अमरावती : ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कार्याची आपली परंपरा पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राने यंदाही कायम राखली. राज्य शासनाच्या कायाकल्प योजनेत जिल्ह्यात पापळ पीएचसीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शासनातर्फे कायाकल्प योजनेत विविध आरोग्य संस्थांचे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीव्दारे मूल्यमापन करुन त्यांना पुरस्कार देण्यात येतो. आरोग्य सेवा प्रणालीमध्ये बदल करुन उच्च दर्जाची आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा योजनेचा हेतू आहे. उत्कृष्ट उपचारांसोबतच आरोग्यदायी व स्नेहपूर्ण वातावरणनिर्मितीचा प्रयत्न संस्थेद्वारे होणे अपेक्षित असते. त्यानुसार कायाकल्प योजनेत जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून पापळ केंद्राने पहिला क्रमांक मिळवला. पापळ आरोग्य पथकाचे उत्कृष्ट टीमवर्क हे या यशाचे कारण मानले जात आहे.
पापळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट उपचारपद्धती, आरोग्याच्या विविध बाबींबद्दल दक्षतापूर्वक कार्यवाही व जनजागृती यामुळे विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले. सन २0२0/२१ या वर्षात केंद्रात ७३ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या, तसेच २५५ संस्थात्मक प्रसूती झालेल्या आहेत. संस्थात्मक प्रसूतीचे हे प्रमाण जिल्ह्यात अव्वल आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या