची राधामाय’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. कोषाध्यक्ष श्री.दिलीपबाबू इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या चार वर्षाच्या विकासात्मक कामाचा व नियोजित कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.कीर्ती काळमेघ यांनी केले तर संस्थेचे सचिव श्री.शेषराव खाडे यांनी आभार मानले. बाबासाहेब सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूरच्या संगीत विभागाच्या चमूने डॉ.राजेश उमाळे यांच्या नेतृत्त्वात स्वागत गीत व गौरवगीत सादर केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, गणमान्य नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या