• Wed. Sep 20th, 2023

सीडीएस बिपीन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार

  नवी दिल्ली : देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचे निधन झाले असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताविषयी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिले. सीडीएस बिपीन रावत आणि इतर सर्व सहकार्‍यांवर लष्करी इतमामात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. दरम्यान सीडीएस बिपीन रावत यांचा मृतदेह दिल्लीत आणण्यात आला आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरने एअरबेसवरून उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होते. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २0 मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

  जंगलात धूर दिसला

  दरम्यान, काही स्थानिकांना जंगलातल्या एका भागातून धूर येताना दिसल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जंगलात काही स्थानिक लोकांना आग लागल्याचे दिसले. ते धावत तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकाने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जितक्या लोकांना वाचवणे शक्य होते, त्यांना लागलीच वेलिंग्टनच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात १४ पैकी १३ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

  चौकशीचे आदेश

  या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. इंडियन एअरफोर्सकडून एअर मार्शल मानिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पथकाने कालच वेलिंग्टनला पोहोचून आपले काम सुरू केले आहे. या अपघातात रावत आणि त्यांच्या पत्नीसह ब्रिगेडीयर एल. एस. लिड्डेर, ले. कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, के. सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक, लान्स नायक बी. एस. तेजा, हवालदार सतपाल यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातापूर्वी शेवटच्या काही क्षणांचा व्हिडीओ एएनआयने ट्वीट केला असून त्यामध्ये हेलिकॉप्टर मोठा आवाज करत जंगलाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये काही स्थानिक देखील दिसत आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,