Header Ads Widget

कापडी पालात राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सुविधा मिळवून द्या-राज्यमंत्री बच्चू कडू

  * दिव्यांगासाठी शेगाव येथे 7 जानेवारीला मेळावा
  * दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे आवाहन

  अमरावती : दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे शुक्रवार, दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण तसेच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिली.

  प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयात राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच कापडी तंबूमध्ये (पालात) राहणाऱ्या नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

  दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडी-अडचणी येऊ नयेत तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दिव्यांग दुर होऊ नये यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. परंतु बरेचदा याची माहिती गरजूंपर्यंत पोहचत नाही. हे लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांसाठी शेगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेली सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी येथे आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कृत्रिम अवयव पुरविणाऱ्या संस्थांनाही यावेळी बोलाविण्यात येणार आहे.

  दिव्यांग मेळाव्यामध्ये जिल्हानिहाय स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवरून दिव्यांगांना विविध योजनांचे अर्ज तर वाटप केले जातीलच शिवाय प्रत्येक स्टॉलवर तक्रार निवारण केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांगांना एका छत्राखाली शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे आवश्यक कागपत्रे, अर्ज कुठे व कसा सादर करावा याची सविस्तर माहिती मिळणार आहे. जिल्हानिहाय तक्रारी स्विकारण्याचे तसेच विविध योजनांचे अर्ज वाटप एकाच ठिकाणी चालणार आहे. हा मेळावा दिव्यांगांसाठी आनंद मेळावा ठरेल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  श्री. कडू यांनी विभागीय दिव्यांग मेळाव्यासाठी जातीनिहाय, प्रवर्गनिहाय दिव्यांगाची नोंदणी करण्याबाबतची सूचना समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

  * कापडी पालात राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सुविधा मिळवून द्या

  शासनामार्फत प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी गरजूपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचून गरजूंना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची सूचना राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिली.

  गावाच्या बाहेर कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या नागरिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते.

  कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करुन यामध्ये स्त्री-पुरुष संख्या तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधार कार्ड, रेशन कार्ड , जातीचा दाखला याची माहिती घेण्यात यावी. ज्या नागरिकांकडे अजूनही आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच जातीचा दाखला नाही अशांना ते तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी सहाय्य करण्यात यावे. कापडी पालांमध्ये राहणारे नागरिकांची भटकंती सतत सुरु असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होतो. पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, उत्पादनाचे साधन याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कापडी पालात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने सर्व गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

  वसंतराव नाईक तांडा सुधारणा योजनेंतर्गत रस्त्याचे खडीकरण, तांडा वस्ती सुधार योजना, धनगर समाजाचे सर्वेक्षण आदींबाबत त्यांनी यावेळी संबंधितांशी चर्चा केली.

  समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, अमरावतीच्या सहायक आयुक्त माया केदार, बुलढाण्याच्या अनिता राठोड, यवतमाळचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, अकोल्याचे ज्ञानोबा पुंड, अमरावतीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, वाशिमचे सहायक आयुक्त एम.जी.वाटे, यवतमाळचे भाऊराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या