Header Ads Widget

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होणार -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    अमरावती : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुस-या टप्प्यात 10 हजार किमी रस्ते बांधणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातही ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन, दळणवळणाची भक्कम सुविधा निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. प्रशासनानेही या योजनेतून जिल्ह्यात अधिकाधिक ग्रामीण रस्ते निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

    ग्रामीण भागात मजबूत रस्ते निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुस-या टप्प्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातही ग्रामीण रस्त्यांची कामे वेग घेणार आहेत. यापूर्वी याबाबत बैठकीद्वारे आढावा घेऊन व आवश्यक तिथे रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, यानंतरही आवश्यक रस्त्यांबाबत प्रशासनाने प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश नसलेल्या आणि दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या धर्तीवर दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. रस्त्यांची दर्जोन्नती करताना कोअर नेटवर्कमधील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचाही सुधारण्याच्या विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या संपूर्ण बाबींचा विचार करून प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

    मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच रस्त्यांची निवड जिल्हा स्तरावर गठित करण्यात आलेल्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येणार आहे. दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकूण लांबी व त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची लांबीच्या प्रमाणात त्या-त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कामांचा विचार केला जाणार आहे. वर्दळ जास्त असलेल्या ग्रामीण रस्त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या