Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे

  "अच्छे ने अच्छा,
  और बुरे ने बुरा जाना मुझे,
  क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी,
  उसने उतनाही पहचाना मुझे"

  ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो हेच सत्य आहे.

  घरची परिस्थिती अनुकुल नसतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे कक्ष अधिकारी, या पदापर्यंतचा जीवन प्रवास प्रेरणा अाणि अनेक अडथळ्यातून घडत गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे सतीश दवणे. सतीश दवणे यांनी हे जाणून घेऊन सामान्य माणसाची झेप किती प्रखर असते व कशी असते हे त्यांच्या जीवन प्रवासावरून दिसून येते. करजगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागातील गाव. शहरी जीवनापासून दूर असणारे खेडेगाव. अशा दुर्गम गावात सतीश दवणे यांचा जन्म झाला. गाव-शिवारातील माणसे मनाने प्रेमळ, अापुलकीने एकमेकांना मदत करणारी, शहरी जीवनातील वातावरणापासून दूर असल्याने त्यांच्या मनात, ह्दयात प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला. अशा संस्कारात सर्व भावडं संस्कारित होत होती. गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवतांना घरच्या गरिबीमुळे अनेक अडचणी येत गेल्या. शेतातील कामे करतांना त्यांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही.

  माणसाचे जीवन हे चित्रपटासारखेच असते. त्यात कहाणी, पात्र,घटना असतातच आणि जीवनातील अडचणीवर मात करीत काहीना आपले ध्येय सहज साध्य करता येते तर काहीना कष्टाच्या चाकोरीतून जावे लागते, मोठा संघर्ष करावा लागतो. असाच संघर्ष जीवनात सतिश यांना करावा लागला. शिक्षण घेण्यासाठी ब-याच गावच्या वा-या कराव्या लागल्या. करजगाव, भांडेगाव, अमरावती, कारंजा, दारव्हा आणि नंतर औरंगाबाद असा शिक्षणासाठीचा प्रवास सोपा नव्हता. करजगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असतांना अनेकांच्या शेतात मोलमजुरी करावी लागली, पडेल ती कामे करावी लागली. थोडा जाणता झाल्यावर बोदेगाव येथील साखर कारखान्यात त्यांनी कामही केले.

  गाव शहरापासून दूर असूनही गावातील लोक शिक्षणाचे महत्व जाणून होते त्यामुळेच त्यांनी मदत केली. शेजारी असणारे चव्हाण, जाधव कुटुंब नेहमीच मदतीला धावून आले. दुसरे म्हणजे ठाकरे परिवार व प्रभाते परिवार यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे सबंध होते, त्यामुळे ते सदैव मदतीसाठी धावून आले. त्याशिवाय गावातील अनेकांची त्यांच्या या खडतर जीवन प्रवासात मदत मिळत गेली. याशिवाय नातेवाईकांचा मदतीचा हात नेहमीच मिळत गेला. विशेष हे की, मामांच्या मदतीमुळेच शिक्षण सफल झाले. त्यांचे ऋण सहजासहजी फेडता येण्यासारखे नाहीत. आजही ते गावी करजगाव येथे गेल्यानंतर सारे आठवते. सा-याचे ऋण आठवते. मन समाधानाने भरून येते. गावातील मंडळी आपुलकीने त्यांची चौकशी करतात, विचारपूस करतात. त्यांचे प्रेम पाहून क्षणभर डोळे ओले होतात. प्रत्येकाचा वाटा जीवन घडविण्यात आहेच. गावातील लोकांचा स्नेहाचा, प्रेमाचा,ओलावा त्यांना विसरता येत नाही.

  प्रत्येक गावचे आगळे वेगळे वैशिष्ठ्य असते. अनेक ठिकाणी आपण आयुष्यभर फिरत असतो पण खरे प्रेम हे फक्त आपल्या मूळ गावीच मिळते हेच खरे. असा स्नेहल सहवास इतर ठिकाणी कोठेच दिसून येत नाही आणि त्यांचा स्नेह, प्रेम, वात्सल्य मनात आजन्म टिकून राहते हे ही खरेच. त्याचा विसर कधीच पडत नाही. अशा प्रेमळजनांच्या सहवासात जीवनाच्या पायघड्या त्यांनी पार केल्या.

  सतीश यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादमधील येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नागसेनवन भूमीत झाले. पदवी, पदव्युत्तर व एल.एल.एम. असे शिक्षण नागसेनवन भूमीतील मिलिंद महाविद्यालय व डाॅ.आंबेडकर विधी महाविद्यालयात झाले. या भूमीनेच त्यांना सुसंकृतपणे जगण्याचे संस्कार केले. खरे तर ही भूमी शैक्षणिक केंद्राबरोबरच संस्कार केंद्रदेखील आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. शिक्षणाबरोबर संस्कार घेऊन समाजात वावरतात. नागसेनवन भूमीचा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान वाटतो. त्याचबरोबर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून जनसंवाद व वृत्तपत्रविदया शिकत असतांना अराजकिय अशा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत मित्र परिवारासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच त्यांची जडणघडण होत गेली.

  सामाजिक समस्यांच्या प्रश्नांची जाणीव येत गेली. विविध संघटनेच्या कार्यकर्त्याबरोबर काम करावे लागले तसेच काहींच्या विरोधात काही काळ छोट्या-मोठ्या दैनिकात बातमीदार म्हणून त्यांना काम करावे लागले. हे करत असतांना स्थिर नोकरीच्या शोधात असतांनाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी मिळाली. जीवनातील हा सुवर्णक्षण ते कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांचे आशीर्वाद व त्यांची धडपड, जिद्द कामी आली.

  जीवनप्रवासात अनेक कडूगोड अनुभव येत गेले. त्यांना नेहमी वाटायचे आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, अशा परिस्थितीतीत आपणास शिक्षण घेता येईल का? पण स्वप्रयत्नाच्या साह्याने उच्च शिक्षणाचे ध्येय साध्य करता आले म्हणून ते स्वतःला भाग्यवान समजतात याचे कारण असे की, ते तीन विषयात पदव्युत्तर शिक्षण एल.एल.एम., सेट आणि आता पी.एच् डी. ही अंतिम टप्यात आहे. इथेपर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पदच आहे असे म्हणावे लागेल कारण स्वतः मार्ग शोधणे, निवडणे, विद्यापीठात नोकरी मिळवणे हा प्रवास सहजसाध्य होणारा नव्हता. नोकरी मिळवण्यासाठी ओळखी, शिफारस देणारे कोणीच नव्हते आणि त्यांच्या जीवनात त्याची आवश्यकताही भासली नाही कारण गुणवत्तेच्या जोरावर ते त्यांनी साध्य केले. एके दिवशी पेपरात कक्ष अधिकारी पदाची जाहिरात आली. अर्ज केला, मुलाखत झाली पण मेरीटमध्ये अव्वल असतांनासुधा नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला नाही. त्यासाठी त्यांना न्यायालयीन संघर्षातून जावे लागले. अशा वेळी त्यांनी केलेल्या कायद्याचा अभ्यास कामी आला. हा लढा ते स्वतःच लढण्याचे त्यांनी ठरवले आणि उच्च न्यायालयात स्वतःच प्रकरण दाखल करुन सर्व सुनावणी स्वतःच केली. (पार्टी इन पर्सन) याचा परिणाम म्हणजे शेवटी निकाल सतीश यांच्या बाजूने लागला. तेव्हा कोठे कक्ष अधिकारी पदाची त्यांना नोकरी मिळाली.

  आयुष्यात बरेच संघर्ष वाट्याला आले. त्यात ब-याच वेळा जवळच्या लोकांच्या अवहेलनेला, मानहानीला सामोरे जावे लागले. अशावेळी ते खचून न जाता उलट आत्मविश्वासाने प्रयत्न करुन जीवनात हवे ते यश प्राप्त केले. शिकत असतांना घरच्या कुटुंबाकडे लक्ष देत गेले. त्यांच्यानंतर हळूहळू माझे सर्व भाऊ बाळू, प्रकाश, प्रवीण औरंगाबादमध्येच स्थिरस्थावर झाले तेही उच्च शिक्षण घेऊनच. हा सतीश दवणे यांचा संघर्षाचा परिणाम होता.

  ते सांगतात की, मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला सारे स्वप्नवत वाटते कारण माझे तिघे भाऊ सेट, नेट पास होऊन तेही सध्या पी.एच्. डी करीत आहेत. अशाप्रकारे एकाच घरात चार पी.एच्.डी.धारक,उच्च विद्याविभूषित, शिक्षणात उंच गरुडझेप घेतलेले नातेवाईक असो वा गावात असो असे उदाहरण दुर्मिळ असेल. मला माझ्या बरोबर माझ्या तिन्ही बंधुंचा सार्थ अभिमान वाटतो. अजून त्यांनीही प्रयत्न सोडले नाहीत. इतकेच नाही तर उच्च शिक्षण घेऊन गप्प न बसता, जे जीवनात शिक्षणासाठी संघर्ष करतात त्यांना विनामोबदला मार्गदर्शन करीत आहेत. इतरांना बरोबर घेऊन जाण्यातच खरे सुख, वैभव आहे. त्यांच्या डोळ्यातील गरीबी, लाचारीचे आश्रू पुसण्याचे भाग्य आम्हांला परमेश्वरांने, आईवडिलांच्या आशिर्वादाने मिळाले म्हणतात. ते कर्तव्य आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. मार्गदर्शनानंतर त्यांच्या डोळ्यांतील स्नेह पाहिला की, आमचेही डोळे भरून येतात. वात्सल्याचा मधुकण चाखण्याचे आम्हा भाग्य लाभते. आम्ही आमच्या आईवडिलापुढे नतमस्तक होतो.

  वाईट आणि प्रतिकूल परिस्थितीबद्दल कुरकुरणे आणि तक्रार करणे सर्वथा अयोग्य आहे असे त्याना मनापासून वाटते. आपले स्वतःचे अंतरविश्व, मानसिक विश्व आणि बाह्य परिस्थिती आपणच स्वतःच्या हिंमतीवर निर्माण करत. विपरित वातावरणातही स्वतःची उत्क्रांती घडविण्याचा आणि विकास करण्याचा ते व तिघे बंधुनी केलेले कार्य कौतुकास्पद व आदर्शवत आहे. आई लीलाबाई, वडिल रामहरी यांचा स्नेह, आदर्श, त्यांचे कष्ट, आमच्यासाठी खालेल्या खस्ता, प्रयत्न, धडपड, सोसलेले दारिद्र्याचे चटके त्यातून आमची फिनिक्स पक्षासारखी प्रगती हे आपच्या गावकोशीत दुर्मिळ उदाहरण आहे. मानसिक शक्ती व मन मोठे सामर्थ्यवान असेल तर काहीही सहज शक्य होते. व आदर्शवत होते. जीवनातील यश हे अनेकांना प्रेरणादायी आहे त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या यशाच्या वाट्यात अनेकांचे प्रयत्न आहेत. त्यांची सुविद्य पत्नी शुभांगी असो की आणखी कोणी त्यांच्या मदतीशिवाय हे यश त्यांना कदापि पूर्ण करता आले नसते म्हणून या यशातील वाटाड्यांना ते मनापासून अभिवादन करतो व आईवडिलांना शत शत नमन करतो, असे मातापिता मिळणे हे भाग्यच असते.अशी प्रामाणिकपणे ते कबुली देतात.

  आज नाताळ, मनुस्मृती दहनदिन,स्त्री मुक्ती दिन व सतीश दवणे यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग याचे औचित्य साधून अमरावती येथून गौरव बंडूकुमार दवणे संपादित प्रज्ञासूर्य वृत्तपत्राचे प्रकाशन होत आहे ....! नाताळच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा !व सतीश दवणे यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक मंगलमय शुभेच्छा! शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,

  "चिरा चिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा."
  लेखन-
  मुबारक उमराणी
  सांगली
  ९७६६०८१०९६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code