अमरावती : कठोरा (बु) रोडवरील पी.आर.पोटे पाटील शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासामोर रंगरंगोटी करण्यासाठी आणलेली लोखंडी शिडी बाजूला करण्यासाठी गेलेल्या संस्थेच्या चार शिपायांचा उच्च विद्युतदाबाच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस प्रशासन तसेच विद्युत विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेतली.चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अक्षय साहेबराव सावरकर (२६) रा. टाकळी जहागीर,गोकुल शिलाकरम वाघ (२९) रा टाकळी जहागीर,प्रशांत अरुणराव शेलोरकर (३१)रा. शिराळा,संजय बबनराव दंडनाईक (४५) रा.आदिवासी कॉलनी अमरावती. अशी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्यांची नावे असून सर्व पी.आर.पोटे पाटील शिक्षण संस्थेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी संस्थेत आल्यानंतर हे चारही शिपाई प्रवेशद्वारासमोरील शिडी हटविण्यासाठी गेले होते मात्र प्रवेशद्वारासमोरूनच गेलेल्या १३३ केव्ही दाबाच्या विद्युत प्रवाहाचा शिडीला स्पर्श झाल्याने चारही कर्मचारी घटनास्थळी मृत्युमुखी पडले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशद्वाराच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूने काम करण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्याने संस्थेच्या पदाधिकर्यांनी ती शिडी हटविण्याचे आदेश दिले होते.
आदेशाची अंमलबजावणी करीत आज सकाळी ११ वाजता हे चारही कर्मचारी संस्थेत आल्यानंतर साडेअकरा वाजताच्या दरम्यान त्यांनी शिडी हटविण्यासाठी पुढाकार घेतला. शिडी थोडी पुढे सरकवत असतांना वरून गेलेली १३३ केव्हीची विद्युत तार कुणाच्याही लक्षात आली नाही आणि नेमका त्याच वेळी शिडीचा आणि ताराचा संपर्क आल्याने ही दुर्घटना घडली. क्षणार्धात त्याठिकाणी अंगावर शहारे येणार प्रसंग घडल्याने अनेकांना घटनेचा विश्वास बसत नव्हता. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने पोलीस, विद्युत विभाग यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. विद्युत विभागाच्या चमूने तातडीने परिसरातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला होता.
नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांचेसह पोलीस कर्मचारी, विद्युत विभागाचे अभियंता गावंडे यांचेसहविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर होते.पोलीस आणि विद्युत विभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने पंचनामानंतर ती शिडी हटविण्यात आली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या