Header Ads Widget

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 10 डिसेंबरपर्यंत

  अमरावती : राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य व जिल्हास्तरावर एक युवक व युवती तसेच एक संस्था याप्रमाणे स्वतंत्र पुरस्कार देण्याबाबत 2019-20 व 2020-21 वषासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. अर्जदारांनी प्रत्येक वर्षीसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावेत.

  युवा पुरस्कारासाठी जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. प्रतियुवक व युवतीसाठी गौरव पत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम दहा हजार रूपये तर प्रति संस्थेसाठी गौरव पत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार रूपये अशा स्वरूपाचा पुरस्कार असेल.

  युवक-युवतींसाठी पात्रता निकष

  अर्जदार युवक व युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 15 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 29 वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य व राज्यस्तर पुरस्कारासाठी राज्यात दहा वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. हा पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेत विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निम-शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

  संस्थासाठी पात्रता निकष

  संस्थेस पुरस्कार विभागून दिला जाणार नाही. संस्थानी केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक राहील.

  पुरस्कारासाठी युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थानी केलेले कार्य दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील तीन वर्षात केलेले कार्य विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, साधनसंपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती व जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतच्या कार्यांचा समावेश असेल. तसेच शिक्षण, प्रौढ शिक्षण , रोजगार, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्सहान देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, साहस इत्यादी कार्याचा यात समावेश राहील. जिल्हा पुरस्कारासाठी युवक युवती व संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या