हिंगोली : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर शिवारामध्ये ट्रक व खासगी बसचा भीषण अपघात झाल्याने पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींना उपचारासाठी कळमनुरी आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नांदेड येथून एक खासगी बस प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरीकडून आखाडा बाळापूरकडे जाणार्या कंटेनरची खासगी बससोबत समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की खासगी बसमध्ये केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी चालकाच्या समोरील काच फुटून बाहेर फेकले गेले.या अपघातामध्ये चार ते पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे यांच्यासह कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी आले.
पोलीस व गावकर्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चार रुग्णवाहिकांद्वारे अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी व आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात पाठविले आहे. कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली सापडलेली दोन जणांचे मृतदेह जेसीबीद्वारे कंटेनर उचलून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तींचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती अपघाताची भीषणता दर्शवित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या