Recent in Technology

Advertisement

Breaking News

" समाजाला सजग ठेवणारा कवितासंग्रह :अलर्ट "

    ▪️मराठी साहित्याला यशाच्या शिखरावर पोचविण्यासाठी दलित साहित्याचा फार मोलाचा वाटा आहे. अनेक आंबेडकरी कवी, साहित्यिक, लेखकांनी आपल्या लेखणीला प्रतिभेची धार देऊन उपेक्षितांचे हुंकार, आर्त तळमळ, समस्या आणि मानव म्हणून जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष तसेच विद्रोह आपल्या काव्यातून समाजापुढे ठेवून गावकुसाबाहेरील समाजाला जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. नव्हे एक चळवळच उभी केली आहे. या चळवळीला मोलाचा हातभार लावण्याचे कार्य माझे कवी मित्र, ललित लेखक व समीक्षक श्री. प्रशांत ढोले सर यांनी केलेले आहे. यांचा 'अलर्ट" हा कवितासंग्रह वाचण्यात आला. 'अलर्ट' म्हणजे 'दक्ष' कवीने आपल्या काव्यातून समाजाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या काव्यसंग्रहाला प्रा. डॉक्टर मंगेश बनसोड सर यांची प्रस्तावना लाभली असून माजी शिक्षण सहसंचालक श्री. भाऊ गावंडे, महाराष्ट्र शासन यांनी ब्लर्ब दिले आहेत.

    ▪️ समाजाचे भान ठेवून समाजातील उपेक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी धडपडणारी आर्त हाक त्यांच्या काव्यात दिसून येते. तसेंच कवींचे या कविता संग्रहात विविध भाव दिसून येतात. काही कविता क्रांतीचा विचार करताना दिसतात तर काही कवितेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना दिसून येते. पाण्याचे विविध रूपे अतिशय मार्मिकपणे कवीने आपल्या काव्यात अंतर्भूत केले आहे.

    'अंधाऱ्या वाटेवर,
    पेरावा प्रकाश
    उजळेल आकाश
    अंतर्मनात'
    या ओळीत कवीचा प्रचंड आशावाद दिसून येतो.

    ▪️'चवदार पाणी' या कवितेत विविध स्वरूपात पाण्याची रूपे आपल्याला बघायला मिळतात.. मानवाच्या नसानसात, समानतेच्या संग्रमात, मानवी जीवन सुंदर कराया उपयोगी असणारे पाणी आहेत हे निश्चित.

    'खरी दिलदार भेटलेच नाही आतापर्यंत
    अवतीभवती वावरतात, आभास माणसे'
    'माणसे' या कवितेत ही खंत कवींनी मांडली आहे.
    'धर्मांधतेच्या आडून करती जे विरोध
    त्यांना दाखवू आमचे कसदार पाणी l'
    या कवितेत कविता काहीसा लढवय्या सूरही दिसून येतो.
    - विषम समाजावर करावे प्रबुद्ध हल्ले,' या ओळीतून समतेचा ध्यास दिसून येतो.

    ▪️ कवींनी पावसाची विविध रूपे काव्यात वर्णिले आहे. 'पावसाचा आता" या कवितेत

    बीजातून आता
    जीवन फुलेलं
    कामाला येईल
    मेहनत l

    हा आशावाद व्यक्त होताना दिसतो. तसेच पावसाला 'प्राणसखा होता येत नाही, आस दावतो अन कोरडाच निघून जातो,' ही खंत त्यांच्या कवितेत दिसून येते. मानवतेच्या पावसाचे स्वप्नही त्यांनी आपल्या कवितेत परंपरागत रूढींवर टीका करत फार सुंदर मांडलेले आहे. 'पाऊस म्हणजे' या कवितेत,

    'पावसा पावसा
    झिरपत येरे
    क्रांती करत ये
    दाहीदिशा',

    अशी आर्जव करताना दिसतात. "असा पडतो पाऊस" या कवितेत - परंपरेचा पाऊस मानवी जीवन कसे विदीर्ण करतो आणि प्रस्थापित रूढी, प्रथा, परंपरेचा पाऊस उपेक्षितांच्या वस्त्यांवर कसा हल्ला करतात याचे वास्तव चित्रण आपल्या काव्यातून केले आहे ' कधी बरसणार मानवतेचा पाऊस....!!' ही संवेदनशील जाणीव मनाला स्पर्श करून गेली.

    ▪️ "जीवनयुद्ध 'या कवितेत लढणे हे महत्त्वाचे आहे हरणे किंवा जिंकणे नाही, असा मोलाचा सल्ला देतात., 'प्रेम म्हणजे' या कवितेत प्रेमाचे अतिशय संयंत रूपातून महत्व पटवून दिले आहे.

    'प्रेम म्हणजे महावीरांचे मौन
    प्रेम म्हणजे पैगंबरांची शिकवण'
    असे जेव्हा कभी म्हणतो, तेव्हा प्रेम या भावनेचे उदात्त चित्रण होते.
    'प्रकाशपर्व ' या कवितेमध्ये,
    स्वतःचं अस्तित्व निर्माण कर
    तिमीराला दूर लोटून
    प्रकाशपर्वाला जवळ कर!'
    असे आव्हानही मोलाचे आहे.

    कवींच्या -'आई, आजी, भाकर आणि पाऊस', रमाई, या कविता मनाला स्पर्श करून जातात.

    ▪️'आई' या कवितेतील,
    'सर्व जिंकले ऋण फेडू कसे सांग तू!
    मी एक थेंब, सागर अथांग तू '

    या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या. आईची थोरवी यथार्थपणे वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत. तसेंच

    'आभाळ माया असतो बाप'
    रोज तीळ तीळ मारतो....
    तरी पुरून उरतो बाप l
    दाखविता येत नाही अश्रू......
    तरी आतून स्त्रवतो बाप l
    वडिलांच्या कष्टाची जाणीव किती भावनिकतेने कवी रेखाटतात.'

    ▪️ कर्मठ रूढी प्रधानता जपणारे लोक परत भिमरत्न जन्मास येऊ नये याची खबरदारी घेतात.... परत माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरवता कामा नये म्हणून आपण अलर्ट राहिले पाहिजे, असा इशारा 'अलर्ट' या कवितेतून कवीने दिला आहे.

    ▪️ 'क्रांतीचा विचार बुद्धाचा आचार' यांना कवीच्या जीवनात विशेष स्थान असल्याचे दिसून येते. कवींच्या बर्‍याच कविता बुद्ध विचाराने प्रेरित आहेत... इतकेच नव्हे तर त्यांच्या जीवनात मनात बुद्ध विचारास आगळेवेगळे स्थान आहे.

    ▪️ गौतम बुद्धाप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी कवीच्या रोमारोमात अंतर्भूत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी वर्णन करताना कवीची लेखणी वेगळ्याच तेजाने प्रसवते आणि "भीमराव" ही तेजस्वी काव्यरचना जन्म घेते-

    बुद्धाची करुणा
    ज्योतिबाची वाणी
    कबीराची गाणी
    भीमराव l
    रमाईचे दान
    कर्तुत्वाची शान
    संविधान मान
    भीमराव l

    'भीमा' या कवितेमध्ये लोकांप्रती काहीसा निराशाजनक सूर किंवा मनातील खंत म्हणा प्रतिबद्धीत होते पण डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेले विचार संविधान लेखन सूर्य समान तसेच तेजस्वी आहेत हे लेखबद्दलही होते.

    ▪️कवींनी आपल्या कविता संग्रहात आणखी एक भावना प्रकर्षाने मांडलेले आहे ती म्हणजे मैत्रीची! मैत्री हा कवीला विशेष भावलेला विषय दिसून येतो. 'मैत्री' या कवितेत मैत्रीचे ऋणानुबंध विश्वासावर टिकून असते हे सांगताना कवी म्हणतात,-

    'मित्राने जरी केला मुळावर घाव....
    दिखाव यापेक्षा आतून असते मैत्री l
    तृष्णेने कितीही केले प्रहार....
    धम्मगाथेने शोभून असते असते मैत्री l
    'मैत्री असते गीत' या कवितेत मैत्रीची थोरावी समर्पक शब्दात कवीने मांडलेली आहे.
    'मैत्री असते बुद्धाची करुणा l
    मैत्री असते जगण्याची प्रेरणा l '

    ▪️ कवी प्रशांत ढोले यांच्या बऱ्याच कविता अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा विरुद्ध वाचा फोडताना दिसतात. यासाठी प्रकाशाला त्यांनी आव्हान केलेले दिसते,

    'हाती घेऊन ये, क्रांतीचा विचार l
    बुद्धाचा आचार, सोबतीला l'
    'प्रकाशपर्व' या कवितेमध्ये-
    'तिमीराला दूर लोटून प्रकाश पर्वाला जवळ कर 'असा सल्ला देतात. लोकशाही या कवितेत,
    संविधान श्रेष्ठ
    प्राणाहून मोल
    अशी ही ओल
    लोकशाही l

    अतिशय मार्मिक विधान केलेले आहे.'कालची जखम' ही कविता - भावनाशून्य लोकांची भाराभार झाली l अशी शोकांतिका ही व्यक्त करते.'माझ्या शब्दांनो' या कवितेत शब्दांना विनवणी करतानाही कवी दिसतात. 'मैत्री असते गीत' मनाला अतिशय भावणारे कविता आहे. 'भीमराव' या कवितेत अतिशय मोजक्या शब्दात बाबासाहेबांची कहाणी कवींनी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे.

    ▪️ कवी प्रशांत ढोले यांचा 'अलर्ट' हा कवितासंग्रह विविध भाव दर्शवितो अनेका भावनात्मक विषयाला हाताळतो, समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा तुमचे विदारक चित्रण करतो म्हणूनच तो वाचनीय आहे.

    ▪️कवितासंग्रह:अलर्ट
    ▪️कवी:प्रशांत नामदेवराव ढोले
    ▪️मुखपृष्ठ:मा.संजय ओरके
    ▪️प्रकाशक:सुधीर प्रकाशन,वर्धा
    ▪️पृष्ठे:75
    मूल्य:100/-
    ************************
    समीक्षक
    मा.प्रीती राकेश वाडीभस्मे
    मुरारका ले आऊट,वर्धा
    संपर्क-8087360475
    ************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code