अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालक बांधवांना मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत असून, प्रतीक्षा यादीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागणार नाही व प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल.
हे कळू शकेल व लाभार्थी हिस्सा भरणे व इतर बाबींचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे,अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव खेरडे यांनी दिली. योजनेसाठी शेतकऱ्यांना संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲपद्वारेही अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी १८ डिसेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन श्री. खेरडे यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेत गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यासाठी दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील पाच वर्षांकरिता लागू राहणार आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळणार हे कळणार असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गायी-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी शेतक-यांनी https://ahmahabms.com या संकेतस्थळावर किंवा मोबाइलवरून AH-MAHABMS या ऍपवरून अर्ज दाखल करावा, अधिक माहितीसाठी 1962 किवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित पशुसंवर्धन विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खेरडे यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या