• Mon. May 29th, 2023

निळ्या पाखरांची अणुउर्जा :-चैत्यभूमी

निळ्या क्रांतीपाखरांना नव्या जगाची आशा दिली. क्रांतिवीर आहोत आम्ही अशी नवी महाऊर्जा दिली. काळोखाच्या गर्भावर समतेचा क्रांतीसूर्य निर्माण झाला आणि हजारो वर्षाच्या कुनियतीवर ज्ञानवंताने जगाला नवसंजीवनी दिली. ज्यांनी सर्व हयातभर स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांनी जीवन तयार केले आणि तसेच जगले म्हणून ते या जगाचे महामानव ठरले.

भारताच्या राजकीय ,सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञान विद्वत्तेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाहीही पुनीत करणारे .भारताचे तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी
निद्राअवस्थेतच महापरिनिर्वाण गुरुवार ता. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले. ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळला.हा दिवस भारतीय बहुजनाला अत्यंत मोठा शोक दिवस ठरला. सर्वांचे बाबा गेले म्हणून सर्वजण धाय मोकलून आक्रोश करू लागले.
६ डिसेंबर जेव्हा बाबासाहेब यांचे पार्थिव शरीर रात्री सव्वा तीन वाजता पोहोचले .तेव्हा तिथे जमलेल्या हजारो लोकांनी त्यांना अभिवादन केले . सर्वांच्या चेहर्‍यावर दुःखाची दाट छाया पसरली होती. अस्पृश्य समाजांतील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. आता आम्हाला कोण विचारणार या आर्त वाणीने त्या एकीमेकीकडे पाहत होत्या. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी पसरताच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यातून स्वयंस्फूर्तीने कामगार बाहेर पडले. ज्या महामानवाने जीवनभर संघर्ष केला क्षणाची उसंत न घेता भारताला नव्या परिवर्तनाची दिशा दिली त्या संघर्षाच्या काळात निसर्गाने आपला नैसर्गिक गुणधर्म पाळला. पण नैसर्गिक या नैसर्गिकगुणधर्मातही काही फितुरीचा वाटा होता. हा एक संशोधनाचा विषय ठरेल .बाबासाहेबाचे निर्वाण लोकांना नैसर्गिक वाटत नव्हते. काळ जसजसा पुढे जातो तसा-तसा तो वास्तवाला जाणून घेतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या अनुषंगाने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बुद्ध धर्माची महान समृद्ध जीवन शैली अंगीकार करून जगाला बुद्धा शिवाय तरणोपाय नाही त्याची जाणीव करून दिली. आज जे सनातनीत्व घरवापसी ची मोहीम चालवतात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर कसे श्रेष्ठ होते हे समजत नाही. ही विकृती देशविघातक असून या षडयंत्राला भारतीयांनी समजून घ्यायला हवे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची पताका गगनात फडकावून पंचशील ध्वजाची किर्ती जगाला दाखवून दिली. एक व्यक्ती काय करू शकतो त्याची साक्ष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचा प्रत्येक शब्द हिमालयाचा महामेरू होता. ते आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले जगातील ज्ञानभंडाराचा खजिना प्रज्ञावंतानी मोठ्या कष्टाने मिळवला आणि तो ज्ञानखजिना भारताला व जगाला दिला.
शुक्रवार दि.७ डिसेंबर १९५६ रोजी दुपारी दोन वाजता महापरिनिर्वाण यात्रा राजगृहापासून निघाली. त्यावेळी दहा ते बारा लाख स्त्री-पुरुष सामील झाले होते. सारी मुंबई भीमसागराने भरून गेली होती .महासागर शांत असले तरी अंतरंगात होणारी प्रचंड रेलचेल सामान्यांना दिसत नव्हती. सारा परिसर भीमराव अमर रहे..!
जयभिम ! जयभिम !! जय भिम!!! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो .अशा क्रांतिकारी घोषणा ढगाला चिरत प्रत्येकाच्या कानामध्ये घुमत होत्या. संध्याकाळी सात वाजता दादर चौपाटीवरच्या विस्तीर्ण समुद्र किनार्‍यावर लाखो भीमसैनिक यांच्या साक्षीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिक पार्थिव कायेला अग्निसंस्कार देण्यात आला. तेव्हा समुद्र निवांत होता .आभाळ स्वच्छ व नितळ होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नव्हती आज सारे शांत शांत वाटत होते. बाबासाहेब त्या चंदनाच्या चितेवर शांतचित्ताने जळत होते .यात जगण्यातून नव्या क्रांतीपाखरांचा उदय होत होता. डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने संविधानाने आपल्याला चालायचं आहे. ही शपथ भीमसैनिकांनी घेतली होती दादरच्या समशानभूमी जाताना अंत:करण विदीर्ण होत होते पुढे याच भूमीला चैत्यभूमी हे नाव देण्यात आले .चैत्र्य म्हणजे श्रमण परंपरेचे आणि विशेषतः बुद्ध परंपरेची अत्यंत महत्त्वाचे प्रतीक होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक मान्यवरांनी आणि जगातील वृत्तपत्राने त्यांना अभिवादन केले. सौ. कलावतीबाई इनामदार यांनी अभिवादन करताना बुद्ध शेवटी काय म्हणाले त्याचा दाखला दिला.” बंधुनो, माझ्यापरी निर्वाणानंतर माझ्या देहाची किंवा मूर्तीची अथवा प्रतिमेच्या फंदात पडून तुम्ही आपला मार्ग अडवून धरू नका ज्यांची उत्पत्ती झाली आहे त्याचा नाश ही होणारच. कारण उत्पतीतच नाशाची बीजे सामावलेली असतात त्याचा विचार करून तुमचा शोक आवरा आणि मी जोस आदेश दिला. जो सन्मान मार्ग दाखवला आहे त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. उद्योगी आणि शांत राहा .माझ्या मागे मी दाखवलेला सन्मार्ग आणि विनयही तुमचे मार्गदर्शन करो..! असे मी इच्छा करतो.” बुद्धाचे व बाबासाहेबांचे शेवटचे विचार एकच होते .आमचे भीमसैनिक सन्मार्ग सोडून वेगळ्याच मार्गाने लागलेले दिसतात .पण आता तरी आपण बुद्धाचा व बाबासाहेबांचा सन्मार्ग सोडू नका ही प्रतिज्ञा सर्व नागरिकांनी घ्यावी ही विनंती आहे.
न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने शब्दांजली व्यक्त करताना लिहिले की,” डॉ. आंबेडकरांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दर्जाच्या प्रथा पाळल्या होत्या आणि या प्रथेनुसार आंबेडकर सतत वागले. आंबेडकरांची महान कार्य आरंभिले त्याची फळे पाहावयास ते अधिक काळ जगू शकले नाहीत. त्यांच्या महान कार्यापैकी काही कार्यांना फळे यावेळेस अधिक वेळ लागला मात्र आंबेडकरांचा प्रभाव हा अपूर्वपणे भारतात पडलेला आहे. त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपणा आहे.” (इंटरनॅशनल ऍडमिशन ८|१२|१९५६ )तर लंडन टाईम्सने शब्दांजली करत अर्पण करताना लिहले की, “भारतात अछुत समजल्या गेलेल्या समाजाचे कैवारी डॉ.आंबेडकर हे आपल्या राहत्या घरी दिल्लीत निधन पावले त्याचे वय ६३ वर्षाचे होते. भारतातील सामाजिक, राजकीय संघटनाच्या कोणत्या इतिहासात आंबेडकर यांचे नाव अजरामर झाल्या शिवाय राहणार नाही .”
डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण आणि बहुजन समाज पोरका झाला. त्याला आपण कसे सावरावे हे समजत नव्हते. पण बाबासाहेबांनी दिलेल्या महामंत्राचा जोरावर त्यांनी धम्मकार्य चालू ठेवले . राजकीय क्रांती सुद्धा केली. पण नेत्यांच्या अंदाधुंदी कारभाराने व स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या राजतत्वामुळे राजकीय क्रांती अपयशी ठरली असे वाटते. धम्मातरानंतर केलेले आमूलाग्र परिवर्तन ह्याची इतिहासात तोड नाही. म्हणून अन्य समाज बांधव या समाजाला दिशादर्शक मानतात .चैत्यभूमी फक्त दलितांची नाही, अस्पृश्यांची नाही, तर ती जगातील तमाम मानवतावादी चिंतनशील, प्रबोधनकार, स्त्री मागासवर्गीय ,आदिवासी,शोषित आणि अन्य धर्मीय याची प्रेरणाभूमी आहे .
चैत्यभूमी फक्त साधी भूमी न राहता आज एक नव्या परिवर्तनाची क्रांतिभूमी ठरली आहे .या समाजाला आत्मभान नव्हते त्या समाजाला नवे आत्मभान दिले. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर भारतीय साहित्याला अनेक नवीन प्रवाह मिळाली. नवी दृष्टी नवीन विचार मिळाले. नव्या जाणिवांचे जीवनवादी कसदार आंबेडकरवादी साहित्य जगातील क्षितिजावर नावारूपास आले. भारतात व जगात या परिवर्तनवादी चळवळी झाल्या त्यांना दिशा देण्याचे काम आंबेडकरी तत्वांनी केले आहे.हे साहित्य जगाला शोषणमुक्त करणारे ठरले आहे. नव्या साहित्याच्या निर्मितीने भारतीय समाजाला नवा उजेड प्राप्त झाला आहे .हे साहित्य सर्व बांधवांना प्रकाशमान करीत आहे. परंतु काही विकृत व्यवस्था प्रतिक्रांती साठी सज्ज झालेली दिसते .
आज जगात अनेक प्रकारचे विषमतावादी विकृती डोके काढत आहेत. नव्या भांडवलदारी व्यवस्थेने समाजाला चक्रव्यूहात पकडले असून ब्राह्मणवाद व भांडवलदार गळ्यात गळे घालून गरिबांचे शोषण करत आहेत .दलित ,शोषित, पीडित, कामगार ,शेतकरी ,आदिवासी भटके-विमुक्त, स्त्री व इतर शोषित समाज घटकांवर नव्या जागतिकीकरणाने भुकेकंगाल करून सोडले आहे कोरोना महामारीने देशाला आणि जगाला हादरवून सोडले आहे .अत्यंत विकृत अशी व्यवस्था नव्या स्वरूपात जगातल्या देशात सुरू झाली आहे. भारत हा फक्त नावापुरताच उरला आहे .देशाला गुलाम करून स्वतःची पोळी शेकण्यात समाजकंटक ,धार्मिक कंटक भाषिककंटक मशगुल आहेत. ओठावर फक्त भारत म्हणायचं आणि काम विदेशी करायचं ही परंपरावादी कुव्यवस्था समाप्त करायची असेल तर भारतीय लोकशाहीची फळे सर्वांना मिळाली .यासाठी भारतीय नागरिकांनी लढायला सज्ज राहावे. भारतीय संविधानावर घाला घालण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम भारतीय क्रांतीपाखरांनी करावे. दरवर्षी सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो भीमसैनिक जमा होतात पण दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने चैत्यभूमीकडे निळी पाखरे गेली नाही आणि या वर्षी सुद्धा काही बंधनामध्ये आपल्याला चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचा आहे . या भीमसैनिकांनी प्रतिक्रांतीविरुद्ध महायुद्ध करण्यासाठी तयार रहावे .या बांधवांनो… ! या चैत्यभूमी..! आम्हाला साद घालत आहे .बाबासाहेबांचा कांती विचार खुणावत आहे. चैत्यभूमी फक्त पावनभूमी नसून ती निळ्या क्रांती पाखरांची अणुऊर्जा आहे…!
संदीप गायकवाड
 नागपूर
९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *