Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रा. सुरेश पुरी यांचे अनोखे समाजकार्य

  औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे निव्रुत्त प्रा. सुरेश पुरी यांचे नाव मराठवाडा प्रांतात सर्वदूर परिचित आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, भटक्या विमुक्तांची चळवळ, प्राध्यापकांची मुटा चळवळ आणि सरांनी गोरगरीब विद्यार्थी वर्गासाठी केलेले प्रचंड कार्य यामुळे सरांचे नाव घराघरात पोहोचले आहे. समाजकार्याचा नवा आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. जाणून घेऊया त्यांच्या या कामाविषयी ..

  आयुष्य छोटे आहे आणि आपण पृथ्वी नावाच्या उपग्रहावरील पाहुणे आहोत. जे आज आपले आहे ते काल आपले नव्हते. आपल्या अस्तित्वाने आपण जग सुंदर करणार आहोत की या जगाला खराब करणार आहोत याचा ज्याचा त्याने नक्की विचार करावा. जगात स्वर्ग नाही. मृत्यु नाही आणि पुनर्जन्मही नाही. जे आहे ते आज आहे. आता तर या कोरोना काळात आपण सर्वजण अक्षरश: मृत्यूच्या दाढेत आहोत. असं असलं तरी माणसाची हाव आणि धनलालसा मरेपर्यंत सरता सरत नाही.

  मेल्यावर सोबत काही जात नाही. 'कफन को जेब नही होते' असं कधीतरी आपण ऐकलेले असते. एखाद्या श्रद्धांजली सभेत वा अंत्ययात्रेच्या ठिकाणी आपल्याला जीवनाचं हे शाश्वत सत्य कळतं देखील! मात्र पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या' असं शेकडा ९९ % लोक जगू लागतात. माझ्या मते या पृथ्वीवरील केवळ १ % लोकांनीच हे जग आपल्या अस्तित्वाने आणि कामाने अधिक सुंदर केले आहे. त्या सर्वांच्या कामाला आपण सलामच केला पाहिजे. औरंगाबाद मधील प्राध्यापक सुरेश पुरी आणि त्यांच्या पत्नी विजयमाला पुरी हे दांपत्य त्यापैकी एक. आजच्या काळातले मानवतेचे एक अनोखे उदाहरण.

  सुरेश पुरी यांचा जन्म आपाचुंदा ता. औसा जि. लातूर या गावी एका भटक्या विमुक्त परिवारात झाला. घरी कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. इयत्ता चौथी पर्यंतचे त्यांचे शिक्षण गावात झाले. त्यानंतर शेडूळ आणि पानचिंचोली येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. लातूरचा राजस्थान विद्यालयातून दहावी केली तर तिथल्याच दयानंद कॉलेजमधून बी. ए. केले. पुढे एम. ए. करण्यासाठी ते औरंगाबादला आले. त्यानंतर काही काळ औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयात आणि औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केली.

  स्वतःचे शिक्षण त्यांनी कष्टाने पूर्ण केले. कधी वसतिगृहात तर कधी हिंदी प्रचार सभा कार्यालयात काम करून त्यांनी शिक्षण घेतले. ते सांगतात की, 'लातूरला शिक्षणासाठी असताना सायंकाळी लातूर जनरल स्टोअर मध्ये मी पार्टटाइम काम करायचो. सकाळी हिंदी प्रचार सभा कार्यालयात काम करायचो तर दिवसा कॉलेज करायचो. शिक्षण घेतांना झालेली दमछाक इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून पुढील काळात गरजू मुलांसाठी आधार झालो'

  लातूर येथील प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी त्यांना एम. ए. करण्यासाठी औरंगाबादला येतांना मदत केली होती. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांची औरंगाबादचे हिंदी प्रचार सभा कार्यालयात लातूरसारखी निवाऱ्याची सोय झाली होती. तिथे पडेल ते काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठात येण्याआधी नोकरीतील अनपेक्षित अनुभवांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी विद्यार्थीप्रियता जपली. त्यामुळेच औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयाची नोकरी सोडल्यानंतर एकाचवेळी तिथल्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी दाखले काढून औरंगाबादला ते नव्याने ज्या वसंतराव नाईक महाविद्यालयात नोकरीस लागले तिथे प्रवेश घेतले होते. ग्रामीण भागातील या मुलांसाठी त्यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली. विद्यार्थ्यांना आईवडिलांप्रमाणे जपले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तब्बल ३८ वर्षाच्या सेवा काळात त्यांनी हेच केले. आज निवृत्तीनंतर देखील त्यांचे हे कार्य सुरू आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर १९८४ साली रुजू झाले. तिथल्या वृत्तपत्र विद्या शाखेला ते जनसंपर्क हा विषय शिकवीत. या विषयासाठी मराठीतील पहिले पुस्तक त्यांनीच तयार केले. जनसंपर्क पेक्षाही तिथे त्यांचा मनसंपर्कावर अधिक भर राहिला. प्राध्यापकांपेक्षा विद्यार्थ्यांमध्येच ते जास्त रमले. औरंगाबाद शहरात त्यांच्या डिपार्टमेंटला शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची ते आत्मीयतेने चौकशी करीत. नाव, गाव, पत्ता, आई वडिल, शेती व घरच्याबद्दलची माहिती जाणून घेत. औरंगाबाद शहरात कुठे राहणार? निवाऱ्याची, जेवणाची व्यवस्था काय? याची माहिती विचारत. यातून ते विद्यार्थ्यांच्या अधिक जवळ पोहोचत. विद्यार्थी मोकळेपणाने त्यांना आपल्या अडचणी सांगत. अशा अडचणीतल्या गरजू मुलांची ते स्वत:च्या घरी निवासाची व जेवणाची सोय करीत. स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत. अशा पद्धतीने आजवर जवळपास हजार भर विद्यार्थ्यांना सरांनी मदत केल्याचे त्यांचे विद्यार्थी सांगतात. सरांच्या पत्नी विजयमाला सांगतात की, 'त्यावेळी आम्हाला महिन्याला शंभर किलो दळण लागायचे. घरातले विद्यार्थी कधीच सरले नाहीत. आजही निवृत्तीनंतर आमच्या घरी काही विद्यार्थी आहेत'

  सर विद्यार्थ्यांसोबत नेहमी मित्रांसारखे वागत. खांद्यावर हात ठेवून कॅंटीनला जात. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या गटबाजी पासून ते प्रेमप्रकरणाची सारीच माहिती व्हायची. अशा अनेक विद्यार्थ्याच्या कधी स्वजातीय तर कधी आंतरजातीय विवाहाला देखील सर हजर राहिले आहेत. घरातून नात्यातून तुटलेल्या अशा अनेक बंडखोर तरुण-तरुणींचे सर मायबाप झालेले आहेत. इतकेच काय या मुलींच्या बाळंतपणात त्यांच्या पत्नीने जेवणाचे डबे पुरविले आहेत, रात्री जागविल्या आहेत. औरंगाबाद शहरातील कोणत्याही महाविद्यालयात शिकणारा मुलगा त्यांच्यापर्यंत मदतीसाठी आल्यावर सरांनी कधीच त्याला मदतीशिवाय परत पाठविले नाही. अनेकांना इंटरव्यूला जाण्यासाठी, कामावर रुजू होण्यासाठी, दवाखाण्यासाठी, घरी जाण्यासाठी सरांनी मदत केली आहे. एखादा विद्यार्थी आठ दिवस एकाच शर्टावर दिसल्यावर सरांनी त्याला कपडे घेतले आहेत. अशा शेकडो विद्यार्थ्याचे सर आधार झाले आहेत.

  सरांच्या या समाजकार्याची जाण ठेऊन २०१० साली वृत्तपत्रविद्या विभागातून निवृत्त झाल्यावर सरांच्या काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यावर दोन ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातला एक ग्रंथ त्यांच्या लातूर जिल्ह्यातील विद्यार्थीवर्गाने प्रसिद्ध केला आहे. 'आई मनाचा माणूस' या ग्रंथात त्यांच्यावर ७५ लेख आहेत तर त्यांच्यावरील दुसऱ्या एका गौरव ग्रंथात जवळपास ३५ लेख आहेत. या प्रत्येक लेखात सुरेश पुरी सरांनी आम्हाला कशी मदत केली ते लिहिले आहे. वृत्तपत्र विद्याशाखेतील सव्वीस वर्षांच्या त्यांच्या सेवाकाळातील त्यांचे विद्यार्थी आज महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारत आणि जगभरात उच्चपदस्थ आहेत. कोणी इलेक्ट्रॉनिक मीडियात, कोणी प्रिंट मीडियात तर कोणी सरकारी सेवेत आहेत. पुरी सरांचे घर म्हणजे एक प्रकारचे वसतीगृह होते.

  विद्यापीठातील क्वार्टर असो की चाळीतले भाड्याचे घर तिथे कायम मुले असत. उन्हाळी सुटीत कोणी तिथे काम करीत तर कोणी बाड बिस्तरा पेटी ठेवून गावी जात. त्यांच्या जवाहर कॉलनीतल्या घराला तर विद्यार्थी वर्गाने चक्क पत्रकार भवन असे नाव दिले होते. ही मुले सरांच्या पत्नी विजयमाला यांना स्वयंपाकात मदत करीत. मुलांसाठी एक आणि घरच्यासाठी एक असे वेगळे जेवण कधीच त्यांच्या घरी नसायचे. सरांच्या मुलाने व मुलींनीही घरी राहणाऱ्या मुलांचा कधीच दु:श्वास केला नाही. असे असले तरी काही नात्यातल्या आणि शेजारच्यांनी या दांपत्याच्या या कामाची टिंगल-टवाळी केली. कशासाठी हे करता? असे प्रश्न विचारले. वैयक्तिक जगा असे आपमतलबी सल्ले दिले. परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा शिरस्ता सरांनी कधीही सोडला नाही.

  या पराकोटीच्या समाजकार्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असेपर्यंत त्यांना स्वतःचे घर नव्हते. त्याची त्यांना कधी रुखरुखही वाटली नाही. शेवटी शेवटी निवृत्तीच्या पैशातून त्यांनी घर बांधले. पत्नी विजयमाला यांच्यासाठी ते कधी दागिने घेऊ शकले नाहीत. परंतु त्यांच्या पत्नीने देखील कधीच दागिन्यांचा हट्ट धरला नाही हे विशेष! पुरी सर करीत असलेल्या कामाला त्यांनी मनोभावी साथ दिली. सरांनी गावाकडील आपली वडिलोपार्जित शेती सर्व भावांना समसमान वाटप केली. भावाच्या मुलांना शिक्षण दिले, त्यांच्या मुला-मुलींची लग्ने लावली इतकेच नव्हे तर त्यांना नोकरीसाठी देखील मदत केली.

  विशेष म्हणजे सर नास्तिक आहेत. त्यांच्या पत्नी आस्तिक आहेत. विजयमाला यांनी निवृत्तीनंतर चार धाम यात्रा करण्यासाठी १ लक्ष रुपये जमविले होते. लातूर जवळ हासेगाव येथे एच. आय. व्ही. बाधीत पालकांच्या मुलासाठी रवी बापटले यांनी एक शाळा सुरू केली आहे. या संस्थेला जेव्हा या दांपत्याने भेट दिली तेंव्हा विजयमाला यांनी ती रक्कम शाळेला दिली. तिर्थाटनातून पुण्यप्राप्ती पेक्षा या गरजूंची सेवा झालेली बरी असे मानून त्यांनी चार धाम यात्रा रद्द केली. संस्थेने या रकमेत आणखी भर घालून तिथे मोठे बांधकाम केले. अशी मदत करताना मनाचा मोठेपणा लागतो. तो जसा सरांकडे आहे तितकाच त्यांच्या पत्नीकडेही आहे. उभयतांच्या सामाजिक जाणीवेमुळे त्यांची मुले उच्चशिक्षित झाली असून स्वावलंबी आहेत.

  आयुष्यात आम्हाला कशाची कमतरता नाही अशी या दांपत्याची भावना आहे. ज्यांना मदत केली ती मुले आत्ताही सहकुटुंब त्यांच्या भेटीसाठी येतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात तेंव्हा त्यांना अधिक आनंद वाटतो. आपण ज्यांच्यासाठी केले त्यातले किती इमानदार राहीले याची त्यांनी कधीच नोंद ठेवली नाही. अनंत मुला मुलीचे त्यांच्या शिक्षण काळात आपल्याला पालक होता आले. त्यांचे आयुष्य उभे करतांना मदत करता आली याचा त्यांना आनंद आहे. ही मुले हीच त्यांच्या आयुष्याची मोठी कमाई आहे. आजच्या आत्ममग्न जगातले प्रा. सुरेश पुरी आणि विजयमाला पुरी हे दांपत्य अनोख्या समाजसेवेचे विरळ उदाहरण आहे. उभयतांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!

  (जिज्ञासूंसाठी प्रा. सुरेश पुरी यांचा मो. क्र. 9423148863)
  -रवींद्र साळवे
  919822262003
  बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

goverdhan म्हणाले…
प्रा. पुरी सर आणि पुरी मॅडम यांचे मनापासून धन्यवाद समाजातील नडलेल्यांना मनापासून मदत करणे हे देवपुजे पेक्षाही महान कार्य होय. त्यांना जीवनात सुख मिळेल हीच मंगल कामना!! त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा

People

Ad Code