मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या

    नाशिक : मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केंद्राकडे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अखिल भारतीय ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून देसाई यांच्या हस्ते अभिजात मराठी भाषा दालनाचे त्यांच्या हस्ते उद््घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा अभिजात असल्याचा अहवाल केंद्राच्या भाषा समितीला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची याबाबत भेट घेतली आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही चळवण होणे आवश्यक असून १२ कोटी मराठी जनता राष्ट्रपतींना पत्र पाठवणार आहे. या अभिजात भाषा दालन प्रदर्शनात क्यूआर कोड देखील असून तो स्कॅन केल्यास थेट राष्ट्रपतींना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या पत्र जाईल, असे देसाई यांनी सांगितले. अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला गेला आहे.

    अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, १९ व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहिती देणार्‍या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात आहे. मराठीतील प्राचिन व दुर्मिळ ग्रंथ, साहित्य आदी सामुग्री ‘टच स्क्रीन’वर मराठी प्रेमींना पाहावयास मिळणार आहे. याशिवाय शासनाकडून प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांच्या पेन ड्राइव्हमधील विश्‍वकोष विक्रीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.