मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान ५७ वर्षांचा झाला. या खास दिवशी त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बॉलीवूडमध्ये तब्बल ३0 वर्षांपेक्षा अधिक काळ अभिनय करूनही त्याची जादू अजूनही कायम आहे. ५७ व्या वर्षीही त्याच्याच नावाने चित्रपट चालतात. कोणताही सिनेमा हिट करण्याची गॅरंटी असते.
२७ डिसेंबर १९६५ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सलमानचा जन्म झाला. त्याचा चाहता वर्ग आज जगभरात आहे. प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक उर्फ सलमा यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानचं पूर्ण नाव अब्दुल रशीद सलमान खान असं आहे.
सलमान खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याची पहिली कमाई फक्त ७५ रुपये होती. पण आज सलमान कोटींमध्ये कमवत आहे. भारतातील अनेक शहरात त्याच्या नावे संपत्ती आहे. एवढंच नाहीतर बीइंग ह्युमन नावाचा त्याच्या स्वत:चा ब्रँडही आहे. जो खूपच प्रसिद्ध आहे.
सलमान खान हा नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. मग ते एखाद्या अभिनेत्रीशी जोडलेलं नाव असो, हिट अँड रन केस असो वा काळ्या हरिणाच्या शिकारीचा खटला असो. ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. पण त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट झालेली नाही. कारण सलमानचे चाहते नेहमीच त्याला चांगल्या मनाचा माणूस मानतात. जो गरजूंच्या मदतीला नेहमी तत्पर असतो.
0 टिप्पण्या