राज्यात पाच महिन्यांत १0७६ शेतकरी आत्महत्या

    मुंबई : राज्यात जून ते ऑक्टोबर २0२१ या कालावधीत एकूण १0७८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी ही माहिती दिली. या आत्महत्यांपैकी ४९१ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना आर्थिक मदतही दिल्याचेही ते म्हणाले आहेत.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतरही नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यासबंधी तसंच आर्थिक सहाय्य आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाय योजनांबद्दल प्रशन विचारण्यात आले होते.जून ते ऑक्टोबर २0२१ कालावधीत १0७६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने ४९१ पात्र ठरवली असून, २१३ अपात्र ठरली आहेत. तर ३७२ प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

    पात्र ४९१ पैकी ४८२ जणांना मदतीचं वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली. नापिकी, राष्ट्रीयकृत बँक किंवा मान्यताप्राप्त सरकारकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकर्‍यांच्या वारसांना एक लाखाची मदत दिली जात आहे, असं यावेळी त्यांनी सांगितले.