पिंपळ व्हायचंय मला – सम्यक क्रांतीचा अजिंठा खोदणारी कविता

    पिंपळ व्हायचंय मला हा नुकताच प्रकाशित झालेला अरुण विघ्ने सरांचा कवितासंग्रह समीक्षासाठी पाठवला.या कवितासंग्रहातील कविता मनातील अंतरंगाचे भाव चिंतन व्यक्त करणारी आहे.वास्तवगर्भी, चिंतनगर्भी, मनोविश्लेषणात्मक शैलीने युक्त असलेला हा कवितासंग्रह वाचकाला नव्या आकृतिबंधाच्या आयाम दाखवते .माणसाचे नाते माणुसकीचे कसे असावे यांची प्रच्युती हा कवितासंग्रह आणून देते.याकवितासंग्रहापूर्वी त्यांचे पक्षी, वादळातील दीपस्तंभ, जागल,मी उजेडाच्या दिशेने निघालो हे अस्सल ग्रामीण व व-हाडी बोलीचा आस्वाद घेणारे कवितासंग्रह होते .यातील मी उजेडाच्या दिशेने निघालो हा कवितासंग्रह नव्या परिवर्तनाचा आविष्कार देणारा ठरला.अंधारवाटेला समाप्त करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोटाची दिशा घेऊन समतेचा महासूर्य पेरणारा ठरला . याच घाटीचा पिंपळ व्हायचंय मला हा कवितासंग्रह आहे. अतिशय तरल मनाच्या प्रेममय भावनांचे प्रतिबिंब रेखाटणारा आहे. डॉ. युवराज सोनटक्के हे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,”या कवितासंग्रहात कवितेत शोषित व उपेक्षित लोक जीवनाचे यथार्थ चित्रण आणि अकृत्रिम संवेदनशीलता प्रतिपादित आहे. यात त्यांनी वक्तव्य व बयानबाजी न करता दैनंदिन जीवनातील क्रियाशील परिदृष्यांना व अनुभवांना प्रत्यक्ष अभिव्यक्ती केली आहे. त्यांची कविता व्यवस्था परिवर्तनाच्या मार्गावर विशाल समुदायाशी माणुसकी आणि सवैधानिक सिद्धांताचे वास्तविक संबंध जोडण्याचा प्रयत्न करते.” हा निष्कर्ष अत्यंत सत्यनिष्ठा आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    या कवितासंग्रहात एकूण ८३ कविता आहेत. प्रत्येक कवितेचा आशय व अभिव्यक्ती संपृक्त रसायन यांनी भरलेला आहे .वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ यांच्या वैचारिक आरसा ही कविता व्यक्त करते. प्रियतमतेचा आविर्भाव, सखीचा जगण्याचा प्रवाह यांचे चित्रण केले आहे. कविच्या अंतर्मनातील वेदना, दुःख ,आठवणी,यांची प्रच्युती घडवून आणते. भीती बाळगण्याचे कारण नाही ,पाऊस तुझा आणि माझा, इशारा, मी मन जाळतो आहे. काळजातील स्मृती, ओठावरील गाव, मनातील चांदणे या कवितेतून कवीने आपल्या आयुष्याच्या वाटेवर मिळालेल्या सुख-दुःखाचे प्रकटीकरण केले आहे.जीवन अत्यंत आनंदमय असते पण सखीची साथ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवन दुःखी राहते मानवी मनाची भूक पैशाने भरत नाही तर ती प्रेमाने भरते .असे निच्छल प्रेम कवीने केले आहे. ते भीती बाळगण्याचे कारण नाही या कवितेत लिहितात की,

    “कुण्यातरी अज्ञान प्रकाशाने प्रकाशून
    तू माझ्याही पुढे होतीस चार पावलं
    ‘वादळातील दीपस्तंभसारखी’
    हातात निळा ध्वज घेऊन उजेडाची ‘जागल’ करीत उभी.
    आता आपण सारेच ‘पक्षी’ ‘उजेडाच्या दिशेने निघालोत,’
    अंधारवस्त्यातील काळोख पिऊन
    गतकाळोखाची भीती बाळगायचे कारण नाही.”
    पृ क्र २७

    अप्रतिम अशी कविता कवीच्या जगण्याचे मूळ सांगते. अंधार वस्त्यांना आग लागून प्रकाशाचे झाड होण्याचे आव्हान आपल्या प्रेयसीला करते आहे.कवीने इथला वर्तमान अत्यंत जवळून पाहिला आहे. कोरोना विषाणू महामारी हवालदिल झालेले बांधव पाहिले आहेत .त्यांच्या वेदना,आक्रोश, मृत्युतांडव, गरिबी यांच्या संवेदना जाणल्या आहेत. लाॅकडाऊन मधील जीवनाची तगमग पाहलेली आहे. त्यांचे शब्द आतून स्फुरले आहेत. मुस्कटदाब,शिक्षणाचा लाॅकडाऊन होऊ नये, या पासून आम्ही काही शिकलो?, नियमांच्या चौकटीत राहूनच या कवितांमधून वर्तमानातील मानवाच्या जगण्याच्या नोंदी कवीने अचूक टिपल्या आहेत. या पासून आम्ही काय शिकलो ? या कवितेत ते लिहितात की,

    “एका अनाम दहशतीने धस्तावलंय मन
    कुणाची ही दहशत ?
    ………………..
    पण काहीतरी नक्कीच घडतय
    एवढं मात्र खरं.
    मग या पासून ‘आम्ही काय शिकलो’?”
    पृ क्र ९०

    ही कविता अत्यंत क्रांतिकारी व मूल्य सापेक्ष भावनांचा मोहोळ आहे .आपण काय शिकलो याची प्रचिती करून देणारी आहे .मानवाला गुलाम करणारी ही व्यवस्था विरुद्ध बंड करायला लावणारी कविता अत्यंत उग्र स्वरूपाची आहे.कवीची दृष्टी विशाल भारताच्या नकाशावरील घडणाऱ्या घटनांचे अचूक दिशानिर्देशक करते . शेतकरी आंदोलन व लोकशाहीची उपेक्षा या विषयावर काही कविता अत्यंत आक्रमक व परिवर्तनशील आहेत. मानवतेचा पाझर आटला असताना माणुसकीचा झेंडा शोधणारा हा कवी परिवर्तनाचा ध्वज लावण्यासाठी हिमालयावर निघाला आहे .उजेडाची सम्यक क्रांती करणारा हा कवी माणुसकीची नवी साद घालत आहे. शेतकऱ्यांचे अस्वस्थ जीवन विशद करताना ते लिहितात की,

    “माणुसकीला पडले खिंडार
    विषमतेचे भरलेत भंडार
    बळी लटकतो फासावर
    गावात वाढताहेत खंडार.”
    पृ क्र १२५
    ते पुढे लिहितात की,
    मी हरलोच तर माणुसकी च्या शोधात
    येईल तुमच्याकडे
    तेव्हा तुम्ही माझ्या पदरात पसाभर
    अवश्य दान कराल,….
    पृ क्र १२४

    खिळे ही कविता शेतकरी आंदोलनाचा क्रांतिकारी संघर्ष रेखाटला आहे. ते या कवितेत लिहितात की,

    खुर्चीत रुतलेल्या तमाम खिळ्यांनो !
    आतातरी सावध व्हा रे !
    झोपले असेल तर जागे व्हा रे!
    सुलटे होऊन तुमचं अस्तित्व जाणवू द्या
    खुर्चीतील डोक्यांना झिनझिन्या येईस्तोवर एल्गार पुकारा.. !
    शेतकऱ्याच्या आंदोलनात
    एकमुखाने सामील व्हा रे,
    एकमुखाने सामील व्हा !
    पृ क्र ५५

    अत्यंत उग्र आणि विद्रोहाचे आव्हान करणारी ही कविता शेतकऱ्याच्या संघर्षाला सलाम करते. सलाम उन्हातल्या झाडास , व मार्शल या कवितासंग्रहातील कविता अत्यंत आशयाच्या अंगाने व स्वकथनाच्या पातळीवर चपखलपणे बसलेल्या आहेत. मार्शल या कवितेत म्हणतात की,

    “मार्शल,
    आज,आत्तापासूनच वैचारिक ऊर्जेची
    सुप्त पेरणी करावी लागेल
    आपल्याकडे भलेही पुरेशी रसद, दारूगोळा आणि सैन्य नसेल,
    पण भीमा नदीकाठच्या संगराचा
    आत्मविश्वास भक्कम आहे .”
    पृ क्र ३३

    पिंपळ व्हायचंय मला या कवितासंग्रहात कविता अनेक अंगाने मोहरून आलेले आहेत .पर्यावरणीय झाड हे माणसाच्या जीवनाचा श्वास आहे. पिंपळ हे तर मानवी जीवनाला सुख व आनंद देणारा झाड. तथागत गौतम बुद्धाच्या ज्ञानाचं बोधिवृक्ष पण कवीच झाड दुःखान गदगदलं आहे. आयुष्याच्या कालचक्रात कितीतरी अडथळे आलेले आहेत त्यांनी त्याच्यावर मात केली आहे .या झाडाला दुःख, वेदना मिळालेल्या आहेत .कवी झाड आणि माणूस यांचा अन्योन्यसंबंध बांधण्याचा प्रयत्न करतात .तझाड व्हायचंय मला बोधिवृक्ष जपावे लागेल, पानगळ आयुष्याची, त्यागमय पळस, झाड आणि माणूस,फुलांना सजवून ठेवा, पिंपळ व्हायचे मला या कवितांमधून मानवी मनाची पालवी मोहरुन आणलेली आहे. ते पिंपळ व्हायचे मला या कवितेत म्हणतात की,

    त्या वाटेचा होऊनी वाटसरू
    त्रिशरण ,पंचशील अनुसरू
    अत्त दीप भवं, स्वयंदीपचा
    मनामनात अजिंठा कोरू
    मैत्रीने डवरलेलं महाकाय
    असं झाड व्हायचंय मला
    सम्यक विचार रुजविण्या
    पिंपळ व्हायचंय मला….
    पृ क्र १२८
    तर झाड व्हायचंय मला या कवितेत ते लिहितात की,
    जाड व्हायचंय मला एकतेचं,
    ज्यांच्या छायेत असंख्य
    जाती, धर्म, वर्ग पंथांची पाखरं
    गातील एकात्मतेची गाणी
    मुक्त कंठाने निर्भयपणे भेदभाव विसरून
    नव्या युगाची प्रभात होईस्तोवर….
    पृ क्र २३

    कवी अरुण विघ्ने यांनी आपल्या कवितेत मनोभावनेचा बांध बांधला आहे. यामधील कविता गझलस्वरूप, यमकधारी ,मुक्तछंद, दीर्घत्व, लघूत्व यांनी चित्रित झालेले आहेत .माय ही कविता आईच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवणारी आहे. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऊर्जेची प्रकाशधारा प्रकाशन करण्याचे काम यांची कविता करत आहे. क्रांतिघोष या कवितेत धम्म विचार मानवीय दृष्टिकोनातून रेखाटलेले आहे,

    तू झालास मार्गदाता
    बदलवून टाकलेस धर्माचे संदर्भ माणूस केंद्रस्थानी ठेवून
    दिला नवा विचार मानवतेचा
    तू क्रांती घडवून आणली
    मानसिक गुलामीत ऊर्जा फुंकलीस
    ……………………
    वैश्विकतेच्या उतरात स्वयंदीप हो चा
    मेनदीप प्रकाशमान काहीच राहिलास
    म्हणूनच तू क्रांती पुरुष ठरलास..!
    पृ क्र १११

    तर हे क्रांतीसुर्य या कवितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे चिंतन त्यांनी रेखाटले आहे. ते या कवितेत लिहितात की,

      “हे क्रांतीसूर्या !
      तू उगवला नसता तर
      हे उजेडाचे जग आम्हास
      कदापिही दिसले नसते
      रातकिड्यांनीही आम्हाला
      केव्हाच बंदिस्त केले असते..
      पृ क्र ४०

      अशोक विजयादशमी ! ही कविता नव्या प्रेरणेची क्रांतीदर्शी जन्मजाणीव आहे.दीक्षाभूमी येथील शोषितांची क्रांतीभूमी आहे.ते या कवितेत लिहितात की,

      आता तूच आमची प्रेरणा
      तूच जगण्याची ऊर्जा
      तूच आमची युद्धशाळा
      आणि तूच आमची क्रांतीज्वाळा..!
      पृ क्र ३१

      पिंपळ व्हायचंय मला हा कवितासंग्रह मानवतेची फुलबाग फुलवणारा सृजोत्सव सोहळा आहे .अंधारलेल्या वाटांना प्रकाशाची दिशा दाखवणारा दिशादर्शक आहे. कवी अरुण विघ्ने यांची कवितेतील आशय एकसुरीपणा दिसतो. बदलत्या जाणिवांचा वेध घेताना शब्द क्रांतीत्व आणि विशाल दृष्टिकोन प्रतिबिंब झालेले असावे. पुढील कवितासंग्रहात या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील ही अपेक्षा .या कवितासंग्रहात उणिवा फार कमी आहेत पण काही मर्यादा आहेत कवितेचा पोत कुठे कुठे ढासळल्यागत दिसतो .कवीच्या जीवनातील तगमग खिन्नता उदासीनता यांचे प्रतिबिंब डोकावताना दिसते. हे प्रतिबिंब डोकावू नये याची काळजी कवींनी पुढील कवितासंग्रहात घ्यावी.हा कवितासंग्रह बदलत्या परीप्रेक्षाचा वेध घेणार आहे .हा कवितासंग्रह मानवी मनाला नवे बहारणे आणते. माणुसकीची कार्यशाळा निर्माण करणारी ही कविता युद्धशाळा म्हणून प्रस्तुत करते ही कविता उध्वस्त झालेल्या घराचे नवबांधणी करणारी आहे .आंदोलनाची धार वाढवणारी आहे .ही कविता सम्यक क्रांतीचा अजिंठा खोदणारी आहे. या कवितासंग्रहासाठी व पुढील काव्य प्रवासासाठी कवीला सुयश चिंतितो….!

      संदीप गायकवाड
      नागपूर
      ९६३७३६७४००
      पिंपळ व्हायचंय मला
      कवी- अरूण विघ्ने
      परिस प्रकाशन,पुणे
      मुल्य : १५० रू
      संपर्क: ९८५०३२०३१६