Header Ads Widget

फिट आल्यानंतर काय करावे?

  एपिलेप्सी हा एक मेंदूसंदर्भातील आजार आहे. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी एपिलेप्सी हा आजार ओळखला जातो. फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. सुमारे १0 व्यक्तींपैकी एकाला फिट्स येण्याचा त्रास असतो. फिट्स येण्याची समस्या अनुवांशिकही असू शकते, याशिवाय मेंदूचा संसर्ग, डोकेदुखी, स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरही याला कारणीभूत आहे. विशेषत: मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. मेंदूमध्ये छोट्या पेशीमध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसर्‍या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडते आणि फिट्स येण्याचा धोका वाढतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात आणि नंतर झटके येऊ लागतात, दातखिळी बसणे, ओठ चावणे, अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळणे, तोंडातून फेस येणे, कपडयामध्ये लघवी करणे, डोळे फिरवणे ही फिट्स येण्याची लक्षणे आहेत.

  फिट्स आल्यास काय कराल?
  * जेव्हा एखाद्या व्यक्तीस फिट येत असेल तर त्याला लगेचच डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपवावे. जेणेकरून त्याच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
  * रुग्णाला काहीही प्यायला देऊ नका.
  * रुग्णाच्या डोक्याखाली मऊ उशी द्या.
  * रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर करा.
  * जर रुग्णाने घट्ट कपडे घातले असेल तर त्याचे कपडे सैल करा.
  * रुग्णाचं तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.
  * साधारणत: फिट ही दोन किंवा तीन मिनिटं राहते. त्यानंतर व्यक्ती झोपतो. पण ही फिट पाच मिनिटं राहिल्यास रुग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

  नियमित औषधोपचार घेतल्यास फिट्स येण्यावर नियंत्रण मिळवून व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकते.आपल्याकडे अजूनही या फिट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे की, फिट येण्यावर वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. ७0 टक्के प्रकरणात नियमित औषधोपचार घेतल्याने रुग्ण आजारावर नियंत्रण मिळवू शकले आहे. ३0 टक्के रूग्ण औषधांचे सेवन करण्याऐवजी एपिलेप्सी शस्त्रक्रिया करण्यावर भर देतात. अनेक प्रकरणात हे फायदेशीर ठरत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या