• Sun. May 28th, 2023

मानव कल्याणासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज “

६ डिसेंबरला मोठ्या संख्येनं भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील लोक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमतील. मोठ्या श्रद्धेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल सुद्धा आपले विचार मांडतील. हार, फुलं, मोमबत्या मोठ्या श्रद्धा सुमनाने वाहतील व आपल्या घरी निघून जातील. हे आपण वर्षा नी वर्षो करत आलो आहोत, बघत आलो आहोत. काय हे पुरे आहे ? काय खरचं आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचू शकलो आहोत काय ?

आज अजूनही गरज आहे मानव कल्याणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहचविण्याची. आज ७१ वर्ष होऊन सुद्धा सामान्य नागरिकांना त्यांचे काय अधिकार आहेत ? काय कर्तव्य आहेत ? ह्याची जाणंच नाही. मग ते लढतील कसे ?
बाबासाहेब आज आमच्यावर अन्याय झाला की, आम्हाला तुमची आठवण होते. एरव्ही नाही. माझ्यावर अन्याय झाला की, मला सर्वप्रथम वकील, कोर्ट, न्याय व्यवस्था, व्यवस्थापन, प्रशासन तुम्ही लिहिलेली घटना सर्व आठवतं आणि न्याय मागण्यासाठी आम्ही हे सर्व दरवाजे ठोठावितो.
बाबासाहेब आम्ही तुमच्या जीवनाकडे जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटते की आपण त्या काळात कसे काय लढलात ? एकटेच तर होते तुम्ही ! संपूर्ण व्यवस्था तुमच्या विरोधात होती. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तर्कशुद्ध पद्धतीने मांडत होते तेव्हाही त्यावेळच्या व्यवस्थेला ती रुचत नव्हती, पचनी पडत नव्हती. तुमच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा काहीच विचार केला जात नव्हता. पावलो पावली अपमान केल्या जायचा. काय वाटत असेल हो तुम्हाला ? कसं काय आपण सर्व हे सहन केलं ? तरी पण तुम्ही हरला नाहीत. लढत राहिले आणि सदैव सर्व सामान्यांच्या बाजूला उभे राहून त्यांना न्याय व हक्क मिळवून दिले.
मी जेव्हा तुमचा एक-एक सत्याग्रह, आंदोलन बघतो तेव्हा मला खूप आश्चर्य तर वाटतेच व अभिमान सुद्धा वाटतो. महाड चवदार लढ्याचा सत्याग्रह बघा ना. गोष्ट एव्हढीच होती की, सर्वांना पाणी मिळण्याची. विशेष करून समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत हे पाणी मिळण्याची. बाबासाहेब आपण हे आंदोलन का केले ? हे आत्ता आम्हाला कळले. जेव्हा आपण आम्हाला मिळून दिलेले अधिकार काढून घेऊ लागल्यामुळे. बाबासाहेब आपणास माहित होते की, चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने लोक काय अमर होणार नाहीत किंवा ते काही अमृत नव्हते. परंतु आपल्या आंदोलनाच्या मागे उद्देश होता सामान्य माणसांना समान अधिकार मिळण्याचा. किती महान उद्देश होता आपला. एका सत्याग्रहातून आपण एक मोठे बंडाचे निशाण फडकावून यशश्वी केले. तेव्हा सुद्धा तुमच्या जिविताला धोका होता परंतु आपण डगमगले नाहीत. आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आपण मानव कल्याणासाठी सतत लढत राहिले.
मला तुमचा दुसरा सत्याग्रह आठवतो. तो म्हणजे मंदिरामध्ये सर्वाना प्रवेश करण्याचा. बाबासाहेब तुम्हाला माहित होते हा सामान्य तळागाळातील माणूस मंदिरात जाऊन काही अमर होणार नाही किंवा पवित्र होणार नाही. पण ह्याच्या प्रवेशामुळे तो माणूस म्हणून त्याला मंदिरात जाण्याचा अधिकार आहे तो त्याला मिळणार आहे. हे सुद्धा आपण मानवाच्या कल्याणासाठीच केले.
बाबासाहेब आपण जीवाचे रान करून २ वर्ष, ११ महिने व १७ दिवस अथक परिश्रम घेतले व आम्हा सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणारी घटना भेट दिली.
बाबासाहेब आपण जेव्हा लढले तेव्हाची परिस्थिती ही फार बिकट होती. समाज शिकलेला नव्हता. अडाणी होता. त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढलात व यशश्वी सुद्धा झालात. त्यात तुम्ही स्वतः साठी कधीच लढला नाहीत किंवा कुठलीही संपत्ती जमा केली नाही. आपण लोककल्याण केले हीच आपली खरी संपत्ती. म्हणून तर बाबासाहेब आजही आपलं नाव घेतले की, त्याला वजन आहे एव्हढेच नाही तर त्याला जरब सुद्धा आहे. कसे काय जमले हो बाबासाहेब तुम्हाला हे ? बरोबर आहे त्यात तुमचा काही स्वार्थ नव्हता. तुम्ही निस्वार्थपणे तळागाळातील माणसापासून तर सर्वाना न्याय मिळेल ह्यासाठी लढले म्हणून आजही तुम्हाला स्मरण केले जाते.
बाबासाहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळवून दिला, अधिकार मिळवून दिले, संपूर्ण मानव कल्याणासाठी व्यवस्था निर्माण केली एवढेच नाही तर घटना सुद्धा मिळवून दिली.
पण बाबासाहेब जरी आज मी एवढा शिकला सवरला असूनही माझ्यावर अन्याय होतो आहे. माझ्यात आंदोलन करण्याची हिंमत नाही. मला भीती वाटते. तर्कशुद्ध विषयांवर मला प्रश्न करण्याची हिंमत होत नाही. मी कोणाला प्रश्न विचारू शकत नाही. मला घटनेने अभिव्यक्ती स्वतंत्र दिले. परंतु अभिव्यक्त होता येत नाही. मला भीती वाटते. का बरं बाबासाहेब मी करजोर झालो ? तर मी आपण दिलेला मूलमंत्र ” शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ” ह्या विचारापासून दूर गेलो. मी शिकलो, पदव्या मिळविल्या, पण मी संघटित नाही झालो. संघर्ष तर सोडाच.
आज बाबासाहेब माझे सर्व अधिकार काढून घेतले जात आहेत. तुम्ही मिळवून दिलेली पेन्शन गेली, कंत्राटी धोरणामुळे सुरक्षित मिळालेला रोजगार गेला. आता कसले कामाचे तास आणि सुट्ट्या. मालक म्हणेल ती पूर्व दिशा. मी सेवानिवृत्त झालो त्या रकमेवर मिळणार व्याज हे नगण्य झाले.
मी शिकलो पण माझ्यातील लढण्याचा आत्मविश्वास गमावला. असे म्हणतात की, शिकल्याने माणूस शहाणा होतो पण शिकण्यासोबत मी संघर्षाची नाळ तोडल्यामुळे मी कमजोर झालो.
आज बाबासाहेब गरज आहे आपल्या विचारांची, आपल्या संघर्षाची, सत्याग्रहाची, समर्पणाची, लोक कल्याणाच्या उद्धाराची जाणं राखण्याची.
आज लढण्यापूर्वी माझ्या डोक्यात विचार येतो लढून काय होईल ? माझे आंदोलन चिरडले गेले तर माझे काय होईल ?
बाबासाहेब अन्याय पूर्वी ही होत होता व आत्ता ही होत आहे. परंतु आत्ता अन्याय का होत आहे तर समोरच्याला माहित आहे की ह्यांच्यातील लढण्याची वृत्ती नष्ट झाली आहे व हा समूह समूहाच्या कलहातून विभागलेला आहे.
जेव्हा आपण मानवाला मानव म्हणून त्याकडे बघून मानव कल्याणासाठी लढू तेव्हाच मानवाचे कल्याण होईल व तो उद्धाराकडे जाऊन त्याचे शोषण कमी होईल.
मानव कल्याण उद्धारकर्त्याला विनम्र अभिवादन…!
– अरविंद सं. मोरे,
नवीन पनवेल पूर्व
मो. ९८२०८२२८८२.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *