• Tue. Jun 6th, 2023

सीडीएस बिपीन रावत अनंतात विलीन

    अंत्यसंस्काराला अलोट जनसागर उसळला

    नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका अनंतात विलीन झाले. नवी दिल्ली कंटोमेंट बोर्डातील बरार स्क्वेअरमध्ये बिपीन रावत यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी देण्यात आली.अंत्यसंस्कारावेळी तिन्ही दलांचे प्रमुख आणि ८00 जवान उपस्थित होते. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तरिनी यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

    बरार स्क्वेअरमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी र्शद्धांजली वाहिली. बिपीन रावत यांच्या पार्थिवाला तिन्ही दलांच्या अधिकार्‍यांनी खांदा दिला. बिपीन रावत याना अखेरचा निरोप देण्यासाठी भुतान, बांगलादेश, नेपाळ तसेच श्रीलंका आदी देशांमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. जगभरातील अनेक देशांकडून बिपीन रावत यांच्यासाठी शोकसंदेश देण्यात आला.

    बिपीन रावत यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कामराज मार्गावरील त्यांच्या सरकारी निवासस्थानी शुक्रवारी सकाळपासूनच सर्वसामान्यांसह गणमान्य व्यक्तींनी गर्दी केली होती. गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, जम्मू-काश्मीर आणि दिल्लीचे नायब राज्यपाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, हरीष रावत यांच्यासह अनेक खासदारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत र्शद्धांजली अर्पित केली.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, डीएमके नेते ए.राजा तसेच कनिमोझी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कामराज मार्गावरील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी देखील त्यांच्या आई-वडिलांचे अंतिम दर्शन घेत त्यांना नमन केले. अनेक देशांच्या राजदूतांनीदेखील जनरल बिपीन रावत यांचे अंत्यदर्शन घेतले.

    दरम्यान, ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांच्यावर सकाळी १0 वाजून ४0 मिनिटांनी बरार स्क्वायर येथे अंत्यविधी करण्यात आले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, हरियाणाचे मुख्यमंत्री, एनएसए अजित डोभाल, लष्कराचे अधिकारी तसेच जवानांनी यावेळी त्यांना र्शद्धांजली दिली. ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांनी कांगोमध्ये यूएन मिशन अंतर्गत त्यांची सेवा दिली होती. चीनलगत सीमेवर प्रभावी रणनीती बनवण्यासह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानाची रणनीती आखण्यात ब्रिगेडियर लिड्डर यांचे महत्त्वाचे योगदान होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *