मुंबई : नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ओमिक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते, असे म्हटले आहे. देशात सध्या ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
देशातील एकूण २१३ ओमिक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निबंर्धांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.