अमरावती, दि. 8 : प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल मिळवून दिले जाते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यादीतून काही तांत्रिक कारणांस्तव वगळण्यात आलेल्या गरजूंनाही घर कसे मिळवून देता येईल, असा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने करावा. एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
आवास योजनेबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख 74 हजार 143 इतकी आहे. यापैकी सुमारे 31 हजार 401 लाभार्थ्यांचे अर्ज विविध कारणांनी नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 893 इतकी आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना काही कारणासाठी नाकारण्यात आले आहे तेही गरीब आणि गरजू असून त्यांना घरकुल मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी दिली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या