अमरावती : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. त्यात मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावातील ग्रामपंचायत कार्यालय सावरखेड येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट उन्नतीअंतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती कडून सावरखेड, आखतवाडा आणि घोडगव्हाण येथील २०१८-१९ च्या मनरेगा यादीतील १०० दिवस काम पूर्ण केलेल्या ३० इच्छुक उमेदवारांचे कंपोस्ट खत व दुग्धव्यवसाय या विषयावरील १० दिवसीय स्वयंरोजगार प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे.
या समारंभात पंचायत समिती मोर्शी येथील उपसभापती सोनालीताई नवले यांनी उद्घाटक म्हणून संबोधन केले. ग्रामपंचायत कार्यालय सावरखेड येथील सरपंचा सौ. लताताई जोमदे या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक निखिल भस्मे व प्रशिक्षक/समन्वयक दिपक माहुरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त कार्यक्रमाला उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील व्यवस्थापक विजय गुल्हाने, आर्थिक समावेशक राहूल वानखडे, ग्रामपंचायत कार्यालय सावरखेड येथील सदस्य निलेश टारपे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिला यांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे उपजीविकेची साधने निर्माण करण्यासाठी प्रोजेक्ट उन्नती अंतर्गत मनरेगा जॉब कार्ड धारकांपैकी १०० दिवस काम पूर्ण केलेल्या १ सदस्य, महिला, पुरुष यांना जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण संस्था आरईएसटीआय, डीडीयुजीकेआय तसेच कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर यांच्याद्वारे विविध प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात.