• Sun. Jun 11th, 2023

नक्षत्रपेरणी कवी बा.ह.मगदूम आस्वादक (परीक्षण) मुबारक उमराणी, सांगली

  जगण्यातील संवेदनक्षम अनुभवाचा आशय प्रतिभाच्या अन् प्रतिमाच्या द्वारे माणसात गंधाळत चिंतनसुत्रे मांडणारा सशक्त काव्य संग्रह नक्षत्रपेरणी “

  नक्षत्र पेरणी ” हा काव्यसंग्रह नुकतेच वाचनात आला .ह्दयाच्या व मनाच्या कप्यात लपलेल्या वेदना,दाह,निसर्ग, संकटे,दुःखमय यातना,उपासमारी,रोगराई, दुष्काळ, निराशा,सुखद घटना यांच्या बियाणांची ह्दयात अक्षरपेरणी मनाच्या सुपीक जमिनीत करत, शब्दांनी नक्षत्रांच्या रुपाने आपले विचार,भावभावनाने कवितेचा शिवार बहरत व फुलविण्यात दिसून येत आहे. विविध विषयावर कवितेद्वारे साहित्यिक मळा कणसानी बहरलेला असून साहित्याची रास करणारा असा हा सुपीक मनाचा , शब्द पेरणी करणारा कवी म्हणजे बा.ह.मगदूम सर होय. सांगली जिल्ह्यातील धुळगावचा हा अल्पभुधारक कवी अनुभव संपन्न असून मराठी मळ्यात शब्द खळखळा करीत अक्षराची फुलमाळ ज्ञानोबा तुकोबा, बहिणाबाई,छत्रपती शिवराय ,सावळा विठ्ठलाचा वारसा जपत, मराठीचा मळा फुलवत, श्रमाचा वारकरी छन्नी हातोड्या टाळ चिपळ्या वाजवत जीवन सुखमय होवो अशी कामना करीत कष्टालाच कवी वंदन करतो.कारण त्याची ओंजळ नक्षत्रानी भरली आहे.म्हणून कवी म्हणतो,

  “धान्य पिकेल शेतात
  आस ठेवूनी मनात
  पांडुरंग वाट चाले
  बळीराजाच्या दिंडीत”

  असा भाव प्रकट करीत स्वतःचा शोध घेत रंग,आकार बदलत इंद्रधनुला मिठीत घेत काळ्या ढगांना बोलावतो त्यांच्याशी संवाद साधतो,

  “हे राज्य जीव जंतूंचे
  या अफाट धरणीवरती
  मी अनेक सुरात लावत आहे”

  श्रावण धारात निसर्ग फुलतांनाचे वर्णन अप्रतिम आहे त्यांची निरीक्षण क्षमता किती प्रखर आहे याची साक्षच देते.

  “डोंगर द-याखो-यात
  ढग सोडतील चिलमीचा धूर”

  व्वा!! ग्रामीण जीवनातील माणसाच्या विरुगळा देणारी ” चिलीम “त्याचा कवितेला साज चढवत कविता उच्च पातळीवर सहज पोहचवण्यात मगदूम सर,यशस्वी झाले आहेत .त्याची प्रचीती या काव्य संग्रहातून अनेक ठिकाणी येते.खेड्याशी नाळ जपत सुख दुःखाचे गीत गात, शब्दफुले सजवीत शिरोभूषणी शब्द लावत शब्दाच्या मळ्यात कवी नाचत राहतो.माणुसकीच्या मनमंदिर धाग्यात सा-यांना माळत सर्व धर्मांना सोबत घेऊन चालत राहतो.प्रेमवात उजळत राहतो.अश्रूचे मोती उधळत,दु:खाच्या वादळी लाटा सहज झेलत राहतो.श्रावणसरीत ढगाच्या ढोलाच्या तालात सप्तरंगी इंद्रधनु मनात भरत झिम्मा फुगडी,झोके,पतंग अनेक खेळ खेळत राहतो ताट,लाह्या दूध, पुरणपोळी ,हिरवा चुडा भरत श्रावणात आनंदून जातो.वृक्षवल्ली,खळखळत्या झ-यात मोर नाचू लागतो,नवचैतन्याच्या शृंगारात कवी रमून जातो तर कधी घायाळ काळीजात मायेचा गंध दिसेनासा होतो,कंठ भरून येतो,संसाराची बासरी सूर सोडून जाते,जीवनाची बाग मोडते,वेदना छळतात,डाव मोडून जाणाऱ्या सखीचा विरह सहन होत नाही. प्रीतीचा घाव सलत जातो.स्वप्न महाल रिता रिता होतो गाव सोडतांना वेदना रक्तबंबाळ करतात,नयनी अश्रूचा पूर येतो,मुक्या वासराच्या वेदना सहन होत नाहीत,

  “दुःखाचे क्षण येती जीवना
  दुःखांनाही दुःखाने होतात *वेदना
  कसे जगावे माणसाने ह्या जीवना”
  अति सुखानेही काळजात होतात वेदना”

  सैतानी वस्ती सतावते नातीगोती तटातटा तुटतात, माणसाची जात स्वार्थासाठी पिसाळते,जीच्याशी जीवनभर संगत करण्याची शपथ घेणारे आपल्याच धर्मपत्नीस जाळतानाच माणूस धर्मालाच काळे फासले जाते , मानवी चेह-याच्या सैतानी वस्तीच्या माया बाजारात जीवनाची कोणास कदर नाही.अशात अवती भोवती विरळ होत जाणारा सच्चेपणा हेच कवीची विस्तीर्ण संवेदनशीलता हाच कवितेचा आत्मा असल्याची जाणीव होत कविता सत्याचा वलय कोठेच कमी पडू देत नाही, आतला आवाज शाबूत ठेवत कवी उद्विघ्न होत म्हणतो,

  “माणसानेच ह्या माणसांना
  अंधाराचे भय घातले होते
  उजेडात जीव जगतानाही
  मरणाचे भयघातले होते”

  असा विश्वास फाटलेल्या घोटाळ्यात कवी कळकळीने म्हणतो,

  “मानवतेचा ठेवा
  माणूसकी ही जगवा
  एकमेकास बसवा
  सांगू कुणाकुणाला “
  अशी खंत मांडून जातो.”

  त्याच्या मनात फाटलेले काळीज कशाने टाचू ? माणूस मारण्याचा केला सराव नाही असे कवी बोलून जातो.शब्द हे धारदार शस्त्र आहे यानीच आता सावरावे लागणार हे सत्य कवी मगदूम सर,जाणतात.शांतता शोधतांना त्याचा जीव कासावीस होतो,राग लोभाची कुत्री भुंकत राहतात. अशा अवस्थेतही कवी मनाच्या अंधारात माणुसकीचे दिवे लावतात.मग नक्षत्रपेरणी कवी सहजतेने करतो.ढग,पाऊस,वीज,सूर्य, गंगा यमुना,काशी सारी पृथ्वीच नक्षत्रानी भरली आहे.
  मग मगदूम सर म्हणतात,

  “मी माणसात आलो
  मी माणसात गेलो
  मी माझ्या खरेपणाला
  प्रेमाने वाटत गेलो “

  हाच चांगुलपणा, सभ्यता,सत्कर्म,विचार भाषा नित्य नटुनथटुन त्याची उंची गगनाला भिडावी अशी अपेक्षा करतो.नाते तुझे माझे कविताच सांगेल असे अभिमानाने कवी म्हणतो.”रेल्वे नोकरीची जबाबदारी पार पाडत असतानांच मगदूम सरांनी कवितेचा छंदही मोठ्या ताकदीने जोपासला आहे.आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्मपणे वेध घेऊन त्या घटनांना अतिशय सुंदर शब्दात त्यांनी काव्यबद्द केले अाहे.कोणत्याही एका चौकटीत न जखडता प्रेम,निसर्ग,शेती,माती,सामाजिक, देशप्रेम,मानवता,व बंधुता, थोर पुरूषाचे थोरत्व, शेतकरी, देव व पाऊस, निसर्ग,पर्यावरण, तसेच सद्य परिस्थितीचे भाष्य या सर्वभावभावनांचा उल्लेख त्यांच्या कवितामधून प्रत्ययास येतो.स्वतः मराठी भाषक नसतानाही त्याचे माय मराठीचे निस्सीम प्रेम,मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार संवर्धनासाठी त्यांनी केलेले अविरत प्रयत्न, ठिकठिकाणी घडवून आणलेली मराठी साहित्य संमेलने व ग्रामीण भागातून घेतलेली कविसंमेलने त्यांच्या मराठी प्रेमाची साक्ष देत आहेत “. असे जेष्ठ कवयित्री व लेखिका सौ.चंद्रलेखा बेलसरे ताईयाचे भाष्या फारच बोलके आहे.व कवी बा.ह.मगदूम यांच्या कवितेचे गुणगौरव करणारे आहे.

  याशिवाय आई व बाप विषयांच्या कविता फारच अप्रतिम आहेत.बाप प्राण ओतून राबतो,भूकेची पर्वा करीत नाही,तो घामात चिंब भिजतो,विहीर, शेत यावर अतिशय प्रेम करतो पण कर्जाचा डोंगर पेलतांना तो बेजार होतो.स्वतः खोपट्यात राहतो.आई मात्र चंदनासारखे झिजते,आई सागर किणारा होते, मोगरा होऊन सुहास देते,कवी मायेची उब मिळावी अशी प्रार्थना करतो.आणि आईची २४ रूपे वाचतांना अशोकचक्रातील चोवीस आरे आठवण झाल्या *शिवाय *राहात नाही इ… गुळ, तिळ, टाळ, माळ, गाव, शिव, देश, वेश, खास, सुवास, मन, मध्यांन, गीत, संगीत, माय, साय, छाया , माया , चंदन , स्वर्ग , कर्म , धर्म , साखर आणि भाकर अशा विविध रुपात आईचे दर्शन कवी घेतात.तसेच कवीची बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्री, छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज याच्यावर विशेष श्रद्धा आहे.भीम मनामनात फुलवत आजही भीम जगतो जनमानसात, बाबामुळेच कोट,मोटार,रुपये,ज्ञान असे मिळाले सांगत,

  “बाबानी दिला आकार
  तुझ्या जीवनाला
  “जय भीम” म्हणायला
  लाजतो तू कशाला ?

  असा सवाल करतात .तर छत्रपती शिवाजी यांच्या कार्याचा गौरवगान करणारी कविता समर्पक अशी आहे.

  “महाराष्ट्राची शिवबाने|
  विश्वात वाढविली शान||
  शिवबाची कीर्ती सा-या|
  जगात आहे महान || “

  अशी गुणगौरव करणारी कविता छत्रपती शिवरायचा इतिहास उभा करण्यात मगदूम सर,यशस्वी झाले आहेत.प्रतिमांमधून आत्मस्वर सांगणारी कवितेचे निराळेपण सर,सिध्द करतात.त्याच्या कवितेची सृजनशील वृत्ती कोणाचे अनुकरण करत नाही, कवितेला स्वत्वाचा झणकार प्रत्येक कवितेत ऐकायला सहज येतील अशाच कविता आहेत.यातील तरल भाव मगदूम सर मोठ्या सामर्थ्य्याने जागवतात.कवितेतला भाव,आशय,विषय,प्रतिमा,संदर्भ,कवितेतभावार्थ,शैली,पाश्वभुमी,विचार,भुमिका, संवेदना अशा सर्व अंगानी कविता जीवनचिंतन मांडणारी कविता गुणवत्तेमुळे मराठी साहित्यात आपली खास जागा निर्मान करेल.

  नक्षत्रपेरणीत अनेक ग्रामीण जीवनाशी निगडीत शब्दाचा वापर आलेला आहे.त्यामुळे कवितेला चांगलाच साज चढला आहे”विळा भोपळ्याचे नाते सैतानी,चोळीबांगडी,पुरणपोळ हिरवा चुडा,काव्यजल,काव्यमळा,दिवाबत्ती, घनगर्द,कूस,कोरंधकोर कायली,हंबरीत,खुराडयातल्या कोंबडयानो”*,अशा शब्दकोट्यानी बा.ह.मगदूम कविता सजविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.शिवाय “बाप,ओंजळ नक्षत्रांची, महामानव भीमराव आंबेडकर,आदर्श राजा शिवाजी महाराज,काव्यरुपात कवी,वृक्षारोपण, नागपंचमी,मजुरी,कलियुगाचा सातबारा,आण्णांचा गाव,आई,मानवता ‘ या कविता विचाराने समृद्ध असून पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावा अशाच आहेत.या कविता लय , ताल दृष्टीने अप्रतिम आहेत हा कविता संग्रह मगदूम सरांनी आपल्या वडिलांना अर्पण केल्याने कवितेला कष्टाचा सुगंध आला आहे.अनेक वर्तमानपत्रे व दिवाळी अंकात पूर्व प्रसिद्धी काही कवितेला मिळाल्याने त्या वाचकाला आपल्या असल्याची भावना होते. विशेष म्हणजे या संग्रहाचे सर्व अधिकार सौ *हमीदा बा.मगदूम (भाभीजी) यांच्या स्वाधीन करुन त्यांच्याप्रती असलेली आस्थेची प्रचिती येते.आणि आदरणीय डॉ.श्रीपालजी सबनीस सर (८९व्या* आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष) यांची अप्रतिम प्रास्तावना लाभली आहे. हिचं कवीला त्यांच्या मराठी साहित्य कार्याची मिळालेली सर्वश्रेष्ठ पोचपावती आहे.यात शंकाच नाही.महाराष्ट्राचे प्रख्यात लेखक लक्ष्मण सुर्यभान घुगे सर व कवी दत्तू ठोकळे सर,सौ.सरलाताई बोरकर,शिवाजी चाळक सर,यांच्या शुभेच्छांने कविता संग्रह कौतुकाच्या वर्षावात चिंब चिंब भिजला आहेच. मुखपृष्ठही खूप खूप सुंदर, जिवंतपणा असून अखंड जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पेरणी करीत असल्याचा भास होत आहे. सुप्रसिद्ध चित्रकार नावाडकर आर्टस् ,पुणे यांचे असून “यशोदीप पब्लिकेशन्स,नारायण पेठ,पुणे यांनी केले आहे. मी फक्त यातील कवितेचा माझ्या अल्पविकसित बुध्दीने त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला आहे.मराठी साहित्यिक या कविताचा आस्वाद जरुर घेतील ही सदिच्छा व्यक्त करुन मगदूम सरांचा काव्यप्रपंच बहरत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.

  *नक्षत्रपेरणी
  बा.ह.मगदूम
  यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
  स्वागत मुल्य : १५० / रुपये
  मो.९८ २२ ५१ ८० ९९.
  *आस्वादक
  -मुबारक उमराणी
  सांगली
  ९७६६०८१०८७.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *