• Tue. Jun 6th, 2023

जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    मुंबई : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, जिल्हा स्त्री रूग्णालयासह विविध कामांसाठी हिवाळी अधिवेशनातून सुमारे 15 कोटी रूपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

    स्त्री रूग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या नियोजित कामाबरोबरच विविध विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर सातत्याने प्रयत्नरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध स्तरावर त्यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटी 56 लाख रूपये व अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपये एवढा निधी अधिवेशनात मंजूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. वित्त विभागाने दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या खर्चाचे पूरक विवरण पत्र २०२१-२०२२ मध्ये सदर बाब अधोरेखित करण्यात आली आहे. हा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याने मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांचे आभार मानले आहेत.

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार

    कोविडकाळात आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी स्त्री रूग्णालयाच्या विस्तारीकरणासह ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती, सुविधांची उभारणीसाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार अनेक कामे सुरूही झाली आहेत. स्त्री रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून निधी मंजूरीसाठी विनंती केली होती. त्यानुसार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. विस्तारित इमारतीमुळे स्त्री रूग्णालयाची क्षमता वाढून जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

    शासकीय ज्ञान विज्ञान विदर्भ महाविद्यालयाची शतकपूर्ती, तेथील विस्तीर्ण परिसर, संशोधनाची परंपरा या पार्श्वभूमीवर आवश्यक नव्या सुविधा लक्षात घेता निधी मिळण्यासाठी मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार उच्च शिक्षणाशी संलग्नित प्रगत अभ्यासक्रम तसेच अद्ययावत अभ्यासिका व आंतरराष्ट्रीय दर्जाची ई-लायब्ररी साकारण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अद्ययावत क्रिकेटचे मैदान, तसेच धावनपथसुद्धा निर्माण करण्याचे नियोजन असून, या सुविधांसाठी सुमारे 50 कोटी निधी आवश्यक असल्याची बाब मंत्री ॲड. ठाकूर यांनी श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मागील अर्थसंकल्पीय भाषणात नाविन्यपूर्ण शैक्षणीक उपक्रम व पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली होती आणि आता 10 कोटींचा निधी मंजूर होणार असून एकूण 20 कोटीचा निधी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या विकासावर खर्च करण्याचे नियोजन आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *