Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पर्यावरणाच्या कार्यासाठी तरुणांचा सहभाग वाढायला हवा - अण्णा हजारे

  राळेगणसिद्धी : श्रवण केलंय ते अमलात आणण्याचा प्रयत्न करा 'सच की नाव डुबती नही है ।' देशातील सनदी अधिकाऱ्यांनी ठरवलं तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. कोणत्याही सरकारच्या अधिकारात फक्त बदली करणे आहे आणि अधिकारी बदलीला घाबरतात. अशा वातावरणात चांगले अधिकारी काम करताना दिसतात हा एक आशेचा किरण आहे. हे चित्र पाहिल्याने आपल्याला एक पाऊल पुढं टाकण्याची शक्ती मिळाली आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून 'जे श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा' अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे यांनी केली.

  राळेगणसिद्धी येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हजारे पुढे म्हणाले, या संमेलनाला सांगलीचा एक तरुण, पुण्यातील काही तरुण सायकलने पर्यावरणाचा संदेश देत आले, हे कौतुकास्पद आहे.

  स्व.आबासाहेबांचे काम पुढे सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. मागील ३८ वर्षांचा त्यांचा व माझा सहभाग राहिला होता. इथलं चित्र पाहून हा देश उभा राहिलं, असा विश्वास वाटत आहे . लोकांमध्ये विश्वास निर्माण करा , युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तिला योग्य दिशा दिल्यास हा देश घडू शकेल. पर्यावरणाची समस्या खूप गंभीर असून सर्वांनी त्याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

  माधुरी काकडे यांनी पर्यावरणविषयक काव्य सादरीकरण केले. श्री.साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत धिवरे, 'वी सिटीझन्स’ चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने, पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनीही मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन अण्णा हजारे यांच्याहस्ते करण्यात आले. या वेबसाईटची निर्मिती चिपळूणचे 'वेब डिझायनर आणि डेव्हलपर' कुंदन शेट्ये यांनी तर संपादन मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले आहे. दुपारच्या भोजनानंतरच्या सत्रात वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी ‘पाणी व जलव्यवस्थापन’, पक्षीमित्र अनिल माळी यांनी ‘महाराष्ट्रातील पक्षी विविधता आणि अधिवास संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले.उद्घाटन समारंभात श्री.साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत धिवरे यांनी पुढील पर्यावरण संमेलन शिर्डी येथे घेण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी संस्थान सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी ग्वाही दिली. अनुभव कथन, बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, क्षेत्रभेट आयोजित करण्यात आले.

  *'पद्मश्री' पुरस्कार माझ्या काळ्या आईचा, बीयांचा आणि समाजाचा*- राहीबाई पोपेरे

  पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, माझ्या बियांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे. मागील २५ वर्षांपासून देशी बिया घरी जतन करत असल्याचे त्या म्हणाल्या. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. गावपातळीवर कळसूबाई समिती स्थापन झाली असून सध्या संस्थेच्या सहाय्याने ३ हजार महिलांसोबत हे काम सुरू आहे. ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.

  राळेगणसिद्धी येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यस्तरीय पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, ‘ वी सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे, मंडळाच्या सचिव श्रीमती वनश्री मोरे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या भोजनानंतर समारोप समारंभात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘सौरऊर्जा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात स्वच्छ भारत मिशनच्या प्रभाकर तावरे यांचे ‘प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन’, अमेरिकतील पर्यावरण अभ्यासक संगीता तोडमल यांचे ऑनलाईन पद्धतीने ‘पर्यावरणाचे वेगळेपण’ या विषयावरील सत्र संपन्न झाले.

  रासायनिक खते, फवारणी, कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे. मात्र, आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत. तसेच आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की, त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे महत्त्व आपल्याला कळायला हवे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे राहीबाई पोपरे यांनी सांगितले.समारोप समारंभात, राज्यभरातून आलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना राहीबाई यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

  स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरेगाव स्मशानभूमीत करण्यात आलेल्या ६७ वृक्षरोपणामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले. फाउंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, वनश्री पुरस्कृत बाळासाहेब जठार यांनी याकामी योगदान दिले.सूत्रसंचालन धीरज वाटेकर तर आभार प्रमोद काकडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code