वलगाव येथील पाणीपुरवठा सुविधेसाठी 92 लक्ष निधीला प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  पूर पुनर्वसित गावांतील पाणीपुरवठा योजना पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

  अमरावती : जिल्ह्यातील पूर पुनर्वसित गावांमध्ये विविध सुविधांची उभारणी होण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. त्यांच्या प्रयत्नांनुसार अमरावती तालुक्यातील वलगाव या पूरग्रस्त गावांतील पाणीपुरवठा सुविधेसाठी 92 लक्ष 85 हजार पाचशे रूपये निधीला प्रशासकीय मान्यता महसूल व वन विभागातर्फे आज प्रदान करण्यात आली.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या, पूर पुनर्वसित गावांत आवश्यक नागरी सुविधा निर्माण होण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्याकडून याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार वलगावच्या पाणीपुरवठा सुविधेबाबत पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन लवकरच हे काम गती घेणार आहे.

  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रशासकीय मान्यतेनुसार प्रस्तावाधीन नागरी कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व ती पूर्ण करून कार्यारंभ आदेश देऊन काम पूर्ण करावे, असे आदेश महसूल व वन विभागाने दिले आहेत.

  जिल्ह्यातील विविध पुनर्वसित गावांतील आवश्यक सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा होत आहे. विकासकामांसाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनानेही नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक कामांचे वेळेत प्रस्ताव द्यावेत. मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले.