जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ३ पोलिस जवान शहीद झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    जवान बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पंथा चौक-खोनमोह रस्त्यावर भारतीय राखीव पोलिसांच्या ९ व्या बटालियनच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद झाले, तर ११ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दहशतवादी बाइकवरून आले होते, अशीही माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

    ज्या बसमधून जवान जात होते, ती बस बुलेटप्रूफ नव्हती. शिवाय, बहुतांश पोलिस जवानांकडे त्यांचा बचाव करण्यासाठी बंदुका आणि इतर साहित्यही नव्हते. फार कमी पोलिसांकडे शस्त्रे होती. तसेच, बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी आधी बसच्या टायरवर गोळीबार केला, त्यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. हा गोळीबार इतका भीषण होता की, जवानांना स्वत:चा बचाव करण्याचा वेळही मिळाला नाही. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने घेतली आहे.