'वस्ती वाढत आहे' हा प्रा. शांताराम हिवराळे सरांचा सातवा काव्य संग्रह आहे. त्या अगोदर त्यांचे प्रकाशित झालेले संग्रह म्हणजे, ' अश्रूंचा उन्हाळा ', 'प्रारब्ध', 'तवंग' , 'भावनांचे ओसाड प्रदेश' , 'दाटून येता हे काळोखी काहूर' आणि 'अंधारडोह' इत्यादी आहेत.
प्रा. हिवराळे सर हे हाडाचे कवी आहोत. 'वस्ती वाढत आहे' हा त्यांचा काव्य संग्रह वाचल्यावर कविचे जीवनानुभवांचे व आकलनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. प्रत्येक रचनेत ते प्रत्यक्षपणे जाणवत आहे. वस्तीतील लोकांची जीवनशैली, त्यांचे दुःख, त्यांची विवंचना, अंधश्रद्धा, ऋतू ऋतूत त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम, राजकारणी लोकांची त्यांच्यवर पडलेली भुरळ, नंतर नशिबाला दोष देणारी वस्ती. पिढ्यान् पिढ्या वस्तीची दारिद्रयात कुजणारी दयनीय स्थिती. हे सगळे तिथे फक्त अज्ञानामुळे होत असावं आणि एकदा का ज्ञान रसपान वस्तीत लाभल्यावर वस्तीला चांगले दिवस येतील असं सुचित करणाऱ्या काव्यांचा ही सरांनी समावेश संग्रहात करून वस्तीला एक आशावादाचे रूप दिलेयं त्यामुळे संग्रहास शेवटी एक विलक्षण उत्साही स्वप्नांचा आभास होतो.
संग्रहाचे मुखपृष्ठच एवढं आकर्षक आहे की वस्ती कुणाची? तर ती सामान्य माणसांची वाढत आहे. तसेच गरिबीच्या तळाघरांतली, झोपड्यांचे चित्र दाखवल्याने जास्तच प्रखरपणे नजरेत येते.
ह्या संग्रहात एकूण ऐंशी रचना आहेत आणि ह्या रचनांचे एक वेगळे वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक रचना ही सहा वर्णातली म्हणजे षष्ठाक्षरी काव्य प्रकारातली आहे. तसेच प्रत्येक कविता ही पाचच कडव्यांची आहे. रचनांची सजावटही अशा तऱ्हेने मांडलीय की वर्षाचे जसे ऋतू, त्याप्रमाणे त्या ऋतुमानानुसार वस्तीतल्या माणसांचे जीवन पैलू कसे बदलत जातात ह्याचे अतिशय सुंदर व वास्तवरुपी वर्णन सरांनी रचनांनी प्रस्थापित केले आहे.
आता 'वस्ती वाढत आहे' ह्यातल्या कवितांकडे वळू. संग्रहातली पहिलीच कविता ही 'दुष्काळी सावट' ह्या शीर्षकाखाली लिहिलीयं, म्हणजे वस्तीतल्या दुष्काळाचे चित्र उभारलेयं
किती भयानक दुष्काळाचे सावट वस्तीवर पडल्याचे दृश्य कविने साकारलेयं. पाऊस नसल्याने नदी नाले कोरडे, झाडे पाने सुकलेली, अशी वस्तीची दयनीय स्थिती झालीय. पाण्याचा अभाव असल्याने उन्हाळ्याची झळ ती किती! जमिनीबरोबर तिथल्या माणसांच्या मनाला ही भेगा पडल्यात. उन्हाळ्याच्या त्रासामुळे एकच आकांत उडलाय हे 'आकांत' ह्या रचनेत सरांनी वर्णिलेय.
दुष्काळाचा परिणाम माणसावर होतोच तसा तो पशू, पक्षी व झाडावर ही होतोच. दुष्काळ ह्या रचनेत सगळीकडे उदासी. पाणी हेच जीवन आणि जीवनच नसेल तर प्राणांन्ती वेदना
दुष्काळाने अशी शोकांतीका झाल्यावर 'भविष्य मुलांचे' कसे काय ह्याची चिंता आणि त्या चिंतेमुळेच मायभूमीची ओढ असली तरी मुलांच्या भविष्याचा विचार करून मायभूमीला सोडून शहराकडे धाव घेतात.प्रत्येकाला आपल्या गावची ओढच असतेच. आता खालच्या ओळी पहा
आणि अशी ही गावची माणसे शहराकडे ओढली जातात. मग शहर ही त्यांना समावून घेते आणि वस्ती हळूहळू वाढत जाते. शहरात काम मिळवण्यासाठी भटकंती सुरू होते.
अतिशय मार्मिक शब्दांनी वास्तववादी वर्णन काव्यात केलयं. वेगवेगळ्या जाती धर्माची माणसे वस्तीत जमतात वस्ती वाढत जाते आणि वस्ती सगळे उत्सव एकत्र येऊन उत्साहाने साजरे करते.
पण वस्तीत अफाट दारिद्रय असल्याने तिथे त्यांचे जगणे हालाखीचे असते. अर्धपोटी राहावे लागते व पोटासाठी मग ते मिळेल ते काम करून उदर निर्वाह करतात.
असे उद्ध्वस्त वस्तीतले जीवन. पशूप्रमाणे येथे माणसांचे वागणे. नितीमत्तेचा अभाव व दुर्जनाचा प्रभाव. तरी वस्तीत लोकांची जगण्याची हाव असते.
पावसाळ्यात तर वस्तीतील झोपड्यांची अव्यवस्था अतिशय दयनीय. ओली झोपडी आणि भुकेला पाऊस. पावसाळ्यात काम धंदा मिळत नसल्याने वस्तीची घुसमट वाढतच जाते.सगळीकडे पाणी, चिखल, डासांचा धुमाकुळ आणि डेंगूची लागण...
पाऊस ओसरतो अन् हिवाळा सुरू होतो. धुक्याने आच्छादलेली वस्ती पालापाचोळ्याची शेकोटी पेटवते. पोरे बाळे कडाक्याच्या थंडीला उन्हाची प्रतिक्षा करतात. गोठत्या बाळाच्या अंगाला आई आपल्या फाटक्या पदराने झाकते आणि थंडी पासून सावरते. हिवाळा संपला की उन्हाळा सुरू होतो. ऋतू ऋतूत झोपडीला त्या त्या प्रमाणे हालाखीच्या परीस्थितीला सामोरे जावे लागते. वस्ती ह्या सगळ्यांचा निर्धाराने सामना करत असते हे वर्णन अतिशय सुंदर रचनांनी कविने केले आहे.
अशा प्रत्येक संकटांना वस्ती सामोरी जाते. वस्तीतल्या जीवनाची कुणाला खंत नाही आणि त्यांच्या दुःखाला ही अंत नाही. आईबाबा दिवसभर कष्ट उपसतात आणि पोरं उघडे नागडे अन्नासाठी भीक मागतात. अशात पुरूष व्यसनाच्या आहारी जातो. दारू ढोसून बेभान होतो आणि बायकोने कष्टाने जमवलेली तिची कमाई मिळवण्यासाठी तिला माराहाण करतो. तिही बिचारी नवऱ्याचा जुलूम पोरांसाठी सहन करत असते. दारुडया नवऱ्या सोबत वस्तीतल्या संसाराची तिची हाव सुटत नाही.
हे असे वस्तीतले जगणे म्हणजे शिक्षणाचा अभाव. वस्तीतली माणसे अडाणी, अशिक्षीत असल्याकारणाने त्यांची प्रगती होत नाही. गेली कित्येक वर्षे हे तिथे सडत आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे माणूस शिक्षणाने समृद्ध हवा. त्याने त्याच्या विचारसरणीत फरक पडतो. त्याला स्वच्छता, निगा, कळते. विद्या माणसाच्या मनाला घडवते, बरे वाईट कळते, एकूण शिक्षणाने माणूस संस्कारिक बनतो. विद्येमुळे अंधाराची वाट प्रकाशमय होते. माणसाला सुखद जीवन जगण्यास विद्या अतिशय मोलाची आहे. वस्तीत सगळे निरक्षर असल्याने अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि साधू भोंदू त्यांना फसवतात.कविंनी शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी शिक्षण महती,शिक्षण प्रकाश, विद्या देते मान, विद्येचे अस्तित्व, निरक्षरता, लाट अज्ञानाची, खीळ आणि मूल्य पडझड ह्या शीर्षकाच्या रचना संग्रहात लिहिल्या आहेत.
वस्तीतल्या अश्या अज्ञानी लोकांचा फायदा राजकरणी लोक करून घेतात. त्यांना खुर्ची पटकावयाची असते तेव्हा ह्यांना मोठ मोठी आश्वासने देतात आणि त्यांच्या मतांनी जिंकल्यावर विसरून जातात किंवा डोळ्या आड करतात. निवडणूकिच्या काळात जोशात असणारी वस्ती निवडणूक संपल्यावर मूळ पदावर स्थिरावते.
आता वस्तीला आत्मभान आणि जिवंतपणाची लक्षणे दिसू लागतात, आणि सरकार ही सोयी सवलती देत असल्याने वस्तीचे स्वप्न हळूहळू साकार होत आहे. मुले शिक्षण घेतात व सुट्टीच्या दिवशी भंगार ही वेचतात. वस्ती वाढत आहेत पण अस्तित्व घेऊन, तम पेटवून. आता वस्ती आपल्या हक्कासाठी झुंज देत आहे. तिने शिक्षणाचा वसा घेतलाय. आंबेडकरांचे स्वप्न साकार करते. आता क्रांतीची मशाल वस्तीत पेटत आहे. स्वयंप्रकाशाने तेजाळत आहे.
संग्रहाला दिलेले शीर्षक अतिशय सुचक आणि योग्य आहे. तसेच या काव्यसंग्रहाला डाॅ. सुनंदा रेवसे मॅडम यांनी दिलेली प्रस्तावना अभ्यासपूर्ण,संदर्भ असलेली व चिंतनशील स्वरूपाची आहे. त्याच प्रमाणे कविने कवितेत बदलत्या ऋतुमानानुसार हालाखीचे वस्तीचे वर्णन काव्यात प्रगट केले आहे. त्यामुळे संग्रह वाचताना वस्तीचे हुबेहूब चित्र डोळ्या समोर उभे राहते. हातात घेतलेला संग्रह सगळ्या रचना वाचून पूर्ण केल्या शिवाय राहवत नाही. अतिशय रोचक व सुंदर शब्दफुलांनी भरलेला 'वस्ती वाढत आहे' हा संग्रह आहे. आपण सर्वांनी तो अवश्य वाचावा. ह्या संग्रहाचे प्रकाशन 'यशोदीप पब्लिकेशन्स' पुणे ३० ह्यांनी केलंय. ह्याची किंमत फक्त Rs 70+50 postage सह आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या