अमरावती : आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘निळी धम्म छाया’ हा भीम बुध्द गीतांचा सांगितिक कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झाला.
‘ओएनजीसी’चे माजी सरव्यवस्थापक तथा गायक डॉ. मधुकर मेश्राम यांनी आपल्या सहका-यांसह अनेक उत्तमोत्तम बुद्धगीते व भीमगीते यावेळी सादर केली. ‘नथ्थिमे शरणं’ या मंगल प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ‘आम्ही वंदितो तुला भीमराया’ या समूहगीताने महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना स्वराभिवादन करण्यात आले. ‘संविधानाच्या नभाची ही निळी धम्मछाया’, ‘क्षितीजावरती या देशाच्या तो भीमसूर्य उगवला’ अशी विविध शास्त्रीय रागांमध्ये गुंफलेली अनेक सुंदर गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली.
प्राचार्य मीना मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन केले. डॉ. मधुकर मेश्राम यांच्यासह गझलगायक सुरेश दंदे, सुनंदा इंदूरकर, प्रा. दीक्षा तंत्रपाळे यांनी अप्रतिम गाणी सादर केली. सचिन गुढे यांनी की-बोर्ड, विशाल पांडे यांनी तबल्यावर, चेतन यांनी बासरीवर व हरिष लोखंडे यांनी व्हायोलिनवर सुरेल साथ दिली.
विक्रीकर आयुक्त श्री. कडू, माजी कमिशनर (कस्टम) सुरेश दंदे, अनिल सावदेकर, सुरेश दांडगे, एस. एस. वानखेडे, पी. पी. भाले, व्ही. पी. सरोदे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या