• Tue. Jun 6th, 2023

सामाजिक भान जपणारा कविता संग्रह ‘कोवळी किरणं’

  कवयित्री किरणताई पिंपळशेंडे यांचा कोवळी किरणं हा कवितासंग्रह सुरवातीला भाऊ, बहीण, मैत्रीण आणि वडीलांन वरच्या कविता वाचत असतांना हा संग्रह व्यक्ती विशेष असल्याचा गोड गैरसमज झाला होता; परंतू नंतर मात्र एक एक कविता वाचतांनी या कविता संग्रहाची खोली कळत गेली.मानवी स्वभावा नुसार बरेचदा आपण एखाद्या गोष्टीच्या खोलवर न जाता सुरवातीलाच आपले मत मांडून मोकळे होत असतो किंवा अर्धवट माहिती वरून आपल्या मनात पूर्वग्रह जोपासत असतो,आपले हेच अर्धवट वाचन किंवा ज्ञान कुणाच्या तरी अपप्रचाराने कारण बनत असते याची जाणीव संपूर्ण कविता संग्रह वाचल्यावर झाली आणि माझेच मला दोष उघडपणे दिसायला लागले.

  आपण कसे लिहीतोय, या पेक्षा काय लिहीतोय हे जास्त महत्वाचे. ब-याचदा लिहीतांनी आपण मनातला खरे पणा झाकून कवितेला चांगूल पणाची झालर चढवत असतो.समाजातही वावरतांना मुखवट्याचा चेहरा घेऊन मिरवत असतो, परंतू त्या चेहऱ्याचे खरे वास्तव आपल्याला माहीत असते.आपल्या शब्दातून आपल्या मनाचा खरेपणा शब्दबद्ध करणे एवढे सोपे नसते, मला कवयित्री किरणताईंचा सार्थ अभिमान वाटतो तो यासाठीच की त्यांनी *’एक असाही बाप’* या कवितेतून वडीलांन विषयी असलेले खरे भाव प्रांजळपणे व्यक्त केलेले आहे.

  बाप म्हणून मला कधी वाटलाच नाही..
  त्यांचा अजूनही माझ्यावर जीव कधी जडलाच नाही..
  काय लिहावे बापावर आतून काही उफाळून येत नाही
  जन्म दिला त्यांनी म्हणून
  मी कर्तव्याला कमी पडत नाही…
  आजही ते आले घरी तरी
  मला फारसा आनंद होत नाही
  म्हणून बाबांवर फारस काही लिहीत नाही…

  खरे पाहता जीवनाची हीच खरी वास्तविकता आहे,आई प्रेमाचा सागर म्हणणारे आम्ही बापाला करूणेचा पाट कधीच म्हणणार नाही.बाप प्रत्येक घरात दुर्लक्षितच असतो;तो कितीही जीव लावणारा असला तरी..बाप म्हणून बापाच्या वाट्याला आलेली ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

  ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ कवी यशवंत यांनी किती सहजपणे आईची महती वर्णन केलेली आहे.माय लेकराची असो की वासराची ती आईच असते तिच्या प्रेमात कधीच फरक पडत नाही. कदाचित त्यामुळेच कवयित्रीने आपला पहिलावहिला कविता संग्रह आपल्या आईस अर्पण केलेला आहे.आई कशी असते..हे या सुंदर ओळीतून कळायला लागते.

  रखरखत्या उन्हात
  हवेची एक मंद मंद हलकीशी झुळूक यावी
  आणि मन सुखावून जावं
  ती झुळूक म्हणजे आई..!!
  व्याकुळल्या वासराची हाक
  ऐकून कपिला भरल्या पान्ह्याने धावत सुटावी
  आणि वासराची भूक शमवावी
  ती भूक म्हणजे आई असते..!!

  कथा, कविता,अभंग साहित्याच्या कुठल्याही प्रकारात आईची महती वर्णन केलेली आढळून येते.

  ‘स्त्री आणि घर’ ही अनादी काळापासून परस्पर पुरक संकल्पना.हे नाते अगदी अनाकलनीय.घरात वावरणारी स्त्री घरातील नाते संबंध जेवढ्या आपुलकीने जपते, तेवढ्याच आपुलकीने ती घरातील प्रत्येक वस्तूंशी आपले नाते जपत असते; या नात्यांन मधील बांधीलकी अतिशय कमालीची याची जाणीव ‘ ‘कोवळी किरणं’ या कवितासंग्रहातील रद्दी ही कविता वाचतांनी येते ही जाणीव शिक्कामोर्तब होते ती ‘कागदोपत्री सत्य’ ही कविता वाचतांनी.

  अंगाई,भुपाळी,जात्यावरची गाणी रचता रचता बदलत्या युगाशी एकरूप होऊन समाजाप्रती आपली कर्तव्यनिष्ठा जपत सभोवताली घडणाऱ्या ब-या वाईट घटनांची नोंद स्त्री वाङमय यातून पहावयास मिळते,कोवळी किरणं हा कवितासंग्रह सुद्धा यात कुठेच मागे नाही.कारण प्रेम आणि निसर्ग कवितान बरोबर सामाजिक बांधिलकीची जपणा-या कवीता ही या संग्रहात वाचायला मिळतात.

  शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अवास्त बदलामुळे विद्यार्थ्यांची होत असलेली गळचेपी चिंतेचे कारण होत आहे, याचे दुःख कवयित्री आपल्या ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या , आजकाल तरूण पिढी’ या कवितांमधून मांडतांना दिसतात.
  दिव्यांग विकलांग, राजकारण,रावण या कवितांमधून सामाजिक व्यंगावर अलगद बोट ठेवतात.

  परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परंतू हा बदल आपल्याच वाट्याला आला तर त्याची सल कुठेतरी सारखी बोचत असते.ही सल कवयित्री आपल्या ‘बदल’ या कवितेतून व्यक्त करते. स्त्री जन्म हा शाप की अभिक्षाप! हा प्रश्न वारंवार समाज मन विचारत असतो परंतु तोच समाज मात्र स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार बहाल करत नाही ही खंत आहे.

  ‘कोवळी किरणं’ या संग्रहा सोबतच किरण ताईंच्या पुढील लिखाणास खूप शुभेच्छा देत प्रत्येकाने हा संग्रह वाचावा हीच अपेक्षा..!!

  -शरद बाबाराव काळॆ
  धामणगांव रेल्वे
  ९८९०४०२१३५
  शब्दश्री प्रकाशन
  कविता संग्रह :- कोवळी किरणं
  कवयित्री.. किरण पिंपळशेंडे
  मो नं. ९९६०३५२९०५
  मुल्य १२०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *