नवी दिल्ली : मातृभाषेतील अभियांत्रिकी शिक्षण हे सक्षमीकरणाचे साधन असेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ते नवी दिल्लीत ३६ व्या भारतीय अभियांत्रिकी महासभेच्या सांगता सत्रात बोलत होते.
यावेळी प्रधान म्हणाले की, भारत हा वैज्ञानिक वृत्ती आणि मजबूत अभियांत्रिकी क्षमता असलेल्या लोकांचा देश आहे आणि आपल्या सभ्यतेच्या इतिहासात संरचनात्मक अभियांत्रिकी, जल व्यवस्थापन, सागरी अभियांत्रिकी इत्यादींचे वैज्ञानिक पुरावे आहेत, असे प्रधान यावेळी म्हणाले. भारताच्या अभियांत्रिकी परंपरा पुढे नेल्याबद्दल आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात आयइआयच्या भूमिकेबद्दल आयइआयचे त्यांनी कौतुक केले.
दूरदश्री राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २0२0 च्या अंमलबजावणीसह, आम्ही शिक्षणाला कौशल्यासोबत जोडत आहोत, एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा अंगीकार करत आहोत आणि आपल्या युवा पिढीला २१ व्या शतकासाठी तयार करण्यासाठी कौशल्य आणि प्रशिक्षण हा मुख्य अभ्यासक्रमाचा एक भाग बनवत आहोत असे प्रधान यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण २0२0 च्या अनुषंगाने स्थानिक भाषेतील आणि मातृभाषेतील अभियांत्रिकी शिक्षण हे आपल्या तरुणांच्या सक्षमीकरणाचे साधन बनले आहे आणि ते आपले अभियांत्रिकी कौशल्य आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकी शिक्षण केवळ पदव्या देण्यापुरते र्मयादित नसावे यावर श्री प्रधान यांनी भर दिला. शिकण्याच्या प्रक्रियेतील भाषेमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या अभियांत्रिकी समुदायाच्या क्षमता बांधणीसाठी आपण एकत्रितपणे कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.आयइआयने भारताची अभियांत्रिकी क्षमता अधिक बळकट करण्यासाठी नवनवीन संशोधन करत, संस्थेच्या सदस्यांद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण करून आणि रोजगार क्षमता आणि उद्योजकतेची नवीन परिमाणे तयार करून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.