‘तो’ पेटत्या चुलीवर कागदाचा द्रोण करून बनवतो मॅजिक चहा..!

    यवतमाळ : चहा म्हणजे, तुमच्या आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पण, हाच चहा कोणी कागदावर तयार करत असेल तर? विश्‍वास बसेल? चहासाठी जन्म आमुचा असं अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळते. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरुवात असो, वा कट्टय़ावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ चहा हवाच. सध्या अनेक कॅफे, रेस्टॉरंट्समध्ये चहाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    तसेच अनेकांनी वेगवेगळे चहाचे प्रकारही शोधून काढले आहेत. अशाच शोध लावलाय यवतमाळ शेतकर्‍यांना चक्क कागदावर चहा तयार केलाय. ऐकून धक्का बसला ना? खरंच. या शेतकर्‍यांना कागदावर चहा बनवला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या मॅजिक ‘चहा’ची चर्चा रंगली आहे. यवतमाळ जिल्ह्यात येणार्‍या आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथील अब्बास भाटी या शेतकर्‍याचे वास्तव्य आहे. त्याच्याकडे वडीलोपार्जीत दोन हेक्टर शेती आहे.

    या रब्बी हंगामात त्याने हरभरापिकाची लागवड केली. पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच शेतात जावे लागते. थंडीचे दिवस असल्याने अंगात उष्णता निर्माण व्हावी म्हणून शेतकरी चहाचा घोट घेतात. अब्बास भाटी या शेतकर्‍याने चहा बनविण्यासाठी भांडेही नेले होते. परंतु, एक दिवस हे भांडे चोरीला गेले. मग रात्रीला चहा कसा बनवायचा असा प्रश्न शेतकर्‍याच्या डोक्यात आला. त्याने बाजूला असलेले कागद गोळा करून द्रोन बनविला. चुलीवर पाणी, साखर, पत्ती, दूध टाकून बनवला. चहा अगदी टेस्टी बनला. त्याने ही बाब सकाळी आपल्या मित्रांना सांगीतली. मात्र, त्यावर कुणाचाही विश्‍वास बसला नाही. मग चौकात चहा बनवून दाखविला. सगळ्यांनी चहाचा घोट घेत कौतुक केले. तेव्हापासून अब्बासचा मॅजिक चहा चांगलाच चर्चेत आला आहे.