Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अधिवक्ता म्हणून कार्य करताना सामाजिक उत्तरदायित्वही जोपासावे - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई

* डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा अमृतमहोत्सव * माजी विद्यार्थी मेळाव्यात विविध न्यायमूर्ती, पालकमंत्री, विधीज्ञ यांचा गौरव * विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन * मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचा मेळ घालणे आवश्यक

    अमरावती : मूलभूत हक्कांच्या जपणुकीबरोबरच सामाजिक व आर्थिक न्यायाची प्रस्थापना, तसेच जनसामान्यांचे हित साधले जाणे हे संविधानाच्या निर्मात्यांच्या विचारांचे सूत्र होते. मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचा मेळ घालणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे. वकीली हा केवळ उपजिविका किंवा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वही त्यातून जोपासले गेले पाहिजे. ही जाणीव वकीली व्यवसायात शिरू पाहणा-या विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज येथे केले.

    डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा अमृतमहोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी संमेलन व महाविद्यालयाच्या विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. विजय आचलिया, न्या. पी. एन. देशमुख, न्या. अनिल किलोर, छत्तीसगडचे माजी महाधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश रवींद्र एम. जोशी, लंडन येथील ज्येष्ठ अधिवक्ता साजिद शेख, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारीणी चे सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ.अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा एन. देशमुख यांनी प्रस्ताविकातून महाविद्यालयाची वाटचाल मंडळी व पाहुण्यांचे स्वागत केले.

    भूमीपूजनानंतर ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यायमूर्ती श्री. गवई, पालकमंत्री श्रीमती ठाकूर, विविध न्यायमूर्ती, अधिवक्ता आदी मान्यवरांचा भावपूर्ण सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.

    न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले की, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी, शेतमजूर, जनसामान्यांच्या केसेस लढून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांनी स्थापलेल्या महाविद्यालयामुळेच या भूमीतील अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊसाहेब या दोहोंचे ध्येय एकच होते. गोरगरीब, वंचित, जनसामान्यांचे उन्नयन हे त्यांचे स्वप्न होते व त्यासाठी त्यांनी आजीवन कार्य केले. दोहोंनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली.शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देणे हे घटनाकारांना अभिप्रेत आहे. त्यामुळे अधिवक्ता म्हणून कार्य करत असताना प्रत्येकाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जोपासली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

    पालकमंत्र्यांकडून महाविद्यालयाला एका वर्षाचे वेतन

    देशात लोकशाही भक्कम करण्यात न्यायपालिकेने मोलाची भूमिका बजावली. संविधानातील मूल्यांची जपणूक व पावित्र्य जपण्याचे कार्य न्यायपालिकेने केले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले. महाविद्यालयातील विविध आठवणींना त्यांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला. महाविद्यालयासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करू, असे सांगतानाच, आपले एक वर्षाचे वेतन महाविद्यालयाला देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

    श्री. शेख यांनी धारणी ते लंडन प्रवास उलगडला

    धारणीसारख्या दुर्गम गावातून येऊन लंडनला अधिवक्ता म्हणून कार्य करणा-या श्री. शेख यांनी आपला प्रवास आपल्या मनोगतातून उलगडला. भाऊसाहेबांनी स्थापलेल्या महाविद्यालयामुळे व ॲड. एस. झेड. पाटील यांच्यासारख्या गुरुजनांच्या मार्गदर्शनानेच ही वाटचाल होऊ शकली, अशी कृतज्ञता श्री. शेख यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती विजय आचलिया,न्या. देशमुख, श्री. गिल्डा यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. डॉ.माधुरी फुले यांनी कार्यक्रमाचे संचालन, कु.मैथिली फुले यांनी उद्देशिकेचे वाचन केले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला श्रीमती कमलताई गवई, डॉ. सुधाताई देशमुख, पुष्पाताई बोंडे, शरद तसरे, ऍड.प्रदीप महल्ले, ऍड.अशोक जैन, अमरावती जिल्हा बार कौन्सिल चे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील विधीज्ञ मंडळी व माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code