Header Ads Widget

थेट किना-यावर....!

  -"शेर लिहण्या मी मला बेभान करतो,
  गझ़लसाठी या जिवाचे रान करतो"
  "थांबते दारात माझ्या रात्र जेव्हा,
  चांदणे माझे तिला मी दान करतो",

  असे म्हणत मा.संदीपजी वाकोडे यांनी, गझ़ल रसिकांना दर्जेदार,विविधांगी,बहारदार असा 'किनारा' गझ़ल संग्रह समर्पित केला.'किनारा'. येण्याची शब्दश: वाट पाहिली. आणि एक दिवस शाळेत असतांना घरुन फोन आला , 'किनारा' घरी पोहचल्याचा. 'किनारा' हातात घेतला , वाटलं जणू गझ़लेच्या प्रशांत सागरास शब्दांचे अर्ध्य देण्यास सज्ज झालाय 'किनारा'.समर्पक आणि न्याय्य असे शिर्षक असलेला,माननीय संदीपजी वाकोडे यांचा गझ़ल संग्रह 'किनारा'सर्वप्रथम 'किनाराकाराचे ' मन:पुर्वक अभिनंदन!

  किना-याचे मुखपृष्ठ आकर्षक आणि प्रतिकात्मक आहे.मलपृष्ठावरची 'गझ़लनवाज़ आदरणीय भिमरावजी पांचाळे' ,यांची भरभरून कौतुक करणारी दाद ,किना-याच्या समृध्दीत भर टाकते.अर्पणपत्रिकेत कुटूंबाविषयीची माया,मुर्तिजापूरच्या मातीचा रास्त अभिमान आणि ऋणनिर्देशामधील सहकार-यांचे ऋण,यातून किनाराकाराची विनम्रता दिसून येते.किनारा वाचतांना अनुभूती येते,ती म्हणजे सामाजिक भान,उत्कृष्ट खयाल,सकारात्मकता,प्रेरणादायी अशा अनेक पैलूंना किना-याचा स्पर्श होण्याची.

  "मी थांबणार नाही मी चालणार आहे
  माघार मान्य नाही मी झुंजणार आहे"

  अशी सुरुवात करत 'झुंजार' सारख्या गझ़लेतून जगण्याच्या संघर्षासाठी प्रेरणा देऊन जातात.,तर भिमराया,रमाई,बुध्द पाहिजे,यासारख्या गझ़लेतून शायर नतमस्तक होतांना दिसतात. सामाजिक यंत्रणा,व्यवस्था,ढोंगीपणावर सरळ वेध साधणा-या " सत्य, कोलाहल,जात,फूट", या गझ़लाही वाचकांना विचार करायला भाग पाडतात. सामाजिक भान ठेवता- ठेवता हळूवार भावनांचे खयाल हाताळणारा,हळवा रचनाकाराची छवी ही पाहायला मिळते.

  "तो न नुसता वावराचा सातबारा
  आमच्या तो यातनांचा गोषवारा",
  या शेरातून शेतीशी आणि-
  "घोषणा गावात आली शासनाची
  आत्महत्येला पुरेसा भाव आता "

  अशा भावना मांडत गावाशी असलेला जिव्हाळा वाचकालाही हळवा करून जातो.

  "नाही गड्या जमाना दिलदार माणसाचा",

  तसेच' पाशवी' आणि 'सत्य'इतिहासातले सांगताना माणुसकीच्या अभावाची हळहळ वाकोडे सर व्यक्त करताना. तकेच नव्हे तर,'किनारा 'पेश करताना,चांदण्याची ही भुरळ किनाराकाराला पडलेली दिसते ;- आशातच,

"तुला भेटता बोलणे का सुचेना
  कसे शब्द ओठी दडू लागलेले"
  आणि "रस्ता तुझ्या घराचा"

  या शेरातून प्रेमाची वहिवाट सार्थ मांडली आहे.गझलेतील 'सकारात्मकता' अबाधित ठेवत गझल चळवळीला शिखरापर्यत नेणारे मा.संदीपजी वाकोडे सर यांचा वाचकाला रास्त अभिमान वाटतो.

  "वाळवंट भोवती जरी
  अंतरी बहार पाहिजे",
  अशी प्रेरणा देणा-या ,तर "गुणवान माणसांच्या भेटीची"अपेक्षा करणा-या,आणि
  "वेदना ही भरजरी पाहिजे",

  असा दमदार आशावाद मांडणा-या एका गझ़ल काराला 'किनारा' च्या निमित्त्याने वाचता आले-भेटता आले.माझ्या इवल्याशा कुवतीप्रमाणे मा.वाकोडे सरांच्या 'किनारा' चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. वाकोडे जरी नाव असले तरी वाकड्यात मी शिरत नाही ",म्हणणारे' वाकोडे सर, गझलेच्या माध्यमातून अनेक विषयाच्या खयालात मात्र शिरतात. अश्या गझलेला अर्पण झालेल्या गझलकाराचे 'गझलेशी नातं घनदाट व्हावं' ;'किनारा' बहुप्रसिध्द व्हावा, यशस्वी व्हावा, अशा शुभेच्छा देते. मा. श्री. वाकोडे सरांचे मनापासुन अभिनंदन आणि शेवटी,

  'बघा आसवांनी श्रीमंत झालो'-
  म्हणत,"गझलेसवे झिंगलेला जन्म" घेणा-या किनाराकारास सलाम!!!!!!!v
   -रोशनी कडू-निंभोरकर
   किनारा
   (मराठी गझलसंग्रह)
   -संदीप वाकोडे
   प्रकाशन-
   स म ग्र प्रकाशन,तुळजापुर
   मुल्य-150रू.
   संपर्क-9527447529
   9421832623
   ॲमेझाॅन व फ्लिपकार्ट वर सुद्धा संग्रह उपलब्ध आहे.
   -ॲमेझाॅन लिंक
   https://www.amazon.in/s?me=ACGVK05N5AHXP&ref=sf_seller_app_share_new
   -फ्लिपकार्ट लिंक-
   https://dl.flipkart.com/s/CAXdqJNNNN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या