भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जानेवारी

* केंद्रीय लोकसेवा आयोग, नागरी सेवा परीक्षा -2022 च्या पूर्व तयारीसाठी
* परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम-2022

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अमरावती, दि.21: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा -2022 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य राहील. येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी www.siac.org.in आणि www.gpiasamt.org या संकेतस्थळावरील अर्ज भरावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. संगिता पकडे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

    सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे सुरु असून अर्ज भरण्याचा अंतिम मुदत 7 जानेवारी 2022 पर्यंत आहे. अभिरूप चाचणी (मॉक टेस्ट) दिनांक 12 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सामाईक ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिनांक 16 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत घेण्यात येईल. परीक्षेचा निकाल दिनांक 20 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल.

    मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेच्या निकालानंतर वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.